घरमुंबईरिक्षा-टॅक्सींवर महिन्याभरात रुफलाइट इंडिकेटर

रिक्षा-टॅक्सींवर महिन्याभरात रुफलाइट इंडिकेटर

Subscribe

काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांवर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे इंडिकेटर बसविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रस्त्यावर उभी असणारी काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही हे समजणे आता सहज शक्य होणार आहे. कारण महिन्याभरातच काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांवर ‘रुफलाइट इंडिकेटर’ बसविण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी नुकतीच ‘रुफलाइट इंडिकेटर’ उत्पादकांसोबत परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांवर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे इंडिकेटर बसविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन परिवहन विभागाने परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास येते. गर्दीच्या वेळी रिक्षा, टॅक्सी पकडताना प्रवाशांना बराच खटाटोप करावा लागतो. त्यातही गर्दीच्या वेळेस रिक्षा आणि टॅक्सीत प्रवासी आहे की नाही हे सुद्धा कळत नाही. परिणामी प्रवाशांची मोठी पंचाईत होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होण्यासाठी परिवहन विभागाकडून रुफलाइट इंडिकेटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisement -

असे असेल रुफलाइट इंडिकेटर

यानुसार रिक्षा-टॅक्सींच्या वरच्या बाजूला तीन रंगांमधील इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार हिरवा रंग प्रकाशित झाल्यास रिक्षा-टॅक्सीची सेवा उपलब्ध असल्याचे समजणार आहे. तर इंडिकेटरमधील लाल रंग रिक्षा-टॅक्सीत प्रवासी असल्याचा संकेत देणार आहे. त्याचप्रमाणे इंडिकेटरमधील पांढऱ्या प्रकाशामुळे सेवा बंद असल्याचे समजेल.

चालकांना बसवावा लागणार इंडिकेटर

‘रुफलाइट इंडिकेटर’ बसवण्यासाठी चालकांना खर्च करावा लागणार आहे. यासाठी प्रत्येकी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचा खर्च होऊ शकतो. विशेष म्हणजे इंडिकेटरची कसा वापरावा? इंडिकेटरमध्ये बिघाड दुरुस्त करण्यास येणारा खर्च यासारख्या अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. रिक्षा-टॅक्सी संघटनांशी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -