घरफिचर्सवाट चालता चालता...

वाट चालता चालता…

Subscribe

शैलेन्द्र आणि जयकिशननी बाहेर पडून आपली वाट धरली. सुरूवातीला एक गीतकार आणि एक संगीतकार अशा चर्चा सुरू झालेल्या आणि नंतर आपसुक अवांतर चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या त्या चर्चेनेही एक छान सूर पकडला. रस्त्यावरच्या चर्चेतही त्यांना एकदम मूड आला. आजुबाजूच्या जगाचा, जगातल्या माणसांचाही त्यांना विसर पडला. पण इतक्यात एक गालावरचा चंद्र त्या दोघांसमोर आला. जयकिशनच्या तो नजरेस पडला. शैलेन्द्रंनीही तो पाहिला. त्या मुखचंद्रम्याची दखल घेतली. पण ती तेवढ्यापुरतीच. नंतर शैलेन्द्रंनी आपली एक क्षण थांबलेली चर्चा पुन्हा सुरू केली. पण जयकिशनचं त्या चर्चेकडे अजिबात लक्ष नव्हतं.

कविवर्य नारायण सुर्वेंच्या एका कवितेत त्यांनी ‘गालावरचे चंद्र’ असा शब्दप्रयोग केला आहे. नारायण सुर्वेंच्या कवितेतले हे गालावरचे चंद्र तरूणपणाच्या नाक्यावर जरा जास्तच न्याहाळले जातात. जगातल्या कोणत्याही रस्त्यातून जाताना असे चंद्रनिरीक्षक कधीच अल्पमतात नसतात. ते कायम बहुमतात असतात. कशाला, अशाच वाटसरूंनी रस्ता जास्त व्यापलेला असतो. तरूणपणी तर अशा चंद्रांची वर्दळ रस्त्यावर जास्त असल्याने अशा चंद्रांच्या रसिकांची, भाविकांची गर्दीही जास्त असते. गालावरच्या चंद्रांनी ट्रॅफिक जाम झालेला असा रस्ता गालावरच्या चंद्रम्याच्या अशा रसिकांना नागमोडी आकाशगंगा वाटला नाही तरच नवल! खगोलशास्त्रानुसार ज्युपिटरला जसे एकापेक्षा अनेक चंद्र असतात तसे ह्या नियमानुसार आपल्या ह्या पृथ्वी नावाच्या ग्रहगोलालाही अनेक चंद्र असतात असा प्रस्ताव जर ह्या रस्त्यावरच्या रसिकभाविकांनी मांडला तर आपण तरी ह्या प्रस्तावाला आक्षेप का घ्यावा!

…काही म्हणा, पण गालावरचे चंद्र दिसले की माणसं एकाएकी सौंदर्यपूजक होऊन जातात. क्वचितप्रसंगी कवीचंही रूप धारण करतात. त्यांच्यातला कवी उसळी मारून वर येतो. आठवते का सांज तुला पाउसओली, भिजलेल्या रंगात आपुली ओळख झाली, वगैरे टाइपची कविता त्याच्या मनाच्या जलाशयातून डुबकी मारून वर येते. अशा वेळी लाइफ कितीही फास्ट झालं तरी लोक पुढे बघून चालतातच असं नाही, गालावरचे चंद्र दिसले, आपल्या जवळून चटकन ‘पास’ झाले की मागे वळून बघतातच. मानेला हिसका देऊन बघतात. जणू पाठमोर्‍या सुंदर भुतकाळाकडे त्या एका क्षणी ते चंद्र दिसेनासे होईपर्यंत बघत राहतात. मनात टिपलेले ते टिपूर चंद्र काही काळानंतर विरघळून, वितळून जात असतीलही, पण काही क्षण तरी त्या चंद्रांनी जीवाचे हाल केलेले असतात.

- Advertisement -

कवी-गीतकार शैलेन्द्रंनीही हे एका ठिकाणी अनुभवलं. अर्थात, त्यांचा हा अनुभव दुसर्‍याच्या बाबतीत होता. शैलेन्द्र तेव्हा नुकतेच गीतकार म्हणून नावारूपाला येत होते. सिनेमा लाइनीत तरीही त्यांचा उमेदवारीचा काळ सुरू होता. त्यांच्या आयुष्याचा पतंग तसा स्थिरावलेला नव्हता. पण ठिकठिकाणी होणार्‍या कवितांच्या मैफलींतून त्यांचं नाव लोकांना माहीत होत होतं. तसं पाहिलं तर त्यांच्या सुरूवातीच्या काळात कवितेची वाट वाकडी करून सिनेमांसाठी गाणं लिहिणं त्यांना आवडणारं नव्हतं. त्यासाठी त्यांची कविता ऐकून राज कपूरनी सिनेमासाठी गाणं लिहिण्याचा आणलेला प्रस्तावही त्यांनी धुडकावून लावला होता. पण शेवटी पैशापाण्याचा प्रश्न आला आणि शैलेन्द्रसारख्या कवीला आपली तत्वं, आपली आवड आपल्या कपाटात कडीकुलूप करून ठेवावी लागली. राज कपूरकडे जावं लागलं. सिनेमासाठी गाणी लिहिण्याची वाट पकडावी लागली.

…तर असे हे शैलेन्द्र राज कपूरच्याच श्री 420 साठी गाणं लिहिण्याच्या तयारीत होते. श्री 420 चं कथानक राज कपूरनी त्यांच्यापुढे मांडलं होतं. कुठे कुठे गाण्याची दृष्यं असतील हेही राज कपूरनी त्यांना जुजबी सांगून ठेवलं होतं. उमेदीचा काळ असल्यामुळे शैलेन्द्रंसोबत ते कथानकही प्रवास करत होतं. राज कपूरसोबत शैलेन्द्रंचंही त्या सिनेमातल्या गाण्यांसाठी आपलं असं चिंतन सुरू होतं. आणि अशाच एका वेळी त्यांनी श्री 420 चे संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशनची भेट घ्यायचं ठरवलं. शैलेन्द्रंनी त्या दोघांशी श्री 420 च्या कथानकाबाबत, त्यावर संगीत कसं असेल वगैरे खूप गप्पा मारल्या. त्यांना त्यासाठी आपल्या मनातले काही गाण्याचे बोल ऐकवले आणि ते सारं ऐकवून आता निघण्यासाठी ते खुर्चीतून उठणार इतक्यात शंकर-जयकिशनमधल्या जयकिशननी, म्हणजे जयकिशन डाह्याभाई पांचालनी त्यांना हाक मारली.

- Advertisement -

जयकिशन म्हणाले, शैलेन्द्र, तू आता घरी निघाला आहेस का?
शैलेन्द्रंनी मानेनेच हो म्हटलं.
जयकिशन म्हणाले, चल, मीसुध्दा तुझ्याबरोबर येतो, मीसुध्दा घरीच निघालोय.
आपल्यासोबत वाटेत कुणाची सोबत असणं शैलेन्द्रंना आवडणारंच होतं.
शैलेन्द्र म्हणाले, तू येत असशील तर बरंच आहे, रस्ताही मोठा वाटणार नाही आणि वेळही मोठी वाटणार नाही.

झालं, शैलेन्द्र आणि जयकिशननी बाहेर पडून आपली वाट धरली. सुरूवातीला एक गीतकार आणि एक संगीतकार अशा चर्चा सुरू झालेल्या आणि नंतर आपसुक अवांतर चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या त्या चर्चेनेही एक छान सूर पकडला. रस्त्यावरच्या चर्चेतही त्यांना एकदम मूड आला. आजुबाजूच्या जगाचा, जगातल्या माणसांचाही त्यांना विसर पडला. पण इतक्यात एक गालावरचा चंद्र त्या दोघांसमोर आला. जयकिशनच्या तो नजरेस पडला. शैलेन्द्रंनीही तो पाहिला. त्या मुखचंद्रम्याची दखल घेतली. पण ती तेवढ्यापुरतीच. नंतर शैलेन्द्रंनी आपली एक क्षण थांबलेली चर्चा पुन्हा सुरू केली. पण जयकिशनचं त्या चर्चेकडे अजिबात लक्ष नव्हतं. शैलेन्द्र जे काही बोलत होते त्याला जयकिशन नुसतं हांहू करत होते. कारण समोरून जो गालावरचा चंद्रमा आला होता त्यात जयकिशन पुरते गुंगून गेले होते. समोरून आलेला तो चंद्रमा समोरून येऊन मागे गेला तरी जयकिशन त्या चंद्राला मान वळवून वळवून पहात राहिले, पण पुढे पुढे चालत राहिले, पण पुढे पुढे चालताना पुन्हा मागे मागे पहात राहिले. तो चंद्रमा धुसर होईपर्यंत पहात राहिले. आपल्यासोबत शैलेन्द्र आहेत ह्याचाही जयकिशनना विसर पडला.

नेमकी हीच वेळ शैलेन्द्रंच्या मनातल्या शब्दांनी साधली.
शैलेन्द्र जयकिशनना भानावर आणत म्हणाले, मुड मुड के ना देख मुड मुड के, जिंदगानी के सफर में तू अकेला ही नही हैं, हम भी तेरे हमसफर हैं.
हेच शब्द पुढे श्री 420चं गाणं बनून पडद्यावर झळकले. मन्ना डे आणि आशा भोसलेंनी गायले. जीवनाच्या प्रवासात तुम्ही एकटेच नाहीत, आम्हीही तुमच्यासोबत आहोत असा संदेश देऊन गेले.
खरं तर त्या दिवशी जयकिशनना शैलेन्द्रंनी म्हटलं, आपण दोघंही एकाच वाटेने चालत आहोत, पण तुझ्यासोबत कुणी आहे हे तू विसरून गेलास, पण मी विसरलो नाही, माझ्या सोबतीची मी तुला आठवण करून दिली. जीवन जगताना ही अशी आठवण कधी कधी करून द्यावी लागते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -