घरCORONA UPDATEवांद्रे जमाव प्रकरण : राहुल कुलकर्णीला जामीन, तर १० जणांना पोलीस कोठडी!

वांद्रे जमाव प्रकरण : राहुल कुलकर्णीला जामीन, तर १० जणांना पोलीस कोठडी!

Subscribe

आपल्या गावी जाण्यासाठी हजारोच्या संख्येने वांद्रे रेल्वे स्थानकात जमा होऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी बुधवारी रात्री अटक केलेल्या दहाजणांना गुरुवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर रेल्वेच्या एका वृत्तामुळे लोकांची दिशाभूल करुन अफवा पसरविल्याप्रकरणी अटकेत असलेला एबीपी माझाचा उस्मानाबादचा पत्रकार राहुल कुलकर्णी याची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. या सर्वांना गुरुवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते. राहुल कुलकर्णीला अटक झाल्यानंतर माध्यम विश्वातल्या अनेक पत्रकारांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत होता. काही राजकीय नेतेमंडळींनी देखील यावरून सरकारवर टीका केली होती.

लॉकडाऊन असताना १४ एप्रिल रोजी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी चार ते साडेचार वाजता हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर एकत्र आले होते. त्यांना पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित ८०० हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत बुधवारी रात्री उशिरा दहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. विश्वा अमरुद्दीन, रौफ शेख, आलम सलीम शेख, शमशेर अली मलिक, हलाल हकीमुद्दीन अली, शाहिद इब्राहिम शेख, मोहम्मद अर्शद अन्वर शेख, अल्लापक शेख, फिरोज शेख आणि शब्बीर खालिद शेख अशी या दहा जणांची नावे आहेत. यातील विश्वाने गावी जायचे असेल तर वांद्रे येथे या, तर रौफने व्हिडीओद्वारे अनेकांना शासन सर्वांना पंधरा हजार देणार असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

शब्बीर आणि आलमने तिथे गर्दी जमा करण्यास प्रवृत्त केले. शमशेरने कोरोनापासून मरण्यापेक्षा गावी जाऊन मेलेले बरे असा मॅसेज व्हायरल केला. हलालने तिथे जमा झालेल्या जमावाचे व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ व्हायरल केले. मोहम्मद अर्शद आणि अल्लापकने अनेकांना गर्दीत सामील होण्याचे आवाहन केले. फिरोजने सरकार विशेष ट्रेन सुरु करणार असल्याचे सांगून अफवा पसरवली होती. त्यामुळे त्यांच्यावर बोगस मेसेज व्हायरल करुन अफवा पसरवणे तसेच गर्दी जमा करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या सर्वांना गुरुवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने या सर्वांना रविवार १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे एबीपी माझाचा उस्मानाबादचा पत्रकार राहुल कुलकर्णी याची कोर्टाने पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी रेल्वे प्रशासन जनसाधारण विशेष ट्रेनची सेवा सुरु करणार असल्याचे बेजबाबदार वृत्त देऊन अफवा पसरवून वांद्रे येथील गर्दी जमा होण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या वृत्ताबाबत राहुल कुलकर्णीने कुठल्याही रेल्वेच्या अधिकार्‍यांची प्रतिक्रिया घेतली नाही, केवळ एका पत्राचा उल्लेख करुन ही माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत कोर्टाने त्याला सुरुवातीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्यावतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.

- Advertisement -

अजून काही पत्रकारांवर होणार कारवाई

वांद्रे येथे गर्दी जमवण्यास कारणीभूत ठरल्याचा पोलिसांनी ठपका ठेवलेले ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची गुरुवारी जामिनावर मुक्तता झाली आहे. आता आणखी एका बड्या इंग्रजी चॅनेलचे पत्रकार आणि अँकरवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. या चॅनेलवर खोटी बातमी पसरवल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल यांना देण्यात आले आहेत.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत एक वृत्त 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. यात आव्हाड हे करोनाबाधित आहेत,असे सांगण्यात आले. यासोबत आव्हाड यांची मुलगी 16 मार्च रोजी स्पेनहून भारतात परतली. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर आव्हाड यांनी करोनाची लागण झाली असा दावाही या बातमीत केला होता.

हा दावा खोटा असल्याचेगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. या चॅनेलने कोणत्याही रुग्णाचे नाव जाहीर न करण्याच्याआचारसंहितेची पायमल्ली केली आहे. चॅनेलचे वर्तन बेजबाबदार आणि हेतुपुरस्सर आहे. देशात भीतीचे वातावरण असताना घबराट पसरावणार्‍या बातम्या दाखवणे चुकीचेआहे, असे म्हणत बातमी देणार्‍या पत्रकार आणि निवेदक या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र देशमुख यांनी पोलीस महासंचालकांना लिहिले आहे.


सविस्तर वाचा – हेच ते पत्र आणि हीच! ती बातमी; म्हणून वांद्र्यात जमा झाले हजारो मजूर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -