घरUncategorized...आणि उद्धव ठाकरे नतमस्‍तक झाले!

…आणि उद्धव ठाकरे नतमस्‍तक झाले!

Subscribe

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी दोन मंत्र्यांनी घेतली शपथ

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो की… असे शब्द शिवाजी पार्कवर घुमले आणि महाराष्ट्राच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या मुलाने राज्याच्या प्रमुखपदाची शपथ घेतल्याने राज्यभरातील शिवसैनिक एकाच जल्लोष करत असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या उभ्या आडव्या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या मनात आशेची नवी पालवी फुटली. समाजकारणाचे बाळकडू घेतलेल्या ठाकरे घराण्याचा सुपुत्र शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे, अशी जणू साक्ष मावळत्या सूर्याच्या साक्षीने शिवतीर्थाने अनुभवली…मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील जनतेसमोर नतमस्तक झाले आणि उपस्थितांना गहिवरून आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरोबर ६ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचे स्मरण करून आणि संविधानाला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला असून राज्यातील सत्तापेचालाही पूर्णविराम मिळाला.

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील ३० वर्षांची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शिवसेनेने सरकार स्थापन केले. नव्याने स्थापन झालेल्या या सरकारसाठी काल ऐतिहासिक क्षण होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात गुरुवार २८ नोव्हेंबर २०१९ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होताना मातोश्री आणि शिवसेनाभवन आनंदात नाहून निघाले होते आणि सारी मुंबई भगवी झाली होती…

‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला अर्पण करत आहे’, असे प्रबोधनकारांनी ज्या शिवतीर्थावर जाहीर केले… ‘एक नेता, एक मैदान’, असा इतिहास रचत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ ज्या शिवतीर्थावर अव्याहतपणे धडाडली… ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळा’ अशी आयुष्याच्या संध्याकाळी ज्या शिवतीर्थावरून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला भावनिक साद घातली… ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला… त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

उद्धव यांच्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले. शपथविधी सोहळा आटोपल्यानंतरही उद्धव ठाकरे जनसागरासमोर नतमस्तक झाले, हे विशेष!

उद्धव यांना शपथ दिल्यानंतर उद्धव सरकारमधील अन्य सहा मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. सर्वात आधी कॅबिनेट मंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे हे शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आहेत. शिवसेनेचे नव्या फळीतील सर्वात आक्रमक नेते अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. आनंद दिघे यांच्या पश्चात ठाण्यात शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राखण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे यांच्या शब्दाला शिवसेनेत मान आहे. एक उत्तम संघटक म्हणून त्यांना अन्य पक्षांतील नेत्यांनीही दाद दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा वाहिली होती. शिंदे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. विधान परिषद सदस्य असलेले सुभाष देसाई शिवसेनेतील अभ्यासू, अनुभवी व शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. फडणवीस सरकारमध्ये उद्योग मंत्री राहिलेले देसाई उद्धव सरकारमधील आणखी एक महत्त्वाचा चेहरा असणार आहेत.

बाळासाहेबांना वंदन
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही शिवरायांना वंदन करून मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयासह महत्त्वाची खाती राहिली होती. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मुंबईचे महापौरपद तसेच अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या निभावल्या. शिवसेनेतून बंड करून राष्ट्रवादीत गेलेल्या भुजबळ यांना शरद पवार यांनीही नेहमीच मानाचे स्थान दिले. आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद व अन्य प्रमुख खाती सांभाळणारे भुजबळ उद्धव सरकारमधील सर्वात अनुभवी मंत्री असणार आहेत. भुजबळ यांनी ‘जय महाराष्ट्र, जय शिवराय’ अशी घोषणा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण केले.

मेहनतीचे फळ
काँग्रेसकडून गटनेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेससाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक होती. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला होता. या स्थितीत राज्यात नेटाने पक्षाचं नेतृत्व करत थोरात यांनी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवून दिले. त्याचीच बक्षिसी म्हणून थोरात यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर विदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या नितीन राऊत यांचाही मंत्रिपद देऊन सन्मान करण्यात आला आहे. राऊत हे पेशाने डॉक्टर असले तरी उत्तम वैमानिक आहेत. या दोघांकडे आघाडी सरकारच्या काळातील मंत्रिपदाचा अनुभव आहे.

राज ठाकरे आले…
महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंकडून आपले भाऊ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे ते येणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. ते पहिल्या रांगेत गजानन किर्तीकर यांच्या शेजारी बसले होते. मात्र नंतर नवाब मलिक यांनी त्यांची मनधरणी करीत ज्येष्ठ नेत्यांच्या रांगेत सर्वप्रथम मनोहर जोशी यांच्या शेजारी बसविल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

क्षणचित्रे

तुम्ही पुन्हा नको. तुम्ही पुन्हा नको.
या शपथविधी सोहळ्यात मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती. फडणवीस राज्यपालांसह स्टेजवर आल्यानंतर काही वेळातच उपस्थित शिवसैनिकांनी तुम्ही पुन्हा नको..तुम्ही पुन्हा नको…अशा घोषणा सुरुवात केल्या. तर प्रेक्षकांमधील काही शिवसैनिकांनी यावेळी त्यांना उलटा अंगठा दाखवून नाराजी दर्शवली.

चंपाच्या नावाने घोषणा
उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्यास भाजपकडून चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. शपथ विधी सुरू असताना कॅमेरा ज्यावेळी त्यांच्याकडे गेला तेव्हा उपस्थित शिवसैनिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंपा, चंपा अशा घोषणा सुरुवात केल्या. त्यानंतर ज्या ज्यावेळी कॅमेरा त्यांच्यावर आला तेव्हा त्याच घोषणांची पुनरावृत्ती करण्यात आली.

शिवसैनिकांचा उत्साहपूर्ण जल्लोष
शिवाजी पार्क येथे रंगलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आले होते. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांचे नाव पुकारण्यात आले. शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच उपस्थित शिवसैनिकांकडून एकच जल्लोष करण्यात आला. त्यातच शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुकाराच उपस्थितांचा उत्साह आणखीन वाढलेला दिसून आला.

छायाचित्रणासाठी गर्दी
या शपथविधीची साक्ष नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आले होते. शपथविधी सोहळा संपल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला गर्दी केली होती. आपल्या नेत्यांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाल्याने पोलिसांची दमछाक होताना दिसत होती.

आणि उद्धव ठाकरेनी घेतले मावशीचे आशीर्वाद
या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते. त्यात त्यांच्या मावशी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे यादेखील आल्या होत्या. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर कुंदा ठाकरे या उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर पोहचल्या. उद्धव ठाकरेंनी पदस्पर्श करून कुंदा ठाकरेंचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.

सेव्ह आरेच्या घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. शिवसेनेनेदेखील या प्रश्नात उडी घेतली होती. त्यामुळे आता शिवसेनेचे सरकार आल्यानंतर गुरुवारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ‘सेव्ह आरे’चा नारा आंदोलकांनी दिला. शिवसेना भवनजवळ या आंदोलनकर्त्यांनी ‘सेव्ह आरे’च्या घोषणा दिल्याने आता हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जैन साध्वींनी दिल्या शुभेच्छा
शपथविधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांसह अनेक दिग्गज नेत्यांनीही गर्दी केली होती. मात्र या गर्दीत सगळ्यांचे लक्ष वेधले ते या शपथविधीसाठी आलेल्या जैन साध्वींनी. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी उपस्थित साध्वींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.

ठाकरे कुटुंबीय सिद्धिविनायक चरणी
अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या राज्याच्या नवे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला शपथविधी पूर्ण केल्यानंतर प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाकडे गर्दी
शिवाजी पार्कावर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

शिवसेनेची वाटचाल

<13 ऑगस्ट 1960 – व्यंगचित्र मार्मिकची स्थापना
<19 जून 1966-शिवसेनेची स्थापना
<1967 सीमाभाग आंदोलन
<1967- ठाणे महापालिकेत सत्ता
<1970-वामनराव महाडिक विधानसभेत
<1971-शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते विजयी
<1972-प्रमोद नवलकर विधानसभेत तर मनोहर जोशी विधानपरिषदेत
<1974-सतीश प्रधान ठाण्याचे नगराध्यक्ष
<1977- शिवसेना भवनाची उभारणी
<1984- हिंदुत्वाच्या भूमिकेचा स्वीकार
<1985-मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आणि छगन भुजबळ महापौर
<1987-विलेपार्ले निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार
<23 जानेवारी 1988- मुखपत्र सामनाचे प्रकाशन
<1989-शिवसेना-भाजप युती
<1991-लोकसभा निवडणुकीत युतीला 10 जागा
<1992-बाबरी पडली आणि मुंबईत दंगल
<1193-मुंबईत बॉम्बस्फोट मालिका
<1195-99- राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार
<1999-राज्यात युतीचे सरकार गेले पण केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये सहभाग
<2002-उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदी निवड
<2003-शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र
<2005-नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
<2005- राज ठाकरे यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी
<2006-चिमूर पोटनिवडणूक,भाजपसोबत वाद
<2007- मुंबई महापालिकेत विजय
<2009- विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव
<2012- मुंबई महापालिकेत सेनेचा विजय
<2012-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन
<2014-लोकसभेत युतीला मोठे यश
<2014-विधानसभेत युती तुटली
<2017-महापालिका निवडणुकीत युती तुटली
<2018-अयोध्येत रामाचे दर्शन आणि गंगापूजन
<2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती परंतु,नंतर काडिमोड
<26 नोव्हेंबर 2019-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -