घरमहाराष्ट्रसांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू

Subscribe

सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये एनडीआरएफचं बचावकार्य सुरू असताना एक बोट उलटल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बोटीत सुमारे २५ ते ३० जण असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि आसपासच्या भागामध्ये निर्माण झालेल्या पूर स्थितीमध्ये NDRFकडून बचावकार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलं आहे. मात्र, आज या बचावकार्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये बचावकार्य सुरू असताना एका खासगी बोटीमध्ये सुमारे ३० जणांना घेऊन जात असताना ही बोट उलटल्यानं बोटीतले सर्वजण पाण्यात पडले. ही बोट ब्रह्मनाळहून खटावकडे जात होती. यातल्या १५ जणांना वाचवण्यात यश आलं असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ महिलांचा समावेश असल्याची देखील माहिती मिळत आहे. एकीकडे एनडीआरएफचे जवान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या बोटीत गरजेपेक्षा जास्त लोक चढल्यामुळेच बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच प्रशासनाने नागरिकांनी समजुतदारपणा दाखवत संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

ग्रामपंचायतीच्या बोटींनी ३२ लोकं तिथून निघाले होते. त्यांनी स्वत:ची बोट वापरली होती. पण ती बोट पलटल्यामुळे आत्तापर्यंत १२ मृतदेह सापडले आहेत. त्यातले १९ लोकं काठावर सुरक्षित पोहोचले आहेत. त्याव्यतिरिक्त उरलेल्या ४ बेपत्तांचा शोध सुरू आहे.

दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, सांगली

लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धरणातलं पाणी जर थोडं आधी सोडलं असतं तर सांगलीतली गावं पाण्याखाली जाण्याची परिस्थिती ओढवली नसती. पण सध्या सगळयांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. मदत करणाऱ्या बोटी स्थानिक आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच लाइफ सपोर्ट जॅकेट देणं देखील गरजेचं आहे.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मृत व्यक्तींची नावे

  • कल्पना कारंडे
  • कस्तुरी वडेर
  • लक्ष्मी वडेर
  • राजमती चौगुले
  • जयपाल चौगुले
  • बाबासो पाटील
  • आप्पासो पाटील
  • दोन अनोळखी मृतदेह, त्यात एका बाळाचा समावेश

बेपत्ता

  • पिल्लू तानाजी गडदे

हेही वाचा – सांगली, कोल्हापूर, कोकणात महापूर

दरम्यान, जी बोट पलटली, ती बोट खासगी असल्याचं आता समोर आलं आहे. एनडीआरएफची मदत वेळेवर पोहोचली नसल्यामुळेच स्थानिक ग्रामपंचायतीनं त्यांची बोट पाण्यात उतरवून बचावकार्य सुरू केलं होतं. आणि त्यातच ही बोट उलटून दुर्घटना घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीतील आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आरोपांचा रोख एनडीआरएफच्या दिशेने वळू लागला आहे. दरम्यान, अजूनही घटनास्थळी बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -