घरमुंबईहाफकिनमार्फत औषध खरेदीला जे.जे.ची बगल

हाफकिनमार्फत औषध खरेदीला जे.जे.ची बगल

Subscribe

थेट बाजारातून औषध खरेदीला प्राधान्य

राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांना लागणारी औषधे हाफकिन बायो फार्मासिट्युकलमार्फत खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या जे.जे. हॉस्पिटलने याला बगल दिली आहे. हाफकिनकडून वर्षभराचा औषधांचा आवश्यक कोटा मागवण्याऐवजी जे.जे. हॉस्पिटल अर्धा कोटा मागवते. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र जे.जे. हॉस्पिटल प्रशासानकडून उर्वरित औषधे थेट बाजारातून खरेदी करण्यात येत आहेत. हॉस्पिटल प्रशासनाच्या या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी कोट्यवधींचा आर्थिक फटका बसत आहे.

आर्थिक वर्षे संपण्यापूर्वी राज्यातील सर्व हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजांना वर्षभरासाठी लागणार्‍या औषधांच्या मागणीची यादी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) मागवण्यात येते. त्यानुसार सर्व हॉस्पिटलकडून आवश्यक औषधांची यादी पाठवण्यात येते. राज्यभरातून आलेल्या मागणीच्या आधारे डीएमईआरकडून हाफकिन बायो फार्मासिट्युकलकडे औषधांची यादी पाठवण्यात येते. मात्र राज्यातील बहुतांश हॉस्पिटल व कॉलेजांकडून त्यांना आवश्यक कोट्यापेक्षा अपुर्‍या कोट्याची यादी डीएमईआरकडे पाठवण्यात येते. यामध्ये राज्यातील सर्वात महत्त्वाचे व मोठे समजले जाणारे जे.जे. हॉस्पिटल आघाडीवर आहे. 2019-20 आर्थिक वर्षासाठी डीएमईआरने तब्बल 3500 पेक्षा अधिक प्रकारची औषधांची मागणी हाफकिनकडे केली आहे.

- Advertisement -

मात्र जे.जे. हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना वर्षाला आवश्यक कोट्यापेक्षा फारच कमी औषधाच्या साठ्याची मागणी डीएमईआरकडे केली आहे. वर्षभरासाठी लागणार्‍या औषधाच्या साठ्यापेक्षा कमी साठा मागवणार्‍या जे.जे. हॉस्पिटल प्रशासनाने एप्रिल ते जुलै 2019 दरम्यान लागलेल्या सर्व औषधांची खरेदी थेट बाजारातून केली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ही खरेदी केली आहे. थेट बाजारातून औषधे खरेदी करण्याच्या प्रकारामुळे दरवर्षी सरकारला कोट्यवधीचा फटका सहन करावा लागत आहे. याबाबतची माहिती ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनेचे अध्यक्ष अभय पांडे यांनी डीएमईआरच्या संचालकांना पत्रातून कळवली आहे.

जे.जे. हॉस्पिटलने 2018-19 या आर्थिक वर्षात 409 प्रकारची इंजेक्शन वापरली. परंतु 2019-20 आर्थिक वर्षासाठी डीएमईआरकडे पाठवलेल्या मागणीमध्ये फक्त 128 प्रकारच्या इंजेक्शनचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी 444 प्रकारच्या गोळ्या व कॅप्सूल लागल्या मात्र फक्त 114 प्रकारच्याच गोळ्या व कॅप्सूलची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सर्जिकल ड्रेसिंगसाठी लागणार्‍या 55 पैकी 33 साहित्यच मागवले आहेत. त्याचप्रमाणे सर्जिकल ड्रग्जमध्ये 469 पैकी 92 ड्रग्जची मागणी केली आहे. यातून बाजारातून थेट औषधांची खरेदी करण्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

- Advertisement -

कर्करोगाच्या औषधांची कमी मागणी
सध्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, कर्करोग ही आरोग्य सेवेसमोरील एक मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी जे.जे. हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले. मात्र उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या 186 औषधांपैकी फक्त आठच औषधांची मागणी हॉस्पिटलकडून हाफकिनकडे करण्यात आली आहे.

जे.जे. हॉस्पिटलमधील औषधांची माहिती

उत्पादने वापरलेल्या औषधांची संख्या मागणी केलेली औषधे
टॅबलेट, कॅप्सूल 444 114
इंजेक्शन 409 128
औषधे व मलम 252 35
जंतूनाशक 35 12
IV फ्ल्युईड 66 20
सर्जिकल ड्रेसिंग 55 33
सर्जिकल ड्रग्ज 469 92
टाक्याचे साहित्य 431 95
अ‍ॅण्टी कॅन्सर 186 8

हॉस्पिटलला वर्षभर लागणार्‍या औषधांची मागणी डिसेंबरपूर्वीच पाठवण्यात आली आहे. मी नियुक्त झाल्यानंतर त्यामध्ये ज्या औषधांची कमी होती, त्यामध्ये दुरुस्ती केली. काही गोष्टी कमी-जास्त प्रमाणात लागतात. कमी पडल्यास आपण अन्य कॉलेजकडून औषधे मागवतो. त्यांच्याकडून न मिळाल्यास हाफकिनकडे मागणी करतो. हाफकिनकडून काही कारणास्तव पुरवठा होण्यास विलंब झाल्यास आपण स्थानिक बाजारातून खरेदी करतो.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, जे.जे. हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -