घरताज्या घडामोडीमी बोलण्याच्या ओघात डॉक्टरांवर कोटी केली, त्याचं कौतुक व्हायला हवं - संजय...

मी बोलण्याच्या ओघात डॉक्टरांवर कोटी केली, त्याचं कौतुक व्हायला हवं – संजय राऊत

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे डॉक्टरांकडून नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मुळात मी काय बोललो हे समजून न घेता एक विशिष्ट प्रकारची राजकीय लोकं भूमिका घेत असतील, तर ते बरोबर नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा कुठेही अपमान झालेला नाही. अपमान आणि कोटी यातला फरक समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या कोट्या राजकारण्यांवर होतात, सरदारांवर होतात. मोदींवर होतात, मनमोहन सिंहांवर होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. त्याचं कौतुक व्हायला हवं. हा डॉक्टरांचा बहुमान आहे खरंतर. माझ्या मनात डॉक्टरांविषयी कायम आदर राहिला आहे. कंपाऊंडर हा प्रकार काही टाकाऊ नाही’, असं राऊत यावेळी म्हणाले.

‘मी नेहमी डॉक्टरांच्या बाजूने उभा’

‘डॉक्टर आमचेच आहेत. डॉक्टरांवर जेव्हा काही संकटं आली आहेत, तेव्हा मी स्वत: त्यांच्या मदतीला गेलो आहे. कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या लाखो बिलांच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. त्यांना समजावण्यासाठी मी अनेकदा गेलो आहे. मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो आहे. मार्डच्या डॉक्टरांनी माझ्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांचा अधिकार आहे. पण मार्डच्या डॉक्टरांच्या अनेक भूमिका मी मांडल्या आहेत. डॉक्टर सध्या अत्यंत कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचं कौतुक मी जाहीरपणे केलं आहे. सामनातूनही केलं आहे. तरी त्यांना का वाटतंय की माझ्याकडून त्यांचा अपमान झाला. आत्तापर्यंत मी कधीही डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. यावरचं राजकारण थांबवायला हवं’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘मग मोदींवर टीका का नाही?’

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका का केली जात नाही? असा सवाल केला आहे. ‘डॉक्टरांना आम्ही सदैव संरक्षण दिलेलं आहे. मोदींनी तर लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला की आमच्याकडचे डॉक्टर व्यापारी असून त्यांना रुग्णसेवेत रस नसून फक्त औषध संपवण्यात आणि पैसा कमावण्यात रस आहे असं विधान मोदींनी केलं. त्यावर तिथल्या डॉक्टरांनी निषेध केला, पण इथल्या डॉक्टरांनी नाही केला. माझ्यावर टीका, मग मोदींवर तुम्ही का नाही बोलत? तुम्ही गैरसमज दूर करून घ्या. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे’, असं ते म्हणाले.

‘मंदिरं उघडल्यावर संक्रमण वाढलं तर काय?’

सध्या होत असलेल्या मंदिरं उघडण्याच्या मागणीवर देखील संजय राऊतांनी यावेळी भूमिका मांडली. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लॉकडाऊन १०० टक्के उठवण्याची मी घाई करणार नाही. उद्धव ठाकरेंना WHO पेक्षा जास्त कळतं. राम मंदिराच्या भूमिपूजनात मुख्य महंतांना कोरोना झाला. त्यामुळे इतरांना किती त्रास होतोय. आम्हालाही वाटतं की श्रावणात मंदिरं उघडायला हवीत. पण दुर्दैवाने ते नाही झालं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भूमिका मांडल्या आहेत. मंदिरं उघडल्यानंतर त्यातून संक्रमण वाढलं, तर त्याचं खापर पुन्हा सरकारवर फोडलं जाईल. त्यामुळे योग्य वेळी महाराष्ट्र उद्धव ठाकरे उघडतील’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -