घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात आढळून आलेल्या सहा रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’

नाशकात आढळून आलेल्या सहा रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’

Subscribe

पाथर्डी फाटा, उत्तम नगर, सावतानगर, सातपूर कॉलनी सील हिरावाडी आणि देवळाली कॅम्प होणार नाही सील; शहरात सहा रुग्ण शनिवारी आढळले पॉझिटिव्ह; जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३३३ रुग्ण

शहरात पाथर्डी फाटा, उत्तमनगर, सावतानगर, सातपूर कॉलनी, हिरावाडी, देवळाली परिसरातील प्रत्येकी एक असे सहा रुग्ण शनिवारी (दि. २ मे) पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी पाथर्डी, उत्तम नगर, सावतानगर व सातपूर कॉलनी परिसर महापालिकेने सील केला आहे. हिरावाडी परिसरातील रहिवाशी पोलीस मालेगावला पॉझिटिव्ह आढळला होता. ते गेल्या पंधरा दिवसांत घरी न गेल्याने हा परिसर सील करण्यात आलेला नाही. याशिवाय देवळाली कॅम्प परिसरही सील करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळी जिल्ह्याभरातील ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नाशिक शहरासह मनमाड, मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड तालुक्यात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आता एकूण 3३३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 2९८ रुग्ण मालेगाव, 16 नाशिक शहर, 17 नाशिक जिल्ह्यात व दोनजण जिल्ह्या बाहेरील आहेत. नवीन रुग्ण आढळून आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर सहा आठवडे प्रतिबंधित राहणार आहे.

- Advertisement -

सातपूर रुग्णाचे मालेगाव कनेक्शन


सातपूर कॉलनीतील ६० वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. या बाधित महिलेच्या आईचे नुकतेच मालेगाव जवळील चिंचगाव येथे निधन झाले. त्यामुळे आईच्या अंत्यदर्शनासाठी ही महिला गावी गेली होत्या. तेथून २८ एप्रिलला नाशकात परत आल्यानंतर तिला कफसह कोरोनाची अन्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे तिला 29 एप्रिलला सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारार्थ डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या महिलेच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही महिला मालेगावहून नाशकात ज्या वाहनाने आली त्यात तिचे सात नातेवाईकही होते. या सातही नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या महिलेमुळे आता सातपूर कॉलनीतील हजेरी शेडचा परिसर महापालिकेने सील केला आहे.

मालेगावच्या नातेवाईकांचा सावतानगरला मुक्काम


सावतानगर हिरे विद्यालयासमोर भाडेतत्त्वावर राहणार्‍या २९ वर्षिय व्यक्ती करोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीकडे मालेगावचे नातेवाईक मुक्कामी आले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने सदर व्यक्ती कोरोनाबाधित झाला आहे. महत्वाचे म्हणजे हा रुग्ण २५ एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वलवाडी येथून दुधाच्या ट्रँकरमधून नाशिकला आला होता. या भागातील सर्वेमध्ये या रुग्णात लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याला डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

उत्तमनगरमध्ये पत्रकारास कोरोनाचा संसर्ग

उत्तमनगर येथे एक पत्रकार कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कामानिमित्त हा रुग्ण ठिकठिकाणी गेल्याने त्याला बाधा झाली. मात्र निश्चित कारण अद्याप पुढे आलेले नाही. हा रुग्ण संयुक्त कुटुंबात राहत असून त्याच्या कुुटुंबातील ९ व्यक्तींना डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व नातेवाईकांची टेस्टही घेण्यात आली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य रुग्णांची वैद्यकीय तपासणी आता करण्यात येणार आहे. तसेच उत्तम नगर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यामुळे आता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना या परिसरात प्रवेश करता येणार नाही.

गोविंदनगर येथे वैद्यकीय सेवा देणारा पाथर्डी फाट्याचा फार्मासिस्ट पॉझिटिव्ह

पाथर्डी फाटा येथील मालपाणी सॅफरॉन ४० वर्षिय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या रुग्ण इगतपुरी येथील रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असल्याचे कळते. गोविंदनगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या कंटेनम्नेंट झोनमध्ये ते ५ एप्रिलपासून वैद्यकीय पथकात कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना करोना झाल्याचा अंदान आहे. या रुग्णाचे पाथर्डी फाटा येथे मेडिकल स्टोअर्स देखील असल्याचे समजते. त्यांची पत्नी जिल्हा रुग्णालयातील टीबी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. पत्नी, वडील, आई, मुलगा यांच्यासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या भागाला आता सील करण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने पथके तयार केले आहेत.

हिरावाडीत पोलीस कोरोनाबाधित

पंचवटीतील हिरावाडी दामोदरनगर येथील रहिवाशी असलेला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तेे 15 दिवसांपासून मालेगावला ड्युटीवर आहे. २६ एप्रिलला त्यांचे स्वॅब टेस्टसाठी घेण्यात आले. २८ एप्रिलला ते एका ट्रकमधून नाशिकला आले. २९ एप्रिलला पुन्हा एकदा मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ते डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल झाले. या दरम्यान, त्यांचा घरच्यांशी संपर्क न आल्याने हिरावाडी परिसर सील करण्यात येणार नसल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

अशोका हॉस्पिटलमधील रुग्ण पॉझिटिव्ह  

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ह्दयविकारामुळे एका ६७ वर्षिय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण धुळ्यातून आला आहे. धुळे येथील चरणी रोड परिसरातील लेन नंबर ६ भागात हा रुग्ण राहतो. उपचार घेत असताना त्याच्यात करोनाचे लक्षणे आढळल्याने त्यांची टेस्ट घेण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले.

देवळाली कॅम्पमधील लष्करातील मेजरला बाधा

लष्कराच्या रेस्ट कँम्प रोडवरील सप्लाय डेपोत कार्यरत असलेले मेजर पदावरील २९ वर्षीय अधिकारी यांना दोन दिवसापासून त्रास जाणवू लागल्याने लष्करी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनो टेस्ट घेण्यासाठी स्वँब घेण्यात आला, तो पॉझिटिव्ह आल्याने लष्करी अधिकार्‍यांना धक्का बसला .नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने या संदर्भात कँन्टोमेन्ट रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री नटेश यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासह आरोग्य अधिक्षक राजेंद्र ठाकूर यांनी लष्करी आस्थापनाशी चर्चा करून संबंधित मेजर यांच्या संपर्कात कोण व्यक्ती आले याबाबत माहिती घेतली.सप्लाय डेपो येथून लष्कराच्या विविध युनीटला अन्नधान्य, भाजीपाला सह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो.
कँन्टोमेन्ट हॉस्पीटलमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 80 रूग्नांची व्यवस्था होऊ शकते तुर्तास वीस बेडची व्यवस्था झालेली आहे. लष्करी आस्थापनादेखील लष्करी जवान अधिकारी यांच्यासाठी लष्करी रुग्नालयात तर नागरी विभागातील लोकांसाठी कँन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

नांदगाव, मनमाडमध्ये कोरोनाचा शिरकाव

नांदगाव व मनमाड तालुक्यात पहिल्यांदाच प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. यातील मनमान येथील ४८ वर्षित महिलेचा रिपोर्ट पाझिटिव्ह आला.

सिन्नर, चांदवड तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण

सिन्नर तालुक्यात नवीन एक रुग्ण आढळला आहे. चांदवड तालुक्यातील देवरगाव येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा रुग्णालयात धुळ्यातील 54 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.

सिन्नरमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह

सिन्नर तालुक्यातील पाथरे वारेगाव येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. 1 मे रोजी वडगाव येथे आणखी एक रुग्ण करोनाबाधित आढळून आला. शनिवारी (दि.2) शहरातील वृद्धाला करोनाची बाधा झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या चार झाली आहे. याप्रकरणी सिन्नरमधील सरहदवाडी परिसरातील वाजे लॉन्स परिसर सील करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी हे असतील नियम:

  1. या क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाही
  2. बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही
  3. अत्यावश्यक कामासाठी जाणार्‍या व्यक्तीची तपासणी केली जाणार
  4. अत्यावश्यक सेवेचा वापर या क्षेत्रातील व्यक्ती करु शकतील
  5. परिसरात बॅरिकेटिंग लावण्यात येतील, जेणेकरुन वाहने ये-जा करणार नाहीत
  6. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
  7. या क्षेत्रात पोलिसांकडून २४ तास करण्यात येईल पेट्रोलिंग
  8. प्रतिबंधित क्षेत्रात येणार्‍या जाणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेवण्यात येतील.
  9. या क्षेत्रात विशेष पथकाव्दारे १४ दिवस घरोघरी सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येईल
  10. बाधित रुग्णाच्या सानिध्यातील व्यक्तींचा शोध घेण्यात येईल
  11. संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात येईल
  12. प्रतिबंधित क्षेत्रात घंटागाडी नियमीतपणे येईल
  13. करोना, नाशिक, पॉझिटिव्ह, जिल्हा, मालेगाव, रुग्ण, सील, प्रतिबंधित क्षेत्र

शहरवासियांनी घाबरु नये; बाहेरुन येणार्‍यांवर कारवाई

नाशिक शहरांमधील सहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध पथके तयार करून तातडीने सर्व ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. सावता नगर, उत्तम नगर, पाथर्डी फाटा व एम.एच.बी. कॉलनी सातपूर हे चार क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्रात आरोग्य विभागाच्या विविध पथका मार्फत दैनंदिन सर्वेक्षण करून संशयित रुग्ण शोधण्यात येतील. कोरोना बाधित नागरिकांची संपूर्ण चौकशी करता एक व्यक्ती नाशिक शहरा बाहेरून नियम न पाळता दुधाच्या टँकरमधून भडगाव येथुन आलेले आहे व दुसरी व्यक्ती सात लोकांच्या समुहात मालेगाव जवळील एका गावातून आलेले आहेत. इतर दोन रुग्णांच्या बाबतीत सुद्धा याच प्रकारची पद्धत दिसून येत आहे. यावरून पुन्हा स्पष्ट होते की, नाशिकमध्ये आढळून येणारे कोरोना बाधित रुग्ण हे कोरोना बाधित प्रदेशातून आलेले आहेत. नाशिक शहरामध्ये सामाजिक संपर्कातून कोणीही कोरोना बाधित झालेले नाही, त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोराना बाधित भागातून नाशिक शहरांमध्ये येणार्‍या नागरिकांना किंवा त्यांच्यामुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, या गोष्टीची दखल घेऊन नाशिक महापालिकेतर्फे पोलीस यंत्रणेला कळविण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने गैरमार्गाने अथवा विनाकारण कोरोना बाधित प्रदेशातून येणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

-राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका नाशिक

नाशकात आढळून आलेल्या सहा रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

एक प्रतिक्रिया

  1. छान खुप आवडले मला व्हाट्स अँप ला जॉईन करा

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -