घरमहाराष्ट्रअश्रूंचा झाला खेळ!

अश्रूंचा झाला खेळ!

Subscribe

भावा-बहिणीचा वाद विकोपाला,राजकारण सोडावंस वाटतंय-पंकजा ,जीवनच संपवावंसं वाटतंय-धनंजय

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडेंच्या घराण्यातील वाद विकोपाला गेला असून भाऊबंदकीने कळस गाठला आहे. प्रचार सभेत धनंजय यांनी खालच्या पातळीवर आपल्यावर टीका केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. यामुळे आपल्याला ‘राजकारण सोडावंसं वाटतंय’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. बहिणीच्या आरोपाला उत्तर देताना धनंजय मुंडे निराशेच्या खोल गर्तेत गेले असून राजकारण तर नकोच, पण मला ‘जीवन संपवावंसं वाटतंय’, अशी खंत त्यांनी पत्रकारांना बोलून दाखवली. यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

या भाऊ बहिणीच्या ‘अश्रूंच्या खेळा’त परळीकर मतदार वाहून जात कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे चुलत भाऊ बहीण बीड जिल्ह्यातील परळीत विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकल्याने महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अतिशय चुरशीची अशी ही लढत असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंडे घराण्यातील वादाचा कहर झाला. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप शनिवारी संध्याकाळी व्हायरल झाली.

- Advertisement -

यात धनंजय यांनी पंकजा यांच्यावर घाणेरड्या शब्दात आरोप केल्याचे दिसत आहे. ‘धनंजय मुंडे यांनी घाणेरड्या शब्दात आरोप केल्यामुळे पंकजाताई खिन्न झाल्या आहेत. हे आरोप त्यांना सहन झाले नाहीत. धनंजय यांच्या वक्तव्यानंतर राजकारण सोडून द्यावे’, अशी त्यांची भावना झाली असल्याचे पंकजा यांची धाकटी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले.

पंकजा यांच्या आरोपामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावरुन मोठा रोष उसळल्यामुळे धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘काही जणांना मी पृथ्वीतलावरच नको आहे. मी मतांचे राजकारण कधीही केले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण सुरू असून मला आता जगावंसं वाटत नाही. निवडणूक पुन्हा एकदा मला खलनायक बनवत आहे. ज्यांना विष कालवायचे होते त्यांनी त्यांचे काम केले. आता राजकारण नको आणि जीवनही नको’, असे धक्कादायक वक्तव्य करताना धनंजय यांच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या वक्तव्याच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे धनंजय यांना महिला आयोगाने या प्रकाराबद्दल सुमोट नोटीस बजावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -