घरCORONA UPDATEहॉस्पिटल मिळण्यासाठी ६ तास फिरले; शेवटी मधुमेही रुग्णाचा झाला दुर्दैवी मृत्यू

हॉस्पिटल मिळण्यासाठी ६ तास फिरले; शेवटी मधुमेही रुग्णाचा झाला दुर्दैवी मृत्यू

Subscribe

कोरोना व्हायरसचा विळखा मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच मुबंई महानगरपालिका आणि सरकारी आरोग्य यंत्रणा कमकुवत पडल्यामुळे आता खासगी हॉस्पिटलमध्ये देखील कोविड रुग्णांसाठी काही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसची लढाई लढत असताना इतर आजाराच्या रुग्णांना मात्र मरणयातना भोगाव्या लागत आहेत. खार पश्चिम येथील खारदांडा येथे राहणाऱ्या विष्णू पांचाळ या ५८ वर्षीय रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तब्बल ६ तास ८ हॉस्पिटलमध्ये धावपळ करुनही कुणीही त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर पांचाळ यांचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.

विष्णू पांचाळ यांचे जावई अवि पोटे यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, माझे सासरे अनेक वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होते. यांच्या उजव्या तळपायावर इजा झाली होती त्यामुळे त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. त्यांच्यावर रामकृष्ण मिशन हॉस्पिटलद्वारे (खार पश्चिम) उपचार सुरु होते. दि. १९ मे रोजी पांचाळ यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना त्यांच्या नेहमीच्या रामकृष्ण मिशन हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलने त्यांना प्रवेश दिला नाही. त्यानंतर सहा तास पोटे आणि पांचाळ परिवार ८ रुग्णालयात गेले. कुणीही त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यानंतर मध्यरात्री ३.०५ वाजता पांचाळ यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

पोटे यांनी यावेळी सर्व हॉस्पिटलची नावे आणि त्यांच्या कारणाची यादीच दिली आहे.

१) रामकृष्ण मिशन हॉस्पिटलने डॉक्टर उपस्थित नसल्याचे कारण देऊन त्यांना नकार दिला.

२) होली फॅमिली हॉस्पिटल (वांद्रे पश्चिम) येथे गेले तिथे त्यांना सुरक्षा रक्षकांनीच बेड्स नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

३) लीलावती हॉस्पिटल (वांद्रे पश्चिम) बेड् नाही आहे. पण त्यांना रुग्णवाहिकेत ऑक्सिजन करुन दिला. तोपर्यंत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करण्यास सांगितले.

४) सुजय हॉस्पिटल (विले पार्ले पश्चिम)
– बेड्स नाही.

५) अॅडवान्स हॉस्पिटल (विले पार्ले पश्चिम) – आमच्या हॉस्पिटलमध्ये ICU बेड नाही.

६) कुपर हॉस्पिटल (विले पार्ले पश्चिम) – रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे, आमच्याकडे ऑक्सिजनची बाटली नाही.

७) पुन्हा अॅडवान्स हॉस्पिटल (विले पार्ले पश्चिम) – आयसीयूमध्ये बेड नसल्याचे कारण दिले.

८) व्हि. एन. देसाई हॉस्पिटल (सांताक्रूझ पूर्व) – रात्री ०२.५० वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचलो. डॉक्टरांना विनवणी केली. इथे दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी अनेक पद्धतीने तपासणी केली आणि शेवटी ०३.०५ वाजता
पाचांळ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दुर्दैवाची बाब म्हणजे पांचाळ यांना कोरोना नसतानाही डॉक्टरांनी त्यांना कोरोना संशयित घोषित केले. त्यामुळे कुटुंबियांना त्यांचे अंत्यसंस्कारही करता आले नाही. अशाप्रकारे कोरोनाच्या महामारीमुळे एका नॉन कोविड रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -