शिवसेनेच्या आदित्यसोबत आता भाजपचाही ‘आदित्य’, २ सभा घेणार!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत येत असून गुरुवारी ते २ सभा घेणार आहेत.

Mumbai
aaditya thackeray
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

भाजप-शिवसेनेची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी यांच्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं योगी आदित्यनाथ कार्ड वापरायचं ठरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दोन सभा गुरुवारी म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहेत. यात एक सभा भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असून दुसरी सभा शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आहे. या सभांशिवाय महाराष्ट्रात अजून दोन ठिकाणी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष्य

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जेमतेम आठ ते दहा दिवस शिल्लक असून प्रचाराचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई-ठाणे पट्ट्यातील उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून योगी आदित्यनाथ यांच्यासह राजनाथ सिंह, तसेच बिहारमधील नेत्यांना निवडणूक प्रचाराचे निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे उद्या दुपारी तीन वाजता काळबादेवी येथे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. काळबादेवीच्या सभेनंतर आदित्यनाथ हे कांदिवलीतील उमेदवार अतुल भातखळकर यांच्यासाठी संध्याकाळी सहा वाजता सभा घेणार आहेत.


हेही वाचा – ‘चंपा’ला पवार साहेबांशिवाय काही दिसत नाही-अजित पवार

राज्यात एकूण ४ सभा

मुंबईसह अन्य दोन ठिकाणी योगी आदित्यनाथांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासाठी फुलंब्री मतदरासंघात तर परभणीत शिवसेना उमदेवारांसाठी ते सभा घेतील, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना, ‘आम्ही सत्तेसाठी रामाचा वापर करणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रभू रामचंद्रांप्रमाणे वचनबद्ध राहा’, असा टोला भाजपला लगावला होता. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ काय बोलतात? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.