भाजपला खोटं ठरवण्याचा कुणी प्रयत्न करू नये – सुधीर मुनगंटीवार

Mumbai
Finance Minister Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला भाजपकडून लगेच प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘भाजपसाठी सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्यांनी मोदींवर टीका केली नाही. इतर नेत्यांनी केलेली टीका ते ऐकवतात. पण ज्यांनी मोदींवर टीका केली, ते कधीही तेव्हा भाजपसोबत सत्तेत नव्हते. आम्ही उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप फेटाळून लावतो’, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातला हा वाद चांगलाच तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही आपणच खरं बोलत असल्याचे दावे आज पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.


हेही वाचा – राज्यात पुढचे सरकारही भाजपचे असणार; मात्र घोडेबाजार करणार नाही-फडणवीस

संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत ‘अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाविषयी बोललोच नव्हतो’, अशी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन ‘अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत होकार दिला होता’, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा आज देखील सुटला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पदाचा राजीनामा दिला असून इथून पुढे नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

दरम्यान, ‘दुश्यंत काय म्हणाले किंवा उदयनराजे काय म्हणाले याचं कारण पुढे करून तुम्ही गेल्या ५ वर्षांमध्ये भाजप नेतृत्वावर केलेल्या टिकेचं समर्थन होऊ शकणार नाही. भाजपला सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे’, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.