घरमुंबईमुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सभागृहातील झुंबरांची भीती

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सभागृहातील झुंबरांची भीती

Subscribe

महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहातील भिंतीला लावलेली काच फुटून स्थापत्य शहर समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्या अंगावर पडल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थायी समिती सभागृह तसेच महापालिका सभागृह आदी ठिकाणी छतावरील काचेचे झुंबर बसवण्यात आलेले असून त्यांची योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याने ते कोसळून दुघर्टना होण्याची भीती नगरसेवकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे समिती सभागृह तसेच महापालिका सभागृहातील डोक्यावर टांगल्या तलवारीप्रमाणे असणारे झुंबर काढून टाकावेत अशी निर्देशच स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

स्थापत्य शहर समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्यासह महापालिकेच्या तीन अधिकार्‍यांच्या अंगावर पडून झालेल्या दुघर्टनेचे तीव्र पडसाद गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधत देखभाल विभागाच्या अधिकार्‍यांचे इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. बैठक सुरु असतानाच ही अशी घटना घडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेत अध्यक्षांसह अधिकारी थोडक्यात बचावले असल्याचे सांगत स्थायी समिती सभागृहाच्या शेजारील जागेतही वातानुकूलित यंत्रणेतून पाणी गळत असल्याचे त्यांनी सांगून पुन्हा हे होवू नये म्हणून प्रशासन काय करत आहे, अशी विचारणा केली. त्यामुळे समिती सभागृहातील भिंतीला लावलेल्या काचा त्वरीत काढण्याची मागणी त्यांनी केली. समिती सभागृहात लावलेल्या झुंबरांचीही देखभाल योग्यप्रकारे केली जात नसल्याने बैठकीला बसणार्‍या नगरसेवकांचा जीवही धोक्यात असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

‘ही काच जर अधिकार्‍यांच्या डोक्यावर पडली असती तर सर्व यंत्रणा कामाला लागली असती’, असे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे महापालिका सभागृहातील झुंबरांबाबत भीती व्यक्त करत त्यांची देखभाल किती केली जाते? अशी विचारणा केली. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या डोक्यावरच हा झुंबर असल्याने आपण आता भीतीच्या छायेखाली इथे बसलो असल्याचे सांगत हा झुंबर काढला जावा, अशी सूचना केली. तसेच सभागृहातील झुंबराची तपासणी केली जावी, असेही निर्देश दिले. मात्र, यापुढे आपल्या समितीच्या बैठकीला हेल्मेट घालूनच बसावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपल्या दालनात काच बसवून ध्वनी प्रतिबंधित करावे, यासाठी दोन महिन्यांपासून सूचना करत आहे, परंतु अधिकारी केवळ आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाकडेच लक्ष देत असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली.

डोक्यावर छत्री घेवून बसण्याची वेळ

पावसाळ्यात छताला गळती लागण्याच्या घटना आपण ऐकत असलो तरी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती अध्यक्षांसह समिती सभागृहातच पावसाळा नसतानाही गळती लागलेली आहे. याठिकाणी वातानुकूलित यंत्रणेमुळे छतातून पावसाची गळती लागलेली असल्यामुळे समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना आपल्या अँटी चेंबरमध्ये चक्क छत्री घेवून बसावे लागते. खुद्द त्यांनी हा आपला अनुभव स्थायी समिती बैठकीत कथन करत प्रशासनाचे वाभाडेच काढले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -