सोनिया गांधी यांची भेट स्थगित करुन शरद पवारांनी बोलावली बैठक

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Mumbai
sharad pawar speech
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्ली जाणार होते. मात्र, पवार यांनी ही भेट पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट रद्द करुन शरद पवार यांनी रविवारी संध्याकाली ४ वाजता पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरु होत्या. या बैठकींसाठी दिल्लीतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आले होते. या बैठकीत सरकार स्थापन झाल्यावर समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला होता. या मसुद्यावर तिन्ही पक्षांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडे हा मसुदा पाठवला जाऊन शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान, उद्या राष्ट्रवादीची शरद पवार यांनी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. या बैठकीत या मसुद्यावर स्वाक्षरी केले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील राष्ट्रीय घडामोडींना वेग कायम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन २२ दिवस उलटून गेले. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील राजकीय स्थिती पाहून राज्यपालांनी अखेर राष्ट्रपती राजवट लागू केली. ही राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग कायम आहे. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांच्या बैठका होत आहेत.