घरताज्या घडामोडी'सामना' संपादकीय शिवसेनेची 'पितृभाषा', ती तशीच राहणार! - उद्धव ठाकरे

‘सामना’ संपादकीय शिवसेनेची ‘पितृभाषा’, ती तशीच राहणार! – उद्धव ठाकरे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सामना संपादकपदाच्या जबाबदारीत झालेला बदल, अयोध्या दौरा, शेतकरी कर्जमाफी योजना या मुद्द्यांवर खुलासा केला.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही अधिवेशनाव्यतिरिक्तच्या मुद्द्यांवर देखील विधानभवनाबाहेर चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचं संपादकपद उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्यावरून चर्चा सुरू झाली होती. संपादकपद बदलल्यामुळे आता सामनाची किंवा सामनाच्या संपादकीयाची आक्रमक भाषा बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. अखेर त्यावर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच खुलासा केला आहे. ‘अनेकदा शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून माझे मुद्दे सामनामधून येतात. ते याहीपुढे तसेच येतील. संपादकपदाबाबत आमचा अंतर्गत बदल झाल्यानंतर मी ऐकलं की आता भाषेचं काय होणार? भाषा तशीच राहील. मातृभाषा जशी असते, तशीच सामनाची पितृभाषा आहे. ती बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. ती तशीच राहील. सामनाच्या संपादकीयाची जबाबदारी संजय राऊतांकडेच राहील’, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

अयोध्या दौऱ्यात राजकारण?

दरम्यान, येत्या ७ मार्च रोजी मुख्यमंत्री अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, त्यावरून राजकारण सुरू झाल्याची टीका करण्यात येत होती. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘येत्या ७ तारखेला मी अयोध्येला जात आहे. तो माझ्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे देव दर्शनाला जाण्यामध्ये राजकारण कसलं आलंय? महाविकासआघाडीच्या ज्या मंत्र्यांना, सहकाऱ्यांना आणि नेत्यांना माझ्यासोबत यायचंय, ते येतील. काही आधीही जाऊ शकतात, काही नंतरही जातील. यामध्ये राजकारण नाही’.

- Advertisement -

‘पत्रकार परिषद तहकूब करू का?’

अधिवेशनादरम्यान जेव्हा सभागृहातील आमदार गोंधळ घालायला सुरुवात करतात, तेव्हा अनेकदा अध्यक्ष कामकाज तहकूब करतात. मात्र, पहिलंच पूर्णवेळ अधिवेशन असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून पत्रकारांचीच फिरकी घेतली! प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घालायला सुरुवात केली, तेव्हा ‘मी पत्रकार परिषद तहकूब करू का?’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना एक-एक करून प्रश्न विचारण्याची विनंती केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -