घरमहाराष्ट्रराहुल यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस संकटात

राहुल यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस संकटात

Subscribe

सलमान खुर्शीद यांचे मत

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढले आहे. आमचे नेते सोडून गेले ही पक्षासमोर मोठी समस्या आहे. सध्या पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी आहे. काँग्रेस पक्ष सध्या आपले भविष्यही ठरवू शकत नाही, असे मत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अद्याप सावरलेला नाही. पक्षात एकंदरीतच गोंधळाची स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी घाईगडबडीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावावर विचार केला जाणार असल्याचेही खुर्शीद यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचे एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठे संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ अध्यक्षपद रिक्त होते म्हणून त्या या पदावर असल्याची त्यांची धारणा आहे. परंतु असे असू नये अशी मी आशा करतो, असे खुर्शीद म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -