घरमुंबईदालनाच्या नुतनीकरणासाठी सव्वा दोन कोटींची उधळपट्टी

दालनाच्या नुतनीकरणासाठी सव्वा दोन कोटींची उधळपट्टी

Subscribe

आधीच कर्जाचा डोंगर, त्यात नागरीकांवर कराचा बोजा लादणार्‍या मीरा भाईंदर महापालिकेने मात्र महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या दालनांचे विस्तारीकरण आणि नुतनीकरणाचे काम हाती घेतले असून त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मीरा भाईंदर महापालिकेवर तब्बल 481 कोटी रुपयांचे कर्ज आहे. महापालिकेने पाणी पट्टी आणि घनकचरा शुल्कात वाढ करून नागरीकांवर आर्थिक बोजा टाकला आहे. असे असताना खर्चात मर्यादा घालण्याचे सोडून महापालिकेकडून पदाधिकार्‍यांच्या दालनांच्या नुतनीकरणासाठी तब्बल सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

सत्ताधारी भाजपालामहापालिकेतील आपली दालने आलिशान, चकचकीत आणि प्रशस्त हवी आहेत. सत्ताधारी भाजपाने शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्याचे दुसर्‍या मजल्यावरील दालन बहुमताच्या बळावर पहिल्या मजल्यावर हुसकावुन लावले आहे. नंतर महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना पत्र देऊन महापौर दालनाची जागा अपुरी पडत असल्याने कामात अडथळा होतो असे म्हटले होते. महापौरांकडुन नगरसेवक, अधिकारी, संस्था आदींच्या बैठका होत असल्याने स्थायी समिती सभागृह महापौर दालनाशी जोडून विस्तारीकरण करण्याची मागणी मेहतांनी केली होती. त्याअनुषंगाने महापौर दालनाचा विस्तार व नुतनीकरण करण्यास त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

महापौरांच्या मागणीनंतर प्रशासनाने महापौर दालनांसह उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती दालनांच्या नुतनीकरणाचे काम अत्यावश्यक असल्याचे सांगत त्याच्या निविदा मागवल्या. याकामी स्पार्क सिव्हील इन्फ्राप्रोजेक्टस या ठेकेदारास 26 जुलै रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले. महापालिकेच्या निविदेनुसार अंदाजित 2 कोटी 7 लाख 91 हजारांचा खर्च असताना ठेकेदाराने तब्बल साडे चौदा टक्के जास्त दराची निविदा भरली होती. वाटाघाटीनंतर ती 8.90 टक्के जास्त दराने देण्यात आली. त्यामुळे खर्च सव्वा दोन कोटीच्या घरात गेला आहे.

सध्या ठेकेदाराने महापौर दालनाचे काम सुरु केले असून महापौर उपमहापौर दालनात आणि उपमहापौर स्थायी समिती सभापती दालनात बसत आहेत. महापौर दालन पुर्णपणे तोडफोड करुन आलिशान आणि प्रशस्त केले जाणार आहे. महापौर दालनात एक अँटीचेंबर असताना आणखी एक अँटीचेंबर वाढवले जाणार आहे. स्थायी समितीचे लालबहाद्दुर शास्त्री सभागृह व चेंबर हे महापौर दालनाला जोडले जाणार आहे. बाहेरचा मोकळा असलेला पॅसेजही महापौर दालनात घेतला जाणार आहे. उपमहापौर दालन व स्थायी समिती सभापती दालन नंतर सुशोभित केले जाणार असून सभापती दालना लगतच स्थायीच्या बैठकीसाठी दालन केले जाणार आहे.

- Advertisement -

महापौरांच्या दालनासाठी महापालिका इमारतीच्या उत्तर दिशेला असलेल्या जिन्याचा मार्ग बंद केला गेला आहे. सुरक्षितता आणि नियमांचा विचार करता जिन्याचा मार्ग बंद करता येत नाही. तरीही महापालिका प्रशासनाने दुसर्‍या मजल्यावरील सदर जिन्याचा मार्ग दालनांसाठी बंद करुन टाकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -