घरक्रीडाभारतीय संघात पाच नवोदित

भारतीय संघात पाच नवोदित

Subscribe

आगामी जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी गुरुवारी १० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात अनुभवी सरिता देवीसह (६० किलो वजनी गट) पाच नवोदित बॉक्सर्सची निवड करण्यात आली आहे. २००६ जागतिक स्पर्धेत सुवर्ण मिळवणार्‍या सरिताचे १३ वर्षांनंतर या स्पर्धेत पुन्हा पदक मिळवण्याचे लक्ष्य असेल. सरितासोबतच या संघात सहा वेळा विश्व विजेत्या मेरी कोमचा समावेश करण्यात आला आहे.

मेरीने मागील काही महिन्यांत अप्रतिम कामगिरी केल्यामुळे चाचणी स्पर्धेत सहभागी न होताच तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ती या स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात खेळेल. चाचणी स्पर्धेत न खेळताच मेरीची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याने २३ वर्षीय माजी ज्युनियर विश्व विजेत्या निखत झरीनने नाराजी व्यक्त केली. तिला या चाचणीत खेळण्यापासून अडवले गेले असा निखतने आरोप केला.

- Advertisement -

जागतिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावणारी नीरज (५७ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) या दोघींना स्थान मिळाले आहे. मेरीप्रमाणेच या दोघींची चाचणी स्पर्धेत न खेळताच मागील काही महिन्यांतील कामगिरीच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली. मंजू राणी (४८ किलो), जमुना (५४ किलो), नीरज (५७ किलो), मंजू बोंबोरिया (६४ किलो) आणि नंदिनी (८१ किलो) या पाच बॉक्सर्स जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहेत.

जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्‍या लोव्हलीना बोर्गोहेनचाही (६९ किलो) यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आठ वेळा आशियाई पदक विजेत्या सरिताने चाचणी स्पर्धेत सिमरनजीत कौरवर मात करत जागतिक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले. मागील महिन्यात झालेल्या प्रेसिडेंट चषक स्पर्धेत सिमरनजीतने सुवर्णपदक पटकावले होते. चाचणी स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात मंजूने मोनिकाचा, तर ५४ किलो वजनी गटात जमुनाने शिक्षाचा पराभव करत जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले.

- Advertisement -

भारतीय संघ –

मंजू राणी (४८ किलो), मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो), नीरज (५७ किलो), सरिता देवी (६० किलो), मंजू बोंबोरिया (६४ किलो), लोव्हलीना बोर्गोहेन (६९ किलो), स्विटी बुरा (७५ किलो), नंदिनी (८१ किलो), कविता चहल (+८१ किलो).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -