घरमुंबईवांद्य्रातील बंडखोरीमुळे चुरस वाढणार

वांद्य्रातील बंडखोरीमुळे चुरस वाढणार

Subscribe

मुंबईतील प्रमुख लढतींपैकी एक लढत म्हणून सध्या राज्याचे लक्ष हे मुंबईतील वांद्रे पश्चिम या मतदारसंघावर लागून राहिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या मातोश्रीच्या अंगणातच यंदा बंडखोरी झाल्याने सर्वांचे लक्ष या लढतीवर आहे. या बंडखोरीमुळे सध्या शिवसेनेत देखील दोन गट पडल्याचे चित्र वांद्रे येथे दिसून येत असून या बंडखोरीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातवरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या वांद्रे परिसरात दिसून आले आहे. या संभ्रमाच्या वातावरणाचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होण्याची शक्यता वर्तविली जात असून किंबहुना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पहिली सभा ही या मतदारसंघासाठी घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली असून या दोन्ही पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे. दोन्ही पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई केली असली तरी अनेक ठिकाणी बंडखोरांना अभय देण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचाच प्रत्यय या मतदारसंघात दिसून आले असून शिवसेनेच्या घरच्या मतदारसंघात सध्या बंडखोरी झाल्याने शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सेनेच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या येथील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी थेट बंडखोरीचे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

या बंडखोरीमुळे याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत दोन गट झाल्याचे चित्र या मतदासंघात दिसून आले आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे. सेनेला बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी ही शिवसेनेकडून अ‍ॅड. अनिल परब यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परब हे या मतदारसंघात ठाण मांडून बसले असून विरोधकांना शह देण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे फार्स सुरु केले आहेत. तर याठिकाणी काँग्रेसकडून बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या या प्रश्नांमुळे येथील स्थानिकांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने सध्या या मतदारसंघातील प्रचाराने आक्रमक स्वरुप घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी तृप्ती सावंत यांचा येथील स्थानिक मंडळांशी असलेल्या जनसंपर्क लक्षात घेता त्यांनीही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेतील या वादाचा फटका उचलण्यासाठी सध्या मनसेकडून जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले आहेत. मनसेकडून सध्या याठिकाणी अखिल चित्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अखिल चित्रे यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली असून प्रचारात सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांना वांद्य्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

या मतदारसंघात एकीकडे वांद्रे टीचर्स कॉलनीपासून कलानगरसारख्या शिक्षित आणि उच्चभ्रू लोकवस्ती असून दुसरीकडे बेहरामपाडा आणि गोळीबार नगर येथील झोपडपट्टी विभाग देखील येतो. त्याचप्रमाणे येथे अनेक जाती धर्मांचे लोकवस्ती असल्याने मतदारावर त्याचा परिणाम होत असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील दिसून आले आहे.येथील फेरीवाल्यांप्रमाणेच खड्ड्यांच्या प्रश्नांनी यंदाच्या पावसाळा चांगलाच गाजला होता. तर काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील शासकीय वसाहतींचा प्रश्नही चर्चेत आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -