घरमहाराष्ट्रबंडाळीनंतर बदलता वारा शहापूरात बरोरा वि.दरोडा

बंडाळीनंतर बदलता वारा शहापूरात बरोरा वि.दरोडा

Subscribe

शहापूर विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षातील उमेदवारांपैकी विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्ष अदलाबदली केलेल्या दोन्ही उमेदवारांतील दौलत दरोडा व पांडुरंग बरोरा या दोघा दिग्गजांंची प्रतिष्ठा विधानसभा निवडणुकीत पणाला लागली आहे .या दोघांभोवतीच शहापूर विधानसभेची निवडणूक फिरत असून येत्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षांत चुरशीची अशी लढत होणार असल्याचे पाहण्यास मिळेल. बरोरांच्या सेनेतील उमेदवारीला कडाडून विरोध असल्याने शिवसेनेतील दरोडा समर्थक गटाने बरोरांचा पराभव करण्यासाठी रणनिती आखली आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक सहज सोपी जाणार नाही. यामुळे विधानसभा जिंकणे शिवसेनेस जड जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत पांडुरंग बरोरांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. केवळ विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरीता बरोरांनी सेनेत प्रवेश केला असून दरोडांचा पत्ता कट करण्यासाठी सेनेतील एका गटाचा हा डाव असल्याचा आरोप आहे. शिवसेनेतील दरोडा गटाने उघड उघड बंड पुकारले आहे. यात स्वत: शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा हे सर्वात पुढे होते. दरोडा समर्थकांनी बरोरांना उमेदवारी देऊ नका यासाठी संघटीत होत शिवसेना भवन येथे सेना नेत्यांच्या भेटी घेतल्या. आम्हाला पाच इच्छुक उमेदवारांपैकी एका निष्ठावंत शिवसैनिकास विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे सेनेतील वाद चव्हाट्यावर देखील आले.

- Advertisement -

पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर सेनेतील पक्षश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणाला शहापूरातील स्थानिक सेनेतील विरोधाला न जुमानता ऐनवेळेस शिवसेनेचा एबी फॉर्म अखेर पांडुरंग बरोरा यांना दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या दरोडांनी दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करुन बरोरांना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आव्हान दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता खरी रंगत चढली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती नव्हती. यावेळी भाजपा उमेदवाराने येथे तीन नंबरवर लढत दिली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील निवडणुकीत भाग घेतला होता, मात्र, या होणार्‍या निवडणुकीत शहापूर विधानसभेसाठी मनसेने आपला उमेदवार अध्याप निश्चित केलेला नाही. सेनेतील अंतर्गत वाद व बरोरांच्या उमेदवारीला विरोध यामुळे शिवसेनेला ही निवडणूक जिंकणे कठीण जाणार आहे. दरोडा आणि बरोरा या दोघा आदिवासी उमेदवारांचे पुढील राजकीय अस्तित्व या निवडणुकांच्या यशावरच अवलंबून आहे हे तितकेच खरे आहे.

- Advertisement -

प्रमुख समस्या –

पाणीटंचाई ,बेरोजगारी ,रखडलेले सिंचन प्रकल्प , शहापूर शहारातील वाहतूक कोंडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची वाणवा , ग्रामीण रस्त्यांची दैन्यावस्था.

२०१४ च्या निवडणुकीतील मताधिक्य

पांडुरंग बरोरा ( राष्ट्रवादी काँग्रेस) ५६ हजार ७०२

दौलत दरोडा (शिवसेना) ५१ हजार १७४

अशोक इरनक(भाजप) १८ हजार २२२

ज्ञानेश्वर तळपाडे(मनसे) ६ हजार ५६८

पद्माकर केवारी (काँग्रेस) ६ हजार ६८४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -