घरक्रीडासंधीचे सोने कर!

संधीचे सोने कर!

Subscribe

गंभीरचा संजू सॅमसनला सल्ला

यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सॅमसनने २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, केवळ एका टी-२० सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याला स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्याला भारतीय संघात पुनरागमन करणे अवघड झाले होते.

मात्र, यंदाच्या विजय हजारे करंडकात चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याची टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. आता इतक्या कालावधीनंतर मिळालेल्या संधीचे सोने कर, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याला दिला आहे.

- Advertisement -

टी-२० संघात निवड झाल्याबद्दल संजू सॅमसनचे अभिनंदन. मला आशा आहे की तू चांगली कामगिरी करशील. तुला उशिराने का होईना, पण संधी मिळाली. आता या संधीचे सोने कर, असे गंभीरने ट्विटमध्ये लिहिले. गंभीरने याआधीही सॅमसनला पाठिंबा दर्शवला होता. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंतपेक्षा सॅमसन मला सरस वाटतो, असे त्याने काही काळापूर्वी सांगितले होते. तसेच विजय हजारे करंडकात सॅमसनने गोव्याविरुद्ध २१२ धावांची खेळी केल्यानंतरही गंभीरने ट्विट करत सॅमसनचे अभिनंदन केले होते. स्थानिक एकदिवसीय सामन्यात द्विशतक केल्याबद्दल संजू तुझे अभिनंदन. या खेळाडूत खूप प्रतिभा आहे आणि त्याला लवकरच संधी मिळण्याची गरज आहे, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले होते.

मागील चार-पाच वर्षांनी खूप शिकवले!

- Advertisement -

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे २०१५ साली संजू सॅमसनची भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी तो केवळ १९ वर्षांचा होता. मात्र, त्याला अवघा एक टी-२० सामना खेळायला मिळाला. त्यानंतर आता त्याचे तब्बल चार वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. या चार-पाच वर्षांनी मला खूप काही शिकवले, असे सॅमसन म्हणाला. मागील काही वर्षे माझ्यासाठी चढ-उतारांनी भरलेली होती. तुमची कारकीर्द जर सरळ सोपी झाली, तर तुम्हाला फार काही शिकायला मिळत नाही. मागील चार-पाच वर्षांनी मला खूप काही शिकवले आहे.

तुम्ही जर खूप वेळा अपयशी झाला असाल, तर त्यातून बाहेर कसे पडायचे हे तुम्हाला माहीत असते. मी आयुष्यात खूप अपयश पाहिले आहे. त्यामुळे त्यातून बाहेर कसे पडायचे आणि चांगली कामगिरी कशी करायची, हे मला माहीत आहे. मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण करण्यात मी बरेचदा कमी पडलो, असे सॅमसन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -