घरCORONA UPDATEठाण्यात तबलिगी जमातीच्या २५ जणांना अटक

ठाण्यात तबलिगी जमातीच्या २५ जणांना अटक

Subscribe

भारत सोडून न जाण्याच्या अटीवर न्यायालयाने या २५ जणांना जामिनावर सोडले आहे.

दिल्ली निजामुद्दीन या ठिकाणी असणाऱ्या मरकज येथून धार्मिक कार्यक्रमावरुन ठाण्यातील मुंब्रा येथे आलेल्या तबलिगी जमातीच्या २१ परदेशी नागरिकांसह २५ जणांना गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. भारत सोडून न जाण्याच्या अटीवर न्यायालयाने या २५ जणांना जामिनावर सोडले आहे.

देशावर कोरोनाचे संकट आलेले असताना एका धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी जमातीचे हजारो नागरिक दिल्ली निजामुद्दीन येथील मरकज या ठिकाणी एकत्र जमा झाले होते. येथील कार्यक्रमासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात तबलीगी आले होते. देशावर कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना १८ मार्च रोजी शेकडो तबलिगी जमातीचे लोक राज्यात परतले होते, त्यापैकी २५ जण लॉकडाऊनच्या काळात मुंब्रा कौसा येथील दोन मशिदीमध्ये आश्रयाला थांबले होते. मरकज येथून परतलेल्या तबलिगी जमातीच्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर तबलिगी जमातीच्या अनेकांना ताब्यात घेण्याचे सत्र राज्यभरात सुरु करण्यात आले होते. या दरम्यान मुंब्रा पोलिसांनी १ एप्रिल रोजी मरकज येथून आलेल्या २५ जणांना कौसा येथील दोन मशिदीतून ताब्यात घेऊन त्यांना मशिदीतच क्वारंटाईन करण्यात आले होते. या जणांमध्ये १३ बांगलादेशी, ८ मलेशियन आणि ४ भारतीय नागरिकाचा समावेश होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात २५ जणांवर भा.द.वि कलम १८८, २६९, २७० सह परकीय नागरिक अधिनियम १९४६ कलम ७ (अ), १४ सह संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक कायदा अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

या २५ जणांच्या कोरोनाच्या चाचण्या घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते, या २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असता गुरुवारी या २५ जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक १ ने अटक केली. या २५ जणांना गुरुवारी दुपारी ठाण्यातील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २१ विदेशी नागरिक आणि ४ भारतीय नागरिक असे एकूण २५ जणांना भारत सोडून न जाण्याच्या अटीवर जामिनावर सोडले आहे.

पोलिसांनाही झाला कोरोना

तबलीगी जमातीच्या नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ३४ जणांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्यापैकी काही अधिकारी आणि कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम कोरंटाईन करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी कोरोना या आजारातून बरे होऊन बुधवारीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -