घरमुंबईव्यवस्थेला प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरतात

व्यवस्थेला प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरतात

Subscribe

लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप

देशद्रोही आणि देशप्रेमी असे प्रमाणपत्र वाटण्याचे काम देशपातळीवर सुरु असून शासन म्हणजे देश असे समीकरण करुन ठेवल्यामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरवले जात आहेत. त्यामुळे उदार, सर्वसमावेशक भारताची कल्पना मागे पडत चालली असून व्यक्तीस्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. असा घणाघाती आरोप 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहयोग आयोजित वसई साहित्य कला महोत्सवात बोलताना केला.

मी आणि माझा राष्ट्रवाद याविषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की., बहुविध सांस्कृतिकता, सर्वधर्म मैत्री आणि प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार हे आपल्या देशाचे वैभव आहे. मात्र, धर्मावरून माणसांना मारून टाकले जात असेल तर देशातला सलोखा आणि बंधुप्रेमाचे वातावरण संपून जाईल. देशाच्या झेंड्याला अभिवादन करीत असताना जो अभिमान दाटून येतो तो राष्ट्रवाद नाही का? असा सवाल उपस्थित करून देशमुख पुढे म्हणाले की, विचार भिन्नता असली तरीही मैत्री असू शकते. पण कंठाळी राष्ट्रवाद पसरवून समोरच्याला शत्रू समजू लागलो तर देशात जे तट पडतील त्यामुळे आपण देशाचा मुळ स्वभावच हरवून बसू. राष्ट्रवाद हा शेवटचा पर्याय नाही म्हणूनच विनोबा जय जगतची कल्पना मांडत होते, याचे भान आपण ठेवले पाहिजे.

- Advertisement -

स्वागत व प्रास्ताविक भाषणात कवी सायमन मार्टीन म्हणाले की, साहित्य आणि भाषेला धर्म नसतो. सर्व जाती, धर्म आणि विचारांची माणसे जेव्हा लेखन करतात तेव्हाच साहित्याचा प्रवाह समृद्ध होतो. मात्र, साहित्यांचा अंतिम हेतू माणूस जगवणे हाच असावा. दुर्दैवाने जाती धर्माविरुद्ध लेखकाला कोंडीत पकडले जात आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धांवरून त्यांची हेटाळणी केली जात आहे. न वाचणारे आणि न लिहीणार्‍यांच्या टोळ्या साहित्य क्षेत्रातही धुडगुस घालत आहेत, हे दुःखदच आहे. म्हणून लिहीणारे आणि विचार करणार्‍यांनी मुलतत्ववादाचा धोका ओळखून एकत्र येण्याची गरज आहे.

ग्रंथ व वृक्षदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चित्रकार अब्दुल अजीज रायबा, फिलीम डिमेलो, रॉजर सेरेजो व शिल्पकार प्रदीप कांबळे यांच्या शिल्पाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विनायकदादा पाटील यांच्या हस्ते झाले. कवी सायमन मार्टीन यांच्या पुनरुत्थान या कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी झाले. योगिनी राऊळ, उत्तम भगत, विजय परेरा, विलास पगार, अंजली दशपुत्रे यांनी यावेळी निवडक कवितांचे वाचन केले. जव्हार वाळवंडा येथील माऊली शिक्षण संस्थेला एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले.

- Advertisement -

दुपारच्या सत्रात सहयोग गुणवंत पुरस्काराचे वितरण प्रा. सोमनाथ विभुते, सिल्वेस्टर लोपीस, यशोधरा काटकर यांच्या हस्ते झाले. विलास पगार, शकुंतला जाधव, गझलकार मोईनुद्दीन शेख, मुर्तजा इलेक्ट्रीकलवाला यांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रंगवेध वसई यांनी सादर केलेला भारत सासणे यांच्या कथेवरचा दीर्घांक, अमरकला मंडळातर्फे मृणाल सामंत यांनी सादर केलेली नाट्यकृती, ब्लेज डिमेलो यांचे शास्त्रीय गायन व शकुंतला जाधव यांच्या लोकगीताने दुपारचे सत्र उत्तरोत्तर रंगत गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -