घरक्रीडाविश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे लक्ष्य!

विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे लक्ष्य!

Subscribe

महिला टी-२० वर्ल्डकप; कांगारूंविरुद्ध सलामीचा सामना आज

भारतीय महिला क्रिकेट संघाने मागील काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांनी २०१७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, पण यजमान इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याच इंग्लंडने २०१८ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत केल्यामुळे पुन्हा भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, आता भारताला जेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याची शुक्रवारपासून सुरु होणार्‍या टी-२० विश्वचषकात संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघासमोर यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

भारतीय महिला संघाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्धच्या तिरंगी मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यांनी या दोन्ही संघांविरुद्ध एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला. अंतिम सामन्यातही सहापैकी चार विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची त्यांना संधी होती. परंतु, मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. विश्वचषक जिंकण्यासाठी आमच्या मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे काही दिवसांपूर्वी भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने नमूद केले होते.

- Advertisement -

या विश्वचषकात भारताच्या फलंदाजीची भिस्त स्मृती, १६ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीतवर असेल. एकीकडे स्मृती आणि शेफाली फॉर्मात असताना हरमनप्रीतला मात्र धावांसाठी झुंजावे लागले आहे. स्मृतीने तिरंगी मालिकेच्या ५ सामन्यांत ४३ च्या सरासरीने २१६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा विश्वचषक जिंकायचा असल्यास स्मृतीला प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करुन द्यावी लागेल. गोलंदाजांमध्ये राधा यादव, पूनम यादव, दिप्ती शर्मा या फिरकीपटूंना वेगवान गोलंदाज शिखा पांडेची साथ लाभेल. सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये जास्तीजास्त विकेट मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यानंतर फलंदाजांना वेगाने धावा करण्यापासून रोखणे हे आमचे काम आहे, असे शिखा म्हणाली. महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणार्‍या गोलंदाजांमध्ये शिखाचा पाचवा क्रमांक लागतो.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकत आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. प्रत्येक विश्वचषकाप्रमाणे यंदाही ऑस्ट्रेलियाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यांच्या संघात एलिस पेरी, अलिसा हिली, कर्णधार मेग लॅनिंग यांसारख्या उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताला या स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), एरिन बर्न्स, निकोल कॅरी, अ‍ॅशली गार्डनर, रेचल हेन्स, अलिसा हिली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, डेलिसा किमीन्स, सोफी मोलीनॉक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, मॉली स्ट्रानो.

सामन्याची वेळ : दुपारी १:३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

स्मृती, हरमनप्रीतकडून खूप अपेक्षा – रामन

भारतीय संघाला महिला टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, भारताला ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरला दमदार कामगिरी करावी लागेल, असे मत प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रामन यांनी व्यक्त केले. प्रत्येक संघात काही प्रमुख खेळाडू असतात आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. स्मृतीसारखी सलामीवीर याआधी भारताकडे कधीही नव्हती. तर हरमन मधल्या फळीत महत्वाची भूमिका बजावेल. त्या दोघीही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांना त्यांची जबाबदारी माहित आहे. भारताला ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्मृती आणि हरमनला दमदार कामगिरी करावी लागेल, असे रामन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -