घरदेश-विदेशबिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही-परमबीर सिंह

बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही-परमबीर सिंह

Subscribe

सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही, मुबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून याच प्रकरणात आतापर्यंत 56 जणांची चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली आहे. सुशांतच्या बँक खात्यात अद्याप साडेचार कोटी रुपये जमा असून तेरा ते चौदा कोटींचा व्यवहार झाला आहे. मात्र, या व्यवहारात सुशांतच्या बँक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या बँक खात्यात कुठलीही रक्कम ट्रान्स्फर झाली नाही, असे सांगताना पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी बिहार पोलिसांना मुंबईत तपास करण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सुशांतच्या घरी कुठलीही पार्टी झाली नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला होता.

- Advertisement -

त्यानंतर या फ्लॅटचा ताबा राजपूत कुटुंबियांना देण्यात आला होता. सुशांतच्या मोबाईलसह लॅपटॉपसह इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे. सुशांतच्या आर्थिक, मानसिक स्थितीचा तपास करून सर्व बाजू तपासून घेण्यात आले होते. त्यामुळे वांद्रे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहेत. याच प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 56 जणांची चौकशी करून त्यांच्या जबानी नोंदवून घेतल्या आहेत. त्यात सुशांतच्या वडिलांसह बहिणी, मॅनेजर, मित्र, बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती, तिन्ही नोकरांचा समावेश आहे.

या जबानीत सुशांतच्या बहिणीसह भावोजी यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. तसेच आरोप केला नव्हता. त्यांचा जबाब पुन्हा नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी सर्वांना समन्स बजावले होते. मात्र, सुशांतच्या बहिणीसह इतर कोणीही पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी आले नाही. तरीही वांद्रे पोलीस त्यांच्या संपर्कात असून त्यांची दुसर्‍यांदा पुन्हा जबानी नोंदविण्यात येणार आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बिहारच्या पटना शहरातील राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरुद्ध अपहार फसवणुकीसह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, गुन्हा मुंबईत घडल्याने त्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, बिहार पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. मूळात बिहार पोलिसांना मुंबईत तपास करण्याचा अधिकारच नाही, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात बिहार पोलिसांनी वांद्रे आणि मालवणी पोलिसांकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र, तपासाची कागदपत्रे अशा प्रकारे कोणालाही देता येत नाहीत, त्यासाठी मुंबई पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच बिहार पोलिसांना मदत किंवा सहकार्य केले जाणार आहे. बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबईत आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले आहे, हा अधिकार केवळ महानगरपालिकेला असून त्याचा मुंबई पोलिसांशी काहीही संबंध नाही असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी पार्टी झाली होती. मात्र, इमारतीचे सीसीटीव्ही ताब्यात घेतल्यानंतर 13 आणि 14 जूनला सुशांतच्या घरी पार्टी झाल्याचे काहीही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. सुशांत आणि दिशा सालियन आत्महत्येचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्या दिवशी ही घटना घडली. तेव्हा दिशा ही तिचा प्रियकर रोहन रॉयसह इतर चार मित्रांसोबत रोहनच्या घरी होती. काही वेळानंतर त्यांना दिशा ही इमारतीवरून पडल्याचे समजले. याबाबत संबंधित सहाजणांसह दिशाच्या आई-वडिलांची जबानी नोंदविण्यात आली होती, त्यांनीही कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा आरोप केला नव्हता.

दिशाच्या आत्महत्येशी सुशांतला जोडण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियावर आलेले संबंधित वृत्त पूर्णपणे चुकीचे होते. या वृत्तामुळे सुशांत हा प्रचंड मानसिक तणावात होता, त्याला प्रचंड धक्का बसला होता, यासंदर्भात त्याने त्याच्या वकिलांशी चर्चा केली होती. मार्च महिन्यांत सुशांत हा एकदाच दिशाला भेटला होता, ही एक रुटीन भेट होती. सुशांत हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने बॉयपोलर, डिऑर्डर, पेनलेस डेथ, सिजोफ्रोमिया या तीन गोष्टी गुगलवर सर्च केल्या. अनेकदा तो स्वतःचे फोटो आणि त्याच्याविषयी आलेल्या बातम्या बघत होता. सुशांतच्या वडिलांनी रियावर त्याच्या बँक खात्यातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, बँक स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर सुशांतच्या खात्यात 18 कोटी रुपये होते, त्यापैकी साडेचार कोटी अद्याप त्याच्या खात्यात जमा आहेत. त्यातील एकही पैसा रियाच्या बँक खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे रियाने आर्थिक गैरव्यवहार केला आहे की नाही हा तपासाचा भाग आहे. सुशांत आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून वांद्रे पोलिसांनी अद्याप कोणालाही क्लीन चिट दिली नाही, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पाटणाहून चौकशीसाठी आलेले पोलीस अधीक्षक क्वारंटाईन

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांकडून होणार्‍या चौकशीचे नेतृत्त्व करण्यासाठी मुंबईत आलेले पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेकडून रविवारी रात्री जबरदस्तीने क्वारंटाईन करण्यात आले. मुंबई महापालिकेने मात्र कोविड-१९च्या नियमावलीप्रमाणेच कारवाई केल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी तिवारी यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत तिवारी हे आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, तिवारी हे रविवारी मुंबईत पोहचले होते. रविवारी रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तिवारी राहात असलेल्या ठिकाणी त्यांचा माग काढत पोहचले.

त्यानंतर त्यांना जबरदस्तीने १४ दिवसांसाठी गोरेगाव येथील राज्य रिझर्व्ह पोलीस दलाच्या अतिथिगृहात क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. विशेष म्हणजे बिहार पोलिसांनीच एक चार सदस्यांची टीम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आली आहे. या टीममधील सदस्यांना मात्र क्वारंटाईन करण्यात आलेले नाही. मात्र, त्यांनाही लवकरच मुंबई महानगरपालिकेमार्फत क्वारंटाईन करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, तिवारी यांच्याबद्दल जे झाले ते चुकीचे आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी एक ट्वीट केले. त्यानुसार, आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे बिहार पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्त्व करण्यासाठी पाटणाहून मुंबईला ऑनड्युटी आले. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी रात्री ११ वाजता त्यांना बळजबरीने क्वारंटाईन केले. तिवारी यांनी आपल्याला आयपीएस मेसमध्ये ठेवण्यात यावे, अशी विनंती केली. मात्र, तरीही त्यांना गोरेगावमधील एका अतिथीगृहात ठेवण्यात आले आहे.

कोण आहेत विनय तिवारी
शेतकर्‍याचा मुलगा मध्ये आयआयटी बीएचयूमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी स्टिलमध्ये नोकरी होण्यासाठी नोकरी सोडली मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये ५० वी रँक, आयपीएसमध्ये १९३ वी रँक इन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि टॉप कॉप अ‍ॅण्ड प्रिंसिपल ऑफ लाईफ’ विषयावर पुस्तक

मुंबई महापालिकेची भूमिका
बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय नियमाला धरून आहे. असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड-१९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करणे आवश्यक होते असे महापालिकेने म्हटले आहे. आमच्या पथकाने ते थांबलेल्या विश्रामगृहावर पोहोचून सर्व प्रक्रिया समजावून सांगितली असे महापालिकेने म्हटले आहे.

बिहार पोलिसांची अडवणूक नको

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झाले आहे. बिहारच्या आयपीएस अधिकार्‍याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. याप्रकरणी बिहार पोलिसांना निरपेक्षपणे तपास करू द्यावा. मुंबई पोलीस चांगले काम करत आहेत. मात्र, कधीकधी राजकीय दबावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सोमवारी (दि.३०) नाशिकला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरंटाईन केले. त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. याविरोधात भाजपने आंदोलनही केले. याबाबत फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. याच पोलिसांसोबत मी काम केले आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस चांगले काम करत आहेत. मात्र, कधीकधी राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. बिहार पोलिसांना क्वॉरंटाईन का केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहार पोलिसांना जो तपास करायचा तो करू द्यावा. तपास मुंबई पोलिसांनी करावा की बिहार पोलिसांनी याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. महाराष्ट्र सरकारवर यामुळे संशय निर्माण होत आहे. तो सरकारने दूर करावा, असे सांगत सरकारच्या सध्याच्या भूमिकेमुळे जनतेच्या भावनांचा अनादर होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले..

राम मंदिर मुद्यावरून विवाद टाळावा
अयोध्येत होणार्‍या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण कुणालाच नाही. कार सेवकांच्या वेळी उपस्थित असल्याने मला जाता आले असते तर आनंद झाला असता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे की नाही याची आपल्याला कल्पना नसल्याचेही ते म्हणाले. आम्हाला बोलावले नसले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करणार आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. कोरोना काळात राम मंदिराच्या मुद्यावरून मतभेद न होऊ देता राज्य सरकारने यावर समन्वय काढण्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

त्या ट्विटचा चुकीचा अर्थ
फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह मृत्यूच्या तपासावरून टीका केली. मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, अमृता यांनी केलेले व्टिट हे सुशांत सिंह राजपूत यांच्या विषयावर आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. मुंबई सुरक्षित आहे. कृपया याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. या प्रकरणात जनतेला उत्तर हवे आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -