सेनेनं राजकारणाचा व्यापार केला नाही – संजय राऊत

सत्तास्थापनेसाठी भाजपला आमच्या शुभेच्छा असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Mumbai
sanjay raut
शिवसेनेचे खासदार संजय राऊत

एकीकडे भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असताना दुसरीकडे शिवसेना मात्र आजही शड्डू ठोकून बसली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बहुमत सिद्ध करण्यासाठी संजय राऊत यांनी भाजपला शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवाय, भाजपवर टीकास्त्रही सोडलं. बहुमत विकत घेऊ शकतो, या भ्रमाचा भोपळा फुटला अशी टीका संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर केली आहे. अयोध्याप्रकरणाचा निकाल कुण्या एका पक्षाचा नाही. अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाला हा संपूर्ण देशासाठी असल्याचंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – अभिजित बिचुकले राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार; बिचुकलेंचे आमदारांना पत्र


 

गेल्या १५ दिवसांत भाजपने का दावा केला नाही? – राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे चतुर आणि चाणाक्ष नेते आहेत. प्रत्येकाला असंच वाटतंय की महाराष्ट्रात स्थिर सरकार यावं. त्यामुळे, जर भाजपकडे बहुमत असेल तर त्यांना सत्तास्थापनेसाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनीही त्यांना आमंत्रण दिलं आहे. पण, निकालानंतर २४ तासांत भाजपने दावा केला पाहिजे होता. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत भाजपने का दावा केला नाही? असाही सवाल राऊत यांनी केला आहे.

शिवसेना आमदारांची द रिट्रीट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक

दरम्यान, दुपारी १२.३० वाजता शिवसेना आमदारांची बैठक आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. तसंच, काल रात्रीपासून आदित्य ठाकरे तिथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे, या बैठकीत नेमका काय निर्णय आणि चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.