घरमहाराष्ट्रनाशिकरद्द झालेल्या नाटकाचे डिपॉझिट गिळंकृत

रद्द झालेल्या नाटकाचे डिपॉझिट गिळंकृत

Subscribe

सुप्रिया पठारे, विजय पाटकर यांची महापालिकेच्या कारभारावर नाराजी

नाट्यगृहांसाठी तयार केलेल्या जाचक नियमावलीचा फटका कलाकारांना अजूनही बसत असून प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पठारे आणि विनोदी अभिनेता विजय पाटकर यांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात रविवारी (दि. २५) जाहीर नाराजी व्यक्त केलीे. महाकवी कालिदास कलामंदिरातील नाट्यप्रयोग रद्द झाल्यानंतर महापालिकेने यापूर्वी घेतलेले शुल्क आणि अनामत रक्कम परत देण्याऐवजी हात वर केल्याने हा वाद उफाळून आला आहे. या नियमावलीमुळे कालिदासच्या नाट्यप्रयोगांची संख्याही कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत सातत्याने चर्चा होत असते. नाट्यगृहाच्या दुरवस्थेने वैतागून काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तर वैभव मांगले यांच्या सहकलाकाराची बॅग कलामंदिराच्या आवारात उभ्या असलेल्या बसमधून चोरीस गेल्याने या कलाकारांनीही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नाटक सुरु असताना प्रेक्षकांनी वारंवार व्यत्यय आणल्याने काही महिन्यांपूर्वी सुमीत राघवन यांनी नाट्यप्रयोग थांबवला होता. त्यामुळे कालिदास कलामंदिराच्या बाबतीतील एकूणच अव्यवस्थेविषयी संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता सुप्रिया पठारे आणि विजय पाटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी भर घातली.

- Advertisement -

पठारे आणि पाटकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दहा बाय दहा’ नाटकाचा प्रयोग कालिदास कलामंदिरात १२ जुलैला आयोजित करण्यात आला होता. परंतु तत्पूर्वी पठारे यांची प्रकृती बिघडल्याने हा नाट्यप्रयोग रद्द करण्याची वेळ आली. अशा वेळी काही रक्कमेत कपात करून उर्वरित शुल्क आणि भरलेली अनामत रक्कम संबंधितांना परत देणे गरजेचे होते. मात्र, कालिदासच्या व्यवस्थापकांनी नियमावलीकडे अंगुलीनिर्देश करत पैसे देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, याच वेळी ठाण्याचा नाट्यप्रयोगही रद्द करण्यात आला होता. मात्र, ठाण्यातील रंगायतने भाड्यातील अर्धी रक्कम कापली. उर्वरित रक्कमेबरोबर अनामत रक्कमही परत दिली. कालिदास कलामंदिराच्या बाबतीत मात्र या कलाकारांनी उलट अनुभव आला. नाशिकमध्ये ‘दहा बाय दहा’ नाटकाचा प्रयोग रविवारी (दि. २५) झाला. या प्रयोगासाठी आलेल्या पठारे आणि पाटकर यांनी नाट्यगृहाबाबत बनवलेल्या नियमावलीवर माध्यमांशी बोलताना प्रचंड नाराजी व्यक्त केली.

मुंढेंचा धाक; उत्पन्नासह नाट्यप्रयोगात घट

- Advertisement -

२०१७ ला कालिदास कलामंदिराचे ७७ लाख ८८ हजार इतके उत्पन्न होते. २०१८ ला नूतणीकरणासाठी कलामंदिर नऊ महिने बंद होते. नूतणीकरणानंतर वर्षभरात उत्पन्नात सुमारे २० लाखांनी घट झाली आहे. या वर्षभरात केवळ ६२ लाख ४७ हजारांवरच समाधान मानावे लागले आहे. म्हणजेच कालिदासमध्ये होणार्‍या नाट्यप्रयोगात घट झाल्याचे यावरुन स्पष्ट होते. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावली बदलल्यामुळे आता त्यात फेरबदल करण्याचे धाडस कुणीही करीत नसल्याचे एका कर्मचार्‍याने सांगितले.

नाशिकमध्ये वेगळा नियम असे का?

नाट्यप्रयोग कुणी हौस म्हणून रद्द करीत नाही. माझ्या आजारपणामुळे तो रद्द करावा लागला. अशा वेळी महापालिकेने नाटकाचे भाडे आणि डिपॉझिट अशा दोन्ही रक्कमा जप्त केल्या तर निर्माते आणि नाट्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाच्या बाबतीत वेगळा नियम आणि नाशिकमध्ये वेगळा नियम असे का? हा नियम तातडीने बदलण्यात यावा. – सुुप्रिया पठारे, प्रसिद्ध अभिनेत्री

हा तर नियमांचा अतिरेक

नाटकाचा प्रयोग रद्द केल्यानंतर भाड्यातून काही रक्कम कापून घेतली तर आम्हीही समजू शकतो. पण डिपॉझिट देण्यास नकार देणे हा नियमांचा अतिरेक म्हणावा लागेल. अशाने कोणताही नाट्यनिर्माता नाशिकमध्ये नाटक आणण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. – विजय पाटकर, प्रसिद्ध विनोदी अभिनेता

आयुक्तांनी फेरबदल करण्याची ग्वाही दिली

महापालिकेने केलेल्या नियमावलीच्या बाबतीत यापूर्वीही वारंवार चर्चा झाली आहे. प्रशांत दामले यांनीदेखील या नियमावलीवर नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी कलाक्षेत्रातील मान्यवरांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यावेळी महासभेत पुन्हा नियमावली सादर करून फेरबदल करण्याची ग्वाही त्यांनी दिली. – जयप्रकाश जातेगावकर, नाट्यसेवा संस्था

नियमावलीप्रमाणे अमलबजावणी

नियमावलीप्रमाणे आम्ही अमलबजावणी करतो. नाट्यप्रयोग रद्द झाल्यास भाडे आणि डिपॉझिट देण्याची कोणतीच तरतूद नियमावलीत नाही. त्यामुळे आम्ही त्यावर काहीही करू शकत नाही. – बाळासाहेब गीते, व्यवस्थापक, कालिदास कलामंदिर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -