धोनी, कोहली नाहीत, दाखवा तुमची कमाल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

Kolkata
कार्लोस ब्रेथवेट आणि रोहित शर्मा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या विंडीजला टी-२० मालिकेत आपला दमखम दाखवण्याची संधी आहे. तर कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत इतर भारतीय खेळाडूंना आपले संघातील स्थान पक्के करण्याची संधी आहे.

रिषभ पंतकडून खूप अपेक्षा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघातून वगळण्यात आले. त्याच्या अनुपस्थितीत युवा रिषभ पंत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यष्टिरक्षणाची धुरा सांभाळतील. खासकरून युवा रिषभ पंतकडून निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांना खूप अपेक्षा आहेत. रिषभ आयपीएलच्या मागील मोसमात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. त्यामुळे निवड समितीने धोनीला वगळून त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतला.

कृणाल पांड्या करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

धोनीला विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळले असेल तरी त्याच्यासाठी टी-२० संघाची दारे अजूनही उघडी आहेत असे निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद आणि विराट कोहली यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे रिषभला जर संघात आपले स्थान पक्के करायचे असेल तर या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करावी लागले. तसेच कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत संधी न मिळालेले लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांना टी-२० मालिकेत संधी मिळणार आहे. अष्टपैलू कृणाल पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल. तसेच भारताचे प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार असल्याने विंडीजच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी चांगला खेळ करावा लागणार आहे.

पोलार्ड, ब्रावोचे पुनरागमन

विंडीजचा संघ टी-२० सामन्यांमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करतो. त्यातच अनुभवी खेळाडू किरन पोलार्ड, डॅरेन ब्रावो, आणि कर्णधार कार्लोस ब्रेथवेट यांच्या समावेशामुळे विंडीजचा संघ अधिक मजबूत झाला आहे. पोलार्ड एका वर्षानंतर तर ब्रावो दोन वर्षांनंतर विंडीज संघात पुनरागमन करत असल्याने हे दोघे चांगली प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक असतील. त्यामुळे विंडीजचा संघ कसोटी आणि एकदिवसीय मालिकेपेक्षा टी-२० मालिकेत चांगले प्रदर्शन अशी अपेक्षा आहे. या दोन संघांतील इतिहासही विंडीजच्या बाजूने आहे.

भारताचा रेकॉर्ड खराब

भारत आणि विंडीज यांच्यात आतापर्यंत एकूण ८ टी-२० सामने झाले आहेत. त्यापैकी ५ विंडीजने तर २ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच विंडीजविरुद्धचे मागील चारही सामने भारताने गमावले आहेत. त्यामुळे टी-२० मालिका ही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेपेक्षा चांगली होईल यात शंका नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here