घरफिचर्सकुठे हरवला विवेक?

कुठे हरवला विवेक?

Subscribe

वैश्विक महामारीचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या करोना संकटाने कवेत न घेतलेल्या देशांची संख्या विरळच असावी. अति पुढारलेल्या अमेरिका, जगातील सर्वोत्तम वैद्यकीय सेवा बहाल करण्याचा लौकिक राखून असलेल्या इटली, तसेच स्पेन व अन्य देशांसह भारतासारख्या विस्तीर्ण देशात करोनाने धुमाकूळ घातला आहे. यामधील अनेक देशांनी लॉकडाऊनसह आंतरराष्ट्रीय मानदंडाच्या कक्षेत येणार्‍या सर्व उपाययोजनांचा अंगीकार करत या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी दंड थोपटले आहेत. अर्थात, आजवर हजारोंचा बळी घेणार्‍या आणि लाखोंना लागण होऊन भितीच्या प्रचंड खाईत लोटणार्‍या करोनाची दहशत शब्दांतीत आहे. सर्वत्र भितीचे वातावरण आहे. प्रत्येकजण धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. आपण, आपला परिवार, आपले गाव कसे या आजाराच्या संसर्गापासून बचाव करू शकू, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वैयक्तिक स्वरूपाच्या काळजीसह सोशल डिस्टन्सिंग हा जालीम उपाय करोनावर मात करण्यासाठी निर्णायक असल्याचे व्यापक मत पुढे आल्यानंतर भारतातही लॉकडाऊनचा कटू पण अटळ निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांपासून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व प्रमुख घटकांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे, परस्परांशी संबंध न ठेवण्याचे अगदी हात जोडून आवाहन केले आहे. औषधे, किराणा, अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ यांची विक्री करणारी आस्थापने तसेच शासकीय व खासगी रुग्णालये वगळता अन्य ठिकाणे बंद ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे. याआधी देशाने दोन मोठी युध्दे अनुभवली असली तरी अवघा देश लॉकडाऊनच्या परिस्थितीत जाण्याची कधीही वेळ आली नव्हती. स्वाभाविकच या शासन निर्णयामुळे सामाजिक विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. लोकांना किरकोळ स्वरूपातील वगळता बाहेर जाणे दुरापास्त झाले आहे.

- Advertisement -

स्वत:ची कार्यालये, व्यवसाय, धार्मिक व सामाजिक उपक्रम आणि अन्य ठिकाणी जाण्याची बंदी आल्याने अनेकांना हा नजरबंदीचा खेळ वाटत असावा. तथापि, करोनाची वाढती व्यापकता अवघ्या जगाला चिंताक्रांत करणारी आहे. दिवसागणिक या आजारामुळे दिवसागणिक प्राणोत्क्रमण होणार्‍यांची संख्या लक्षणीय प्रमाण गाठल्याचे दिसत आहे. आजाराची लागण होणार्‍यांचे प्रमाणही वैद्यकीय संस्थांपुढे आव्हान निर्माण करणारे आहे. सध्या प्राथमिकता आहे ती प्रत्येकाचा जीव वाचण्याची. सरकार, प्रशासन आणि तत्सम यंत्रणा त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. सार्वत्रिक मदतीचा ओघ सुरू आहे. त्यापोटी उद्योग, धार्मिक संस्था, सेलिब्रेटीज यांच्याकडून मदतीचा हात दिला जात आहे. हे सर्व कौतुकास्पद असले तरी एक बाब केवळ दु:खदायीच नाही तर समाज आता वैचारिकदृष्ट्या पुढारला आहे, असे म्हणणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ठरावी. लॉकडाऊन असतानाही त्याचे उल्लंघन करून सर्रास फिरणार्‍या जनतेला काय म्हणावे, हे कळत नाही. करोनाला सर्वशक्तिनिशी पराभूत करायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग शिवाय पर्याय नाही, असा जगभर कंठशोष सुरू असताना आपल्याकडे मात्र त्याची ऐशीतैशी होताना दिसत आहे.

प्रशासकीय यंत्रणा आणि विशेषत: पोलीस खाते लोकांना हात जोडून, विनवण्या करून, प्रसंगी दंडुक्याची भाषा शिकवून बाबांनो, उगाच कशाला रस्त्यावर फिरतात; घरांमध्ये बसा ना असे जीव तोडून सांगत असताना त्याला हरताळ फासण्याची मर्दुमकी काहींकडून दाखवली जात आहे. अहंभाव दाखवत प्रसंगी कायद्याच्या रक्षकांशी दोन हात करण्याची मुजोरी दाखवणार्‍यांना काय म्हणावे? ग्रामीण भागात व्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रमाण नगण्य असले तरी शिक्षित म्हणवल्या जाणार्‍या शहरी भागात पोलीसांशीही हुज्जत घालण्याचे, त्यांच्या अंगावर हात टाकण्याचे दुर्दैवी प्रकार होताना दिसत आहेत. समाज माध्यमे तसेच वाहिन्यांवरील ही दृश्ये पाहिल्यानंतर सजग मनाचा कासावीसपणा वाढत नसल्यास नवलच. पोलीस काय किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा काय, प्रत्येक जण कर्तव्यनिष्ठूरतेसाठी झटत असताना काही महाभाग नियमांना छेद देण्याचे काम करीत असतील तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवण्याशिवाय दुसरा मार्ग असूच शकत नाही. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अकारण गर्दी होताना दिसते. बाजारहाट करण्यासाठी कित्येक जण जणू लॉकडाऊन आता नाहीच अशा थाटात वावरताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका आमदाराने त्याच्या कुटुंबातील विवाहसोहळा अगदी शाही स्वरूपात केला. तिथे सुमारे तीन हजार लोक उपस्थित असल्याची धक्कादायक बातमी पुढे आलीय.

- Advertisement -

एवढेच राज्याचे मुख्यमंत्री लवाजम्यासह येऊन वधू-वरांना आशीर्वाद देऊन गेल्याचे वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. इतक्या जबाबदार व्यक्ती जर कायद्याला आव्हान देणारी कृत्ये करीत असतील तर सामान्यांना दोष देऊन काय उपयोग हा विचार मनाला शिवल्यावाचून राहत नाही. उद्याच्या परिवर्तनाचा उष:काल होऊ द्यावयाचा असेल तर या गंभीर वातावरणावर संयमाचा उतारा कामी येऊ शकतो. अनेक ठिकाणी अकारण दाखवले जाणारे धारिष्ट्य, कायदा धाब्यावर बसवण्याची उफाळून येणारी वृत्ती, अहंभावी वृत्तीपायी एखाद्यावर उठणारे हात, कधीकधी बघून घेण्याची होत असलेली भाषा हे सारे सामाजिक भान हरवलेल्या वृत्तीचे दर्शन घडवते. करोनापायी देश एका संकटातून मार्गक्रमण करीत असताना त्यासाठी संयमी, संवेदनशील मानसिकताच उपयुक्त ठरू शकते. आततायीपणा, अहंभाव केवळ सामाजिक संतुलन बिघडवण्यास पुरक ठरतात. बरं, हे संकट संपल्यानंतर त्याचे विपरित परिणाम दीर्घकालीन असण्याबाबत दुमत असू नये.

उद्याच्या संकटांना धीरोदात्तपणे, अविचल वृत्तीने आणि संयमाने सामोरे जाण्याची कटिबध्दता यानिमित्त जाहीर करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत लॉकडाऊनची स्थिती आहे, तोवर नियमांचे तंतोतंत पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलीस अथवा अन्य व्यवस्थांचे रखवालदार आपल्यापैकीच एक आहेत, त्यांच्या कर्तव्याला आव्हान देत बसण्यापेक्षा ते सांगत असलेल्या नियमांचे पालन करण्यातच विवेक असल्याचे म्हणता येईल. या संकटसमयी करोनासारख्या अदृश्य शत्रूचा सामना करताना आपणच व्यवस्थांचे शत्रू बनून राहिलो तर आपल्या शिक्षणाचा, सामाजिक भानाचा, संयमी वृत्तीचा कडेलोट झाला, असे म्हणण्यास कोणी धजावले तर त्यामध्ये चुकणार ते काय? तेव्हा ज्या कोणाकडून नियमांना हरताळ फासण्याच्या चुका झाल्या असतील, कायद्याच्या रक्षकांवर हात उचलण्याचे प्रमाद घडले असतील त्यांनी सारे विस्मरणात टाकून यापुढे जबाबदार नागरिक म्हणून वागण्याची आण घेणे शहाणपणाचे ठरेल, इतकेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -