घरमुंबईस्कॉयवॉक बनलेत गर्दुल्ले , प्रेमीयुगलांचे अड्डे !

स्कॉयवॉक बनलेत गर्दुल्ले , प्रेमीयुगलांचे अड्डे !

Subscribe

रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि पादचार्‍यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) मुंबईत 36 स्कायवॉक उभारले. यासाठी ७३२.७३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. एमएमआरडीएने पश्चिम उपनगरांत १३, पूर्व उपनगरांमध्ये ११ स्कायवॉक बांधले. यापैकी काही स्कायवॉकची स्थिती चांगली असली तरी बर्‍याच स्कायवॉकची दुरवस्था झालेली आहे. यापैकी अनेक स्कायवॉक गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे अड्डे बनले आहेत. काहींच्या लाद्या आणि रेलिंंग तुटले आहेत. त्यामुळे ते पादचार्‍यांना वापरणे कठीण होऊन बसले आहे. या स्कायवॉकचा ‘टीम महानगर’ने तयार केलेला ग्राउंड रिपोर्ट.

स्कायवॉक कुठे बांधले –

पश्चिम उपनगर – वांद्रे पूर्व (कलानगर-न्यायालय), वांद्रे पश्चिम, दहिसर पूर्व, सांताक्रूझ पश्चिम, सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व, बोरिवली पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, दहिसर पश्चिम, बोरिवली

पूर्व उपनगर – कांजूरमार्ग, विद्याविहार पश्चिम, विद्याविहार पूर्व, चेंबूर, कॉटन ग्रीन, विक्रोळी पश्चिम, घाटकोपर पूर्व, भांडुप पश्चिम, शीव, वडाळा

- Advertisement -

 

घाटकोपर (पूर्व आणि पश्चिम)

 

- Advertisement -

प्रेमीयुगुल, हॉकर्स व गर्दुल्ल्यांसाठी स्कायवॉक


घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला स्कायवॉक बांधण्यात आला आहे. मात्र पूर्वेकडील स्कायवॉकचा प्रवाशांकडून बर्‍यापैकी वापर होत असला तरी पश्चिमेकडील स्कायवॉकचा प्रवाशांकडून फारसा वापर होत नाही. त्यामुळे हा स्कायवॉक प्रेमी युगुलांचे हक्काचे ठिकाण बनले असून, त्यांचे अश्लिल चाळेही सुरू असतात. या स्कायवॉकवर महाविद्यालयीन तरुण मोठ्याप्रमाणात असतात. तसेच गर्दुल्लेही मोठ्या प्रमाणात असल्याने लहान मुलांना घेऊन जाणार्‍यांची व महिलांची मोठी पंचाईत होते. पूर्वेकडील स्कायवॉकवर मोबाईल विक्रेते व अन्य फेरीवाल्यांनी आक्रमण केलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही स्कायवॉक कोणासाठी बांधले आहेत असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. स्कायवॉकच्या पायर्‍यांवरील लाद्या उखडलेल्या अवस्थेत आहेत. तर अनेक ठिकाणी स्कायवॉकचे रेलिंग तुटलेले असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

विक्रोळी (पश्चिम)

   स्वच्छतेबाबत समाधानी


विक्रोळी पश्चिमेकडील स्कायवॉकचा हा एलबीएस मार्गाकडे जातो. याचा वापर फारसा होत नसल्याने यावर भिकार्‍यांचा वावर दिसून येतो. तसेच स्कायवॉकवर चढण्यासाठी असणार्‍या पायर्‍यांची दुरवस्था झाली आहे. अनेक पायर्‍या तुटलेल्या असल्याने प्रवाशांना स्कायवॉकवर चढताना त्रास होतो. स्कायवॉकवर अनेक ठिकाणी लाद्या तुटलेल्या आहेत. परंतु स्कायवॉकवरील स्वच्छतेबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या स्कायवॉकवरही तरुण मोठ्या प्रमाणात टाईमपास करताना दिसून येतात.

भांडुप पश्चिम

वाहतूक कोंडीतून सुटका

भांडुप रेल्वेस्थानकापासून एलबीएस मार्गाकडे जाण्यासाठी प्रवाशांना स्टेशन रोडवरून फेरीवाले, रिक्षा व बस स्थानक यांमधून वाट काढत रेल्वे स्थानक गाठावे लागे. परंतु हा स्कायवॉक बांधल्यामुळे नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात. या स्कायवॉकवर स्वच्छता असल्याने आणि समाजकंटकांचे वास्तव्य यावर नसल्याने याचा वापर प्रवासी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा स्कॉयवॉक भांडुपच्या फलाट २, ३ आणि ४ ला जोडतो. परंतु १वर येणार्‍या प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर येऊन वळसा घालून जावे लागत असल्याने प्रवाशांना थोडासा त्रास होतो.

कांजूरमार्ग (पूर्व)

प्रेमीयुगुलांमुळे हैराण

कांजूरपूर्वेकडे असलेल्या कर्वे नगर वसाहतीतील नागरिकांना रेल्वेस्थानकात सहज जाता यावे यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. यावर स्वच्छता व्यवस्थित असली तरी स्कायवॉकवर चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांच्या लाद्या तुटलेल्या आहेत. हा स्कायवॉक बांधताना त्यावर विक्रेत्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. परंतु तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. या स्कायवॉकवर सायंकाळच्या वेळी फेरीवाले बस्तान मांडतात तसेच प्रेमीयुगुलांचे अश्लिच चाळे सुरू असल्याने प्रवाशांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो.

विद्याविहार (पूर्व व पश्चिम)

स्कायवॉक की घसरगुंडी


विद्याविहार रेल्वे स्थानकापासून पूर्वेला राजावाडी हॉस्पिटल व सोमय्या महाविद्यालयाकडे जाण्यासाठी तसेच पश्चिमेला फिनिक्स मॉलकडे जाण्यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. या स्कायवॉकवर ठिकठिकाणी लाद्या तुटलेल्या असून, तेथे सिमेंट लावण्यात आले आहे. परंतु पावसाळ्यात त्या सिमेंटवरून चालताना अनेकजणांचा पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या स्कायवॉकचा वापर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात होत असला तरी घसरण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

कॉटनग्रीन (पश्चिम)

महिला प्रवाशांसाठी असुरक्षित

कॉटनग्रीन रेल्वेस्थानकापासून काळाचौकीला जाणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला होता. परंतु अभ्युदयनगरकडे जाणार्‍या मार्गाचाच फक्त वापर होताना दिसतो. स्कायवॉकवर प्रचंड घाण असून त्याच्या दुतर्फा पान व मावा खाऊन थुकल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. गर्दुल्ले व चरसी मोठ्या प्रमाणात स्कायवॉकवर असतात. तसेच रात्रीच्या वेळी हा स्कायवॉक लव्हर पॉईंट बनतो. त्यामुळे या स्कायवॉकवरून जाणार्‍या नागरिकांची विशेषत: महिलांची कुंचबना होते. काही वेळा हा स्कायवॉक अंधारात असतो. स्कायवॉकवर सीसीटीव्ही व अन्य कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने यावरून महिला प्रवास करणे टाळतात. पोलीस ठाणे जवळ असूनही स्कायवॉकवरील गर्दुल्ल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे प्रवाशांबाबत एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.

सायन

लोकांकडून दुर्लक्षित


मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारा महत्वाच्या जंक्शनपैकी एक म्हणजे सायन. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असल्याने स्थानिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे याची दखल घेऊन काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएने या ठिकाणी स्कॉयवॉक बांधले. पण अल्पावधीत स्कॉयवॉककडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा स्कॉयवॉक ओस पडलेला दिसतो. यावर गर्दुले किंवा प्रेमी युगलांची संख्या तशी कमी असते. हा खूप उंच असल्याने प्रवासी याचा वापर करत नाहीत. वरिष्ठ नागरिकांकडूनही नापसंती दर्शवली जाते. त्यामुळे या स्कॉयवॉकचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. स्कॉयवॉकची अवस्था तशी चांगली असली तरी काही ठिकाणी लाद्या तुटलेल्या आहेत. ज्याची दुरस्ती करणे गरजेचे आहे.

पश्चिम रेल्वे मार्ग

 

ग्रॅन्ट रोड

बेघर व गर्दुल्ल्यांचा वावर

ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, पेडर रोड, ताडदेव, ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानक, ग्रॅन्ट रोड मार्केटच्या दिशेने असे सहा रस्ते नाना चौकात एकत्र येतात. त्यामुळे येथील वर्दळ कमी करण्यासाठी आकर्षक असा स्कायवॉक बांधण्यात आला. स्कायवॉकवर स्वच्छता चांगली असली तरी अनेक ठिकाणी लाद्या उखडलेल्या आहेत. तसेच पुलावर भिकारी, बेघर व वर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. स्कायवॉकवर एका ठिकाणी छत गळत असल्याने पावसाळ्यात स्कायवॉकवरून जाणार्‍या प्रवाशांना त्याचा सामना करावा लागतो. हा स्कायवॉक ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकात जाणार्‍या पुलाला जोडण्यात आला आहे. मात्र स्कायवॉकवर तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांनी स्कायवॉकवरून रेल्वे स्थानकाबाहेर उतरावे लागते. तिकीट काढून पुन्हा पुलावरून दोन, तीन किंवा चार क्रमांकाच्या फलाटावर जावे लागते. हा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी प्रवासी या स्कायवॉककडे पाठ फिरवत पदपथावरूनच चालणे पसंत करीत आहेत.

बोरिवली

 

जीव मुठीत घेऊन प्रवास


बोरिवली रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ व बोरिवली कारागृहापर्यंत जाण्यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. मोक्ष मॉलजवळ उतरणार्‍या स्कायवॉकच्या पायर्‍या तुटलेल्या असून, यावरून पाय सरकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पायर्‍यांवरून उतरताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन उतरावे लागते. स्कायवॉकच्या ठिकठिकाणी लाद्या तुटलेल्या आहेत. तसेच स्कायवॉकवर फुलवाले व अन्य फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडचणी येतात.

दहिसर

दहिसर पश्चिमेला विठ्ठल मंदिर सुरुवात रुस्तमजीपर्यंत असलेल्या स्कायवॉक मागील सहा महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणार्‍या प्रवाशांना वळसा मारून स्थानकात जावे लागते. स्कायवॉकचा प्रवेशद्वार लोखंडी पत्र्यांनी बंद केला असूनही गर्दुल्ले आणि भिकारी त्यातूनही आतमध्ये शिरून तेथे आपले बस्तान मांडले आहे. इतकेच नव्हेतर स्कायवॉक बंद करण्यासांठी प्रशासनाने लावलेले पत्रेही गर्दुल्ल्यांनी काढून विकले आहे. स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांकडून घाण केली जाते. या स्कायवॉकाचे लोखंडी पत्रेसुद्धा चोरीला जातं आहेत. हा स्कायवॉक धनश्री बिल्डरकडून बांधण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या बंद असलेल्या स्कायवॉककडे प्रशासनाचे लक्ष नाही असे दिसून येत आहे.

गोरेगाव

गोरेगाव येथील स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकची काही ठिकाणी पडझड झाली आहे. पडझड झालेला परिसर प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. स्कायवॉकची पडझड झालेल्या परिसरात युटीलिटीच्या केबल आणि पत्रे टाकून प्रशासनाकडून काही भाग बंद ठेवला आहे.

सांताक्रुज (पूर्व व पश्चिम )


सांताक्रुज रेल्वेस्थानकाला पूर्व आणि पश्चिम असे दोन स्कायवॉक बांधण्यात आला आहे. पूर्वेकडे कलिना, धोबीघाट, दावली नगरला जाणार्‍यांना हा स्कायवॉक आहे. तर पश्चिमेला दिशेला जुहू,वरळी कोळावाडा या परिसरातील प्रवाशाना या स्कायवॉकचा मोठा फायदा होतं आहे. मात्र या स्कायवॉकवर ठिकठिकाणी लाद्या तुटलेल्या आहे. पूर्वेचा दिशेने असलेल्या स्कायवॉकवर फेरीवाल्याची मोठी संख्या आहे. सोबतच पुलावर भिकारी, बेघर व वर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात समस्यांना समोर जावे लागत आहे.

बांद्रा (पूर्व व पश्चिम )


पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकातील महत्त्वाचे स्थानक म्हणेज वांद्रे. या स्थानकाला ‘हेरिटेज’चा दर्जा आहे. मात्र, सुविधांच्या बाबतीत विचार केला, तर येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. अरुंद पूल येथील मोठी समस्या असून, येथे सरकते जिनेदेखील नाहीत. वांद्रे स्थानकावर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेअभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वांद्रे येथे विविध प्राधिकरणांची कार्यालये आहेत. माउंट मेरी हे प्रसिद्ध चर्च येथे आहे. वांद्रे उपनगरीय क्षेत्र, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) हे आधुनिक व्यावसायिक क्षेत्र येथे आहे. त्यामुळे इकडे जाणार्‍यांची संख्या सुद्धा जास्त आहे. वांद्रे स्थानकावर पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही दिशेला स्कायवॉक बांधले आहेत, परंतु या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. पूर्वेकडील स्कायवॉकवरील लाद्या उखडलेल्या आहेत. कचराकुंड्या गायब झाल्या आहेत, तसेच पश्चिमेकडील स्कायवॉकवरदेखील लाद्या उखडलेल्या आणि कचराकुंडी गायब झाली आहे, तसेच स्कायवॉकवर तृतीयपंथीयांचे वास्तव असल्याने स्कायवॉकवर अस्वच्छता असते.

फेरीवाल्यांचा विळखा आणि विद्रुपीकरण

हार्बर रेल्वे स्थानकांपैकी महत्वाचे स्थानक म्हणजे वडाळा. एमएमआरडीए प्रशासनाने जवळपास ४० कोटी खर्च करुन याठिकाणी स्कॉयवॉक बांधला. हा स्कायवॉक अ‍ॅटॉप हिल, बरकत अली नाका, विद्यालंकार महाविद्यालय या परिसरातला जोडतो. परिसरातील नागरिक व महविद्यालयाचे विद्यार्थी याचा वापर करत असले तरी स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. स्कॉयवॉकला भाजीवाले, मोबाईल साहित्य विक्रेते या फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. स्कॉयवॉकवरील रॉड आणि रेलिंग तुटले असून, ते येथील गर्दुल्यांनी चोरल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्वच्छतेच्या नावावर मात्र कोणत्याही उपाय योजना राबविलेली नसल्याचे दिसून येते. स्कॉयवॉकवरील लाद्या तुटलेल्या असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. स्कायवॉकवर चोर्‍यांचे प्रमाणही वाढल्याने स्थानिकांकडून पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

संकलन -अक्षय गायकवाड, विनायक डिगे, अजयकुमार जाधव, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, धवल सोलंकी, सौरभ शर्मा,

 

सर्व छायाचित्रे – प्रवीण काजरोळकर, संदीप टक्के,संकेत शिंदे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -