घरताज्या घडामोडीमहापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्याचे निधन

महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्याचे निधन

Subscribe
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयातील सहाय्यक मनपा चिटणीस (कनिष्ठ) कर्मचारी अजित दुखंडे यांचे बुधवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळी ऑफिसला आल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्याचा हालचाली सुरू असतानाच त्यांची मुलगी ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या गोड बातमी आली. परंतु मोठ्या प्रयत्नानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूची बातमी धडकली. मुलगी दहावीत पास झाल्याच्या आनंद अवघ्या काही तासांतच वडिलांच्या मृत्यूने दुःखात पसरला.

महापालिका चिटणीस विभागाचे सहाय्यक मनपा चिटणीस( कनिष्ठ) अजित दुखंडे हे विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात  कार्यरत असून ते बुधवारी सकाळी ऑफिसला आल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने कार्यालयातील इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील दवाखान्यात असलेल्या डॉक्टरांनी याची कल्पना दिली. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी कोरोनाचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना केल्या. त्यानंतर महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाला कल्पना देऊन रुग्णवाहिकेची मागणी केली. पण त्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांनी अर्धा तासात ही रुग्णवाहिका येईल, असे उत्तर दिले. त्यानंतर १२ वाजता त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यात त्यांची कोविडची चाचणी  करण्यात आली. काही तासात ही चाचणी निगेटिव्ह आली. याच दरम्यान अजित यांची मुलीने दहावीत ८० टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाल्याची बातमी ऐकून ते आनंदीही होते. कोविडची चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण चार वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

महापालिका मुख्यलयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष असून त्याच इमारतीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर विव्हळण्याची वेळ आली तरी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर रुग्णालयात दाखल केले असते तर ते कदाचीत वाचले असते, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालयात ५ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकरिता कोणतीही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. भाजपच्या महापालिका कार्यालयात कामाला असताना अजित दुखंडे हे महापलिका चिटणीस सेवेत लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -