घरमुंबईरेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरी करणार्‍या वयोवृद्धाला अटक

रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरी करणार्‍या वयोवृद्धाला अटक

Subscribe

अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता; चोरीचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरी करणार्‍या दत्ताराम संताजी जगनाळे नावाच्या एका वयोवृद्धाला मंगळवारी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या अटकेने चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता एपीआय अर्चना क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार कॉलेज तरुण असून मंगळवारी रात्री तो लोकलने प्रवास करीत होता. यावेळी त्याने लोकलच्या रॅकवर त्याची बॅग ठेवली होती. अंधेरी रेल्वे स्थानक आल्यानंतर त्याला त्याची बॅग कोणीतरी चोरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अंधेरी रेल्वे पोलिसांत बॅग चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान रात्री रेल्वे स्थानकात एक वयोवृद्ध संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

या माहितीनंतर एसीपी सुरेखा कपिले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांच्या पथकातील अर्चना क्षीरसागर, दिपक दुमलवाड, संजय नाईक, संतोष फडतरे, सुदर्शन बल्लाळ, अमजद शेख यांनी तिथे धाव घेऊन दत्ताराम जगनाळे या 65 वर्षांच्या वयोवृद्धाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक बॅग जप्त केली, चौकशीत ही बॅग तक्रारदार तरुणाची असल्याचे उघडकीस आले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतल्यानंतर तिथे पोलिसांना लॅपटॉप, सहा मोबाईल, दोन टॅब, घड्याळ, चार्जर, हेडफोन आणि इतर चोरीचा मुद्देमाल सापडला. त्यातील एक मोबाईल पुणे येथील एका व्यक्तीचा आहे.

चौकशीत त्याने एका गुन्ह्यांची कबुली दिली असली तरी त्याने अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे. जप्त मुद्देमाल चोरीचा असून त्यांच्या मालकाचा शोध सुरु असल्याचे एपीआय अर्चना क्षीरसागर यांनी सांगितले. दत्ताराम हा पूर्वी एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. सेवानिवृत्तीनंतर त्याने रेल्वे प्रवाशांच्या बॅगा, मोबाईल आणि इतर सामान चोरी करण्यास सुरुवात केली होती. त्याला दोन मुले असून ते दोघेही चांगल्या पदावर नोकरी करतात. त्याची पत्नी आजारी असून मानसिक रुग्ण आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून अनेक बॅगा तसेच मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -