घरCORONA UPDATECorona: भारताचा डबलिंग रेट ६.२! नक्की आहे काय हा प्रकार?

Corona: भारताचा डबलिंग रेट ६.२! नक्की आहे काय हा प्रकार?

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे देशभरात भितीयुक्त चिंतेचं वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरनाची देशातली सांगितलेली परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. देशभरात आत्तापर्यंत कोरोनाचे १३ हजार ३८७ रुग्ण सापडले असून मृतांचा आकडा ४०० च्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांमध्येच कोरोनाचे १००७ नवे रुग्ण देशाच सापडले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू ओढवला आहे. मात्र. या सगळ्या मुद्द्यांसोबतच काही दिलासादायक गोष्टी देखील देशात घडत आहेत. देशात आत्तापर्यंत १ हजार ७४९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. त्याशिवाय भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचं प्रमाण कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ४० टक्क्यांनी कमी झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या डबलिंग रेटचा प्रामुख्याने उल्लेख केला.

काय म्हणाले लव अग्रवाल?

लव अग्रवाल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा सरासरी डबलिंग रेट हा इतर देशांपेक्षा कमी आहे. आणि ही भारतासाठी महत्त्वाची बाब आहे. प्रारंभी २ दिवसांवर असलेला आपला डबलिंग रेट आता ६.२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार, सर्व राज्यांमधली राज्य सरकारं आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात का होईना, यश येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

- Advertisement -

नक्की काय प्रकार आहे डबलिंग रेट?

डबलिंग रेट हा देशातल्या कोरोनाच्या फैलावाशी संबंधित आहे. देशात कोरोनाचे रुग्ण किती वेगाने वाढत आहेत, त्यानुसार डबलिंग रेट ठरवला जातो. उदा. एखाद्या ठिकाणी १०० रुग्ण आढळले, तर त्याचे २०० रुग्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो, त्यानुसार डबलिंग रेट समजतो. जर २ दिवसांत रुग्णसंख्या २०० झाली, तर तिथला डबलिंग रेट २ दिवस असतो. जर २०० रुग्णांचे ४०० रुग्ण ३ दिवसांत झाले, तर डबलिंग रेट ३ दिवस असतो. अर्थात, रुग्णांची संख्या आहे त्यापेक्षा दुप्पट होण्यासाठी जितके दिवस लागतील, तो त्या ठिकाणचा, राज्याचा किंवा देशाचा डबलिंग रेट असतो. भारतात सध्या रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी ६.२ दिवस लागले आहेत.

- Advertisement -

इतर देशांत काय आहे परिस्थिती?

इतर देशांची भारताशी तुलना केली, तर भारतात पहिल्या ७५० रुग्णांवरून १५०० रुग्ण व्हायला ४ दिवस लागले. १५०० हून ३००० रुग्ण व्हायला पुन्हा ४ दिवस लागले. पण ३ हजाराहून ६ हजार रुग्णसंख्या व्हायला ५ दिवस लागले आणि ६ हजाराहून १२ हजार रुग्णसंख्या व्हायला ६.२ दिवस लागले. पण इतर देशांचा विचार केला, तर अमेरिकेत दोन दिवसांत ७५०हून १५००, ३ दिवसांत १५०० हून ३०००, २ दिवसांत ३ हजारहून ६ हजार आणि २ दिवसांत ६ हजारांहून १२ हजार रुग्णसंख्या झाली. इटलीमध्ये याच पायऱ्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ३ दिवसांत गाठल्या गेल्या. तर स्पेनमध्ये १, २, २ आणि ४ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होऊन १२ हजारांपर्यंत पोहोचली.

डबलिंग रेट का महत्त्वाचा आहे?

देशात कोरोनाचा फैलाव किती वेगाने होतोय? सरकारच्या क्वॉरंटाईन किंवा सॅनिटायझेशन उपाययोजनांचा फायदा होतोय का? देशातली जनता किती सहज कोरोनाला बळी पडू शकते? नजीकच्या भविष्यकाळात किती वेगाने उपाययोजना करण्याची गरज पडू शकते? अशा बाबींवर निर्णय घेण्यासाठी डबलिंग रेट महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने सुरुवातीला अवघ्या ४ दिवसांवर असलेला डबलिंग रेट आता ६.२ टक्के झाला आहे. हा असाच वाढवत नेण्यावर सरकारी यंत्रणांचा भर असल्याचं आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, देशात अशी १९ राज्य आहेत की ज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामध्ये केरळ, उत्तराखंड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाख, पुदुच्चेरी, दिल्ली, बिहार, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -