घरमहाराष्ट्रमाझ्या खांद्यावरून वांद्य्रातील सीनियर, बारामतीतील ज्युनियरवर निशाणा

माझ्या खांद्यावरून वांद्य्रातील सीनियर, बारामतीतील ज्युनियरवर निशाणा

Subscribe

शरद पवारांवर देवेंद्र फडणवीसांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले असून, शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, वडिलांना वाटते आपल्या मुलांना काही कळत नाही. म्हणून ते माझ्याबद्दल बोलले असतील. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केले असेल. कदाचित माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्य्राच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर निशाणा साधायचा असेल, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच तुम्ही देखील काही तरी करा, असे शरद पवार यांना सांगायचे असेल असे फडणवीस यावेळी म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दोन दिवशीय कोकण दौर्‍यावर गेले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिले. शरद पवार यांनी बुधवारी ‘फडणवीस कोकणात आले तर चांगलेच आहे. ते नागपूरचे आहेत. नागपूरचा आणि समुद्राचा संबंध नाही. त्यामुळे इथे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. फडणवीस विदर्भातून येतात, त्यांचा समुद्राशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते येत आहेत हे चांगले आहे, असा टोला लगावला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आज वय वर्षे 81 असताना देखील शरद पवार फिरत आहेत. कदाचित त्यांचे मंत्री आणि सरकार काम करत नसतील म्हणून त्यांना फिरावे लागत असावे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी –
दरम्यान, राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगत वादळ येऊन 9 दिवस झाले; पण, राज्य सरकारची कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच ज्यांची घरे गेली आणि तात्पुरत्या शिबिरामध्ये राहतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना योग्य ठिकाणी निवार्‍याची सोय करून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेती, फळबागांचे नुकसान झाले, तर पुढच्यावर्षी ते भरून निघत असते. पण, येथे तर झाडेच राहिली नाहीत. पुढच्या 5 ते 10 वर्षांनंतरच त्यांचे उत्पन्न सुरू होणार आहे. केवळ हेक्टरी मदत जाहीर करून भागणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी सांगत राज्य सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त केली.

आज कोकणातील लोकांना थेट आर्थिक मदत देण्याची आज नितांत गरज आहे. 100 टक्के अनुदानातून फळबाग योजनेचा लाभ दिला पाहिजे. मासेमारांचे तर फार मोठे नुकसान झाले आहे. मासेमारीसंदर्भात अजून कोणतीही मदत जाहीर नाही. होड्यांसाठी त्यांना तात्काळ मदत देण्याची गरज असल्याचे देखील ते यावेळी म्हणालेत. प्रशासन प्रयत्न करीत असेल; पण, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. कुणाला मदत मिळत आहे, असे मला या दौर्‍यात दिसून आले नाही. शासन आणि प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे. कोल्हापूर, सांगली पुराच्यावेळी आम्ही कपडे आणि भांड्यांसाठी 7500 रुपये दिले होते. तात्पुरत्या निवार्‍यासाठी 36 हजार आणि 24 हजार असे एकरकमी भाडे देण्याचा निर्णय केला होता. मला तुलना करायची नाही. पण, ठोस निर्णय घेण्याची ही वेळ असल्याचे सांगत तसा ठोस निर्णय होत नसल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -