घरमुंबईआता तरी चुका सुधारा, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल ...

आता तरी चुका सुधारा, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल …

Subscribe

ठाण्यातील महासभेत सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील होणारी पूर परिस्थितीबाबत अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले.

मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात पूर परिस्थिती उद्भवली. त्यामुळे हजारो रहिवाश्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारच्या महासभेत उमटले. मात्र ही परिस्थिती का उद्भवली याचा सर्वांनी विचार केला पाहिजे अशी सूचना सर्वच नगरसेवकांनी मांडली. आता तरी चूका सुधारा अन्यथा पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल?, असाही सवाल नगरसेवकांनी केला.

सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने ठाण्याची दैना उडवली. चाळीत राहणाऱ्या नागरिकांप्रमाणेच टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या ठाणेकरांनाही पूर परिस्थिचीचा सामना करावा लागला. यापूर्वी शहरात अनेकवेळा पाणी साचले. मात्र त्याचा निचरा त्याच तत्परतेने व्हायचा पण यावेळी भयानक स्थितीला तोंड दयावे लागल्याने नगरसेवकांनी महासभेत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

नाल्यावरील अतिक्रमण, नाल्याच्या प्रवाह बदलणे, खाडी किनारी खारफुटीची कत्तल करून अनधिकृत बांधकाम, पाण्याचा निचरा करण्याच्या नियोजनाचा बिल्डरांचा अभाव, रस्त्यावर टाकण्यात आलेले डेब्रीजचा भराव या सगळ्यावर प्रशासनाचा कानाडोळा आदी कारणांचा नगरसेवकांनी उहापोह केला. ठाणे शहरात असलेले मुख्य प्रवाहाचे १२ नाले ज्यामधून पाण्याचा निचरा होतो त्या नाल्यांवर अतिक्रमणे झालीत. पावसाळ्यापूर्वी मेट्रोची कामे थांबवावी असे पत्र दिले होते. सर्व्हिस रोड खोदून ठेवलाय. पालिकेचे अडीच हजार कोटीचे बजेट आहे. मात्र कोणतेही नियोजन नसल्याची नाराजी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली. आता चुका सुधारल्या नाहीत तर, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या चूका आपण वेळीच दुरूस्त केल्या पाहिजेत, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.

डेब्रीज टाकणारा ठेकेदार कोण?

रस्त्यावरील डेब्रिजमुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या याकडे माजी विरोधी पक्षनेते नजीबमुल्ला यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ठाणे शहरातील डेब्रीज ठिकठिकाणी खाडी किनारी टाकण्यात आले. शहरातील विविध बांधकामातून निघणाऱ्या डेब्रीजचे रिसायकलिंग करण्याचा प्लांट सुरू करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काय झाले? डेब्रीज उचलण्यासाठी ठेकेदाराला पैसे दिले जातात. आता पर्यंत ठेकेदाराला किती पैसे दिले? असे सवाल मुल्ला यांनी प्रशासनाला केला.

- Advertisement -

पुरपरिस्थितील लोकांना मदत करा

कळवा, मुंब्रा, दिवा, ठाणे, घोडबंदररोड परिसरात अतिवृष्टीने लोकांची घरे पाण्याखाली आली. मुंब्रा परिसरात चाळीत राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. त्यांना पुन्हा संसार उभा करण्यासाठी पालिका प्रशासनाने २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नगरसेवक शानू उर्फ अशरफ पठाण, अशरीन राऊत, भारत चव्हाण, विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -