घरक्रीडाजेव्हा जमेची बाजू बनते कमकुवत!

जेव्हा जमेची बाजू बनते कमकुवत!

Subscribe

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाचे बाराव्या क्रिकेट वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २३९ धावांची मजल मारली, ज्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांत आटोपला. हा सामना भारताने केवळ १८ धावांनी गमावला याला कारण होते महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा या अनुभवी जोडीची झुंजार फलंदाजी. या दोघांनी अर्धशतके ठोकत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

मात्र, ते बाद झाले आणि भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. एका बाजूला धोनी आणि जाडेजाचे कौतुक होत असतानाच दुसर्‍या बाजूला भारताच्या अव्वल तीन फलंदाजांच्या कामगिरीवर बरीच टीका होत आहे. भारताचे अव्वल तीन फलंदाज रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सातत्यपूर्ण प्रदर्शन केले होते. मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले, परिमाणी भारतावर वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली.

- Advertisement -

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी रोहित, राहुल आणि विराट या त्रिकुटाने जणू भारताच्या फलंदाजीची धुरा सांभाळली होती. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर फारसा दबाव आला नव्हता. खासकरून रोहितचे या स्पर्धेतील प्रदर्शन वाखाणण्याजोगे होते. त्याने उपांत्य फेरीतील सामन्यापूर्वी विक्रमी ५ शतकांसह ६४७ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात २७ धावा करत त्याला एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध अवघी १ धाव काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅट हेन्रीने त्याला फारच अप्रतिम आऊट-स्विंग चेंडू टाकत बाद केले.

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. उपांत्य फेरीपूर्वी विराटने ८ सामन्यांत ४४२ धावा केल्या होत्या, ज्यात सलग पाच अर्धशतकांचा समावेश होता. मात्र, त्याला या अर्धशतकांचे एकाही शतकात रूपांतर करता आले नाही. हे शतक तो उपांत्य फेरीत फटकावून भारताला विजय मिळवून देईल अशी आशा भारतीय चाहते करत होते, पण अवघ्या एका धावेवर त्याला ट्रेंट बोल्टने पायचीत पकडले. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर विराट आणि रोहित एकाच सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या दोन्ही सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. यावरूनच या दोघांचे भारतीय संघातील महत्त्व अधोरेखित होते.

- Advertisement -

डावखुरा शिखर धवन या वर्ल्डकपमधील दोन सामन्यांनंतर जायबंदी झाला आणि लोकेश राहुलला सलामी करण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा चांगला वापर करत ९ सामन्यांत ४५ च्या सरासरीने ३६१ धावा केल्या. मात्र, संघाला त्याची सर्वात जास्त गरज असताना न्यूझीलंडविरुद्ध तो फक्त १ धाव करू शकला. रोहित आणि विराट बाद झाले यामध्ये त्यांची चूक होते असे म्हणता येणार नाही. मात्र, राहुल बाद झाला याला चांगल्या चेंडूपेक्षा त्याचा खराब फटका कारणीभूत होता. त्यामुळे राहुलच्या तंत्रावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध ज्या संयमाने फलंदाजी केली (बाद होण्यासाठी मारलेला फटका सोडून) ते पाहता तो वर्ल्डकपनंतरही चौथ्या क्रमांकावर कायम राहणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच धवन फिट झाल्यास तोही संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत मोठी खेळी करण्याबरोबरच राहुलने आपले संघातील स्थान पक्के करण्याची संधीही वाया घालवली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -