घरमुंबईनिसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कॉलेजांना मदतीचा हात

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कॉलेजांना मदतीचा हात

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १५ कॉलेजांसाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून या कॉलेजांना ५६ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १५ कॉलेजांसाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून या कॉलेजांना ५६ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काही कॉलेजांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या कॉलेजांना मदत करण्यासाठी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, संजय शेट्ये, प्रिन्सिपल असोसिएशनचे डॉ. तुकाराम शिवारे, कोकण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी कोकणात पाहणी दौरा करून विद्यापीठास अहवाल सादर केला होता. तसेच कॉलेजांना तातडीने मदत करण्याची मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने कॉलेजांच्या नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या निर्देशानुसार प्र.कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. रासेयो कार्यक्रम अधिकार्‍यांनी एकत्रित केलेल्या माहितीवरून कॉलेजांच्या इमारतीचे पत्रे, इलेक्ट्रीक वायरिंग, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन समितीने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील सुमारे १५ कॉलेजांना ५६ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. ही मदत रोखीने न देता संबंधित कॉलेजांनी पत्रे, इलेक्ट्रीकल्स साहित्य, शैक्षणिक साहित्य, विकत घेऊन बिले सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून विद्यापीठाकडे पाठवून परतावा दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातर्फे मदत जाहीर केलेल्या कॉलेजांची यादी

  • लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, मंडणगड ७ लाख रुपये
  • विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे मॉडेल कॉलेज ७ लाख
  • टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालय, माणगाव ७ लाख
  • दोशी वकील कला, गोरेगाव कॉ-ऑपरेटिव्ह अर्बन बँक विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोरेगाव ७ लाख
  • एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय दापोली ४ लाख
  • दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय दापोली ४ लाख
  • माणगाव शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, विज्ञान महाविद्यालय, माणगाव ४ लाख
  • जी.बी. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पी.जी. ढेरे कला व एम. जी. भोसले विज्ञान महाविद्यालय, गुहागर २ लाख
  • गोखले शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन २ लाख
  • वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसळा, रायगड २ लाख
  • द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा, रायगड २ लाख
  • जी.एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा- २ लाख
  • डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय, रोहा २ लाख
  • शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालय पाली २ लाख
  • अंजूमन इस्लाम वाणिज्य महाविद्यालय, श्रीवर्धन २ लाख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -