घरक्रीडाविराट कोहली भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा!

विराट कोहली भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा!

Subscribe

सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बुधवारी बिनविरोध निवड झाली. त्याला केवळ ९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. या काळात बीसीसीआयचा कारभार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त होईल याची त्याने हमी दिली आहे. मी ज्याप्रकारे भारतीय संघाचे नेतृत्व केले, त्याचप्रकारे बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषवेन, असेही गांगुली म्हणाला. तसेच मी अध्यक्ष असलो, तरी कर्णधार विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे, असे गांगुलीने सांगितले.

विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे आम्हाला त्याची मते जाणून घ्यायला आवडतील. आम्हाला एकमेकांचा आदर आहे. मी विराट कोहलीशी गुरुवारी चर्चा करणार आहे. आम्ही त्याला शक्य तितका पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू. त्याला भारतीय संघाला जगातील सर्वोत्तम संघ बनवायचा आहे आणि खरे सांगायचे तर या संघाने मागील तीन-चार वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे गांगुलीने बुधवारी सांगितले.

- Advertisement -

गांगुली आणि भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात काही वर्षांपूर्वी मतभेद झाले होते. मात्र, गांगुली लवकरच भारतीय संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार असून या बैठकीत शास्त्रीही हजर असतील. आम्ही सर्व मुद्यांवर नीट चर्चा करू. आम्ही सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यांचे काम कठीण नाही, तर सोपे करण्याचा प्रयत्न करू. सर्व निर्णय हे कामगिरीच्या आधारावर घेतले जातील. कामगिरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि हेच भारतीय क्रिकेटचे भविष्य ठरवेल. याबाबतीत विराट हा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. मी याआधी कर्णधार होतो, त्यामुळे मला ही गोष्ट ठाऊक आहे. आम्ही भारतीय क्रिकेटसाठी जे योग्य, ते करण्याचा प्रयत्न करू, असे गांगुली म्हणाला.

धोनीचा भारताला अभिमान!

- Advertisement -

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. त्याच्याबाबत बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारले असता तो म्हणाला, धोनी काय विचार करत आहे, हे मला ठाऊक नाही. मात्र, एमएस धोनी आपल्या संघात असल्याचा भारताला अभिमान आहे. मी या पदावर असेपर्यंत सर्वांना आदर मिळणार हे नक्की. मी त्याच्याशी अजून संवाद साधलेला नाही. परंतु, मी लववकरच भारतीय क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असणार्‍या धोनीशी चर्चा करणार आहे. मला जेव्हा भारतीय संघातून वगळण्यात आले होते, त्यावेळी बरेच लोक म्हणाले की, मी पुन्हा कधीही भारतासाठी खेळणार नाही. मात्र, मी संघात पुनरागमन केले आणि चार वर्षे खेळलो. चॅम्पियन खेळाडू सहजासहजी संपत नाहीत.

बीसीसीआयसाठी नवी सुरुवात

सौरव गांगुली हा बीसीसीआयचा ३९ वा अध्यक्ष आहे. अध्यक्षपदी निवड होण्याविषयी तो म्हणाला, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. बीसीसीआयसाठी ही सुरुवात आहे. मला आता बदल घडवून आणण्याची संधी मिळणार आहे आणि हे आव्हान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -