घरमुंबईविधीमंडळ अधिवेशनात फडणवीसांचे शक्तीप्रदर्शन

विधीमंडळ अधिवेशनात फडणवीसांचे शक्तीप्रदर्शन

Subscribe

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन

फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अखेरचे विधीमंडळ अधिवेशन उद्या, सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच राज्यमंत्री मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम आटोपण्यात आला आणि त्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाच भाजपात प्रवेश देऊन त्यांचा मंत्रीमंडळात सामावेश करून मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे आज शक्तीप्रदर्शन केले. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने पक्षात घेऊन त्यांना मंत्रीपद देऊन सेनेनेही यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी प्रबळ आणि विरोधक दुर्बल दिसणार आहेत.
या अधिवेशनात १३ नवीन आणि १५ प्रलंबित विधेयके यामध्ये १२ विधानसभेत आणि ३ विधेयके विधान परिषदेत अशी एकूण २८ विधेयक चर्चेला येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिली. सह्याद्री अतिथीगृहात सरकारी शिष्टाचारानुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान विरोधकांनी या चहापानावर घातलेल्या बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, विशेषतः दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘सुमारे ४७०० कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात सरकारने जमा केले आहे. ३२०० कोटी रुपये विम्याचे अनुदानाचे वाटप सुरु आहे. आवश्यक तेवढ्या चारा छावण्या तयार केल्या आहेत. यामध्ये जनावरांच्या पालन-पोषणाचा दर वाढवला, टँकरने पाणी पुरवठा केला. तसेच चारा छावणीच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येऊ नये, यासाठी जनावरांचे टॅगिंग करण्यात आले. पहिल्यांदाच छोट्या जनावरांसाठीही चारा छावण्यात तयार केल्या. त्या व्यवस्थित सुरु आहेत. तसेच पीएम किसान योजने अंतर्गत १ कोटी २० लाख शेतकर्‍यांना थेट निधी देण्याचा निर्णय’ झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

विरोधक अजूनही भ्रमात
दरम्यान, चहापानावर बहिष्कार घालत विरोधकांनी हे सरकार आभासी असल्याची टीका केली. ‘विरोधक आरोप करीत आहेत, मात्र, ते स्वतःच या भ्रमात आहेत. त्यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. म्हणूनच यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला’, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, विरोधकांकडे एकही नवीन मुद्दा नसल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसले. मात्र तरीही विरोधक जे मुद्दे मांडतील त्याला आम्ही जसासतसे उत्तर देऊ. तसेच, आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी ज्या समाजाला फसवले, त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षाने सांगितले की मराठा आरक्षणात घोळ झाला, पण इतकी वर्षे कुणी घोळ केला हे सांगायची गरज नाही, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारची कामगिरी आभासी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
पाच वर्षात कोणतही ठोस काम न करणारे आणि केवळ आभास निर्माण करणारे,अशी सरकारची कामगिरी आजवर राहिली आहे. हे अधिवेशन सरकारचे शेवटच अधिवेशन असेल. सामान्य जनतेसाठी कोणतही ठोस काम करण्याकडे या सरकारचे लक्ष नाही. म्हणूनच सरकारच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याचे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना जाहीर कर्जमाफी तर दूरच पण १२ टक्के ते १३ टक्के व्याजाची आकारणी करून शेतकर्‍यांची लुटमार सुरू आहे. सध्याचे फडणवीस सरकार हे शेतकर्‍यांच्या पुनर्गठित कर्जावर १२ टक्के ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारत आहे अशी टीका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारने रोजगार हमी योजनेची कामे दिलेली नाहीत. राज्यात पाणी स्थितीही अनेक ठिकाणी गंभीर आहे. तसेच चारा छावणीमुळे मराठवाड्यात जनावरे मृत्यूमुखी पडल्याची उदाहरणेही समोर आलेली आहेत. राज्य सरकारच ग्रामीण भागाकडे लक्ष नाही, तर शहरी भागाकडेही नागरिकांचे पायाभूत सुविधांच्या निमित्ताने हालच आहेत. लोकसभेला मोदी लाट होती, पण विधानसभेला मात्र ही हवा नसेल असे मत काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त झालेले विरोध पक्ष नेतेपद हे विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले आहे. आघाडीमध्ये यासाठी एकोप्याने निर्णय झाला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -