घरफिचर्समायमहानगर ब्लॉगव्हॅक्सिन टुरिझमचा नवा फंडा

व्हॅक्सिन टुरिझमचा नवा फंडा

Subscribe

कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देशांंनी विमानसेवा बंद केल्या होत्या. आता त्या सुरू होत आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला होता. समस्येतही संधी शोधण्याची वृत्ती असलेल्या पर्यटन कंपन्यांनी आता नवे फंडे आणून लोकांना पर्यटनासाठी उद्युक्त करायला सुरुवात केली आहे. त्याच एक भाग म्हणून मुंबईतील जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने नवा फंडा लोकांसमोर आणला आहे. या कंपनीने व्हॅक्सिन टुरिझम नावाची संकल्पना घेऊन हौशा नौशांना अमेरिकावारीची ऑफर दिली आहे. सध्या तरी अशा प्रकारे व्हॅक्सिन टुरिझम देणारी जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स ही देशातील एकमेव कंपनी आहे. यामुळे भारतातच नाही तर परदेशातही तिची चर्चा सुरू आहे.

कोरोना व्हायरस नुकताच वर्षाचा झाला आहे. या कोरोनाने वर्षभरात मोठमोठी उद्योग सम्राज्ये झोपवली असून त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसला. कारण कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामळे तसेच तो वेगाने पसरत असल्यामुळे अनेक देशांनी आपल्याकडून बाहेर जाणारी आणि बाहेरून आत येणारी विमानसेवा बंद केली. सुरुवातीला चीनमधील वुहानपुरता मर्यादित असलेला कोरोना पुढे आपला भयानक रंग दाखवायला लागेल, याची कुणाला कल्पना नव्हती, पण पुढे त्याने आपले भयकारी रुप दाखवायला सुरूवात केल्यावर विविध देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला. लोकांना आपले जीव वाचवण्यासाठी आपल्या घरात कोंडून घ्यावे लागले. दूरचा प्रवास करण्याचा तर प्रश्नच उरला नाही. फक्त विशिष्ट वेळ गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात येऊ लागली. सुुरुवातीला कोरोना हा भयंकर आजार आहे, याची कुणाला कल्पना नव्हती. पण नंतर त्यावर कुठली लस किंवा औषध सहजासहजी सापडेना, त्यावेळी मात्र हा काही तरी वेगळा प्रकार आहे, असे सगळ्याच देशांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपापले दरवाजे बंद केले. त्याचा फटका विविध प्रकारच्या उत्पादनांच्या आयात निर्यातील बसला, तसाच तो पर्यटन व्यवसायाला बसला.

सगळ्या देशांनी आपल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले दरवाजे बंद केल्यामुळे बाहेरच्या देशातील लोकांना आत येण्यास पूर्ण मज्जाव होता. त्यामुळे पर्यटनासाठी जाता येत नव्हते. अलीकडच्या काळात पर्यटन हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, एक मोठा उद्योग म्हणून तो विकसित झाला आहे. पर्यटनासाठी विविध नवनवे फंडे लढवून लोकांना विविध देशांची सफर घडवून आणली जाते. त्यात पुन्हा एखादी कंपनी आपल्याला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा आपल्याला आपल्या देशात आणून सोडणार आहे, त्यामुळे तो प्रवास सुरक्षित असतो. म्हणूनच या पॅकेजला पर्यटनासाठी इच्छुक असलेल्यांकडून मोठी पसंती देण्यात येते. पण समस्येतही संधी शोधण्याची वृत्ती असलेल्या पर्यटन कंपन्यांनी आता नवे फंडे आणून लोकांना पर्यटनासाठी उद्युक्त करायला सुरुवात केली आहे. त्याच एक भाग म्हणून मुंबईतील जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने नवा फंडा लोकांसमोर आणला आहे. या कंपनीने व्हॅक्सिन टुरिझम नावाची संकल्पना घेऊन हौशा नौशांना अमेरिकावारीची ऑफर दिली आहे. सध्या तरी अशा प्रकारे व्हॅक्सिन टुरिझम देणारी जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स ही देशातील एकमेव कंपनी आहे. यामुळे भारतातच नाही तर परदेशातही तिची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

कंपनीच्या या ऑफरमध्ये अमेरिकेत चार दिवस राहता येणार असून कोरोनाची लसही घेता येणार आहे. यामुळे अमेरिकावारीचे स्वप्न तर पूर्ण होईलच, शिवाय कोरोनाची लस घेतल्याचे समाधानही लाभणार आहे. कंपनीच्या या ऑफरमुळे अनेकजण सुखावले आहेत. पण यामागची खरी गंमत म्हणजे ज्या लशीच्या ना टोकाचा आणि ना बुडाचा कसलाही अजून ठिकाणा नाही, अशा कोरोना लशीसाठी ही ऑफर कंपनीने देऊ केली आहे. यात अमेरिकेत चार दिवस राहण्यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपयांच्या पॅकेजची कंपनीने ऑफर दिली आहे. यात मुंबई-न्यूयॉर्क विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीबरोबरच सकाळचा नाश्ता आणि लशीचा डोस यांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे. पण हे सर्व करताना लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे, नाही तर बाजार तुरी, अशी अवस्था होऊन बसेल.

विशेष म्हणजे कंपनीने सध्या आमच्याकडे व्हॅक्सिन नाही. आम्ही ते विकतही घेणार नाही. सर्वकाही अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व परवानगीनुसार होणार आहे, असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच सध्या आम्ही फक्त नाव नोंदणी करून घेत असून त्यात संबंधित व्यक्तीची माहिती घेत आहोत. कुठलीही आगाऊ रक्कम घेत नाही. त्याचबरोबर अमेरिकन नागरिकांव्यतिरिक्त इतर नागरिकांना लस देण्यासंदर्भात जोपर्यंत अमेरिका परवानगी देत नाही तोपर्यंत व्हॅक्सिन देऊ शकणार नाही, असेही म्हटले आहे, पण तरीही अनेकजण या व्हॅक्सिन टुरिझमवर खूश झाले आहेत. बघायला गेलं तर कोरोनाच्या या नकारात्मक काळात घराबाहेर पडणं हेच धोक्याचं समजलं जातयं. कारण अजूनतरी कोरोनाची लस आलेली नाही. अशा वातावरणात तब्बल 8 महिने कोरोनोच्या छायेत जगणार्‍या व्यक्तीसाठी व्हॅक्सिन टुरिझम ही संकल्पनाच आनंद देणारी आहे. कारण अमेरिका फिरण्याबरोबरच लसही घेता येणार आहे, हेही नसे थोडके.

- Advertisement -

कोरोनाकाळात आलेल्या संकटांचं रुपांतर तुम्ही संधीत करू शकता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांचं ते म्हणणं इतर कोणी नाही, पण पर्यटन क्षेत्रातील जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने मात्र मनावर घेत नव्या व्हॅक्सिन टुरिझम क्षेत्रात प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्ष पदार्पण मात्र नक्की केलं आहे. याआधी आपण ट्रॅव्हल टुरिझम, स्टडी टूर याबद्दलच ऐकूण होतो. पण व्हॅक्सिन टूरिझममुळे पर्यटनक्षेत्रात नवा पायंडा पडणार हे नक्की आहे.

पण हा काही टुरिझम क्षेत्रातला पहिला आगळा वेगळा प्रयोग नाही. तर याआधीदेखील डिझास्टर टुरिझम नावाचे फॅड आले होते. जे अल्पावधीतच हिटही झाले. याअंतर्गत ट्रॅव्हल कंपन्या अशा ठिकाणी टूरचे आयोजन करायच्या ज्या ठिकाणी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित मोठे संकट येऊन गेले आहे. यात परदेशी ट्रॅव्हल कंपन्या आघाडीवर होत्या. अशा टूरच्या आयोजनामागे कंपन्याचे दोन उद्देश होते. एक होते डबघाईस गेलेल्या पर्यटन उद्योगाला व देशाच्या कोसळलेल्या आर्थिक व्यवस्थेला चालना देणे. तसेच या टूर्सच्या निमित्ताने अनेकजण अभ्यासासाठीही दुसर्‍या देशात जाऊ लागले होते.

काही वर्षापूर्वी नेपाळमध्ये काठमांडूत प्रलयंकारी भूकंप आला होता. त्याचा आर्थिक फटका नेपाळला असा काही बसला की त्यानंतर तब्बल दोन ते तीन वर्षे त्याला लहान सहान गोष्टींसाठी शेजारील राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागले होते. पण नंतर तेथील कंपन्यांनी इतर ट्रॅव्हल कंपन्याबरोबर हातमिळवणी करत डिझास्टर टुरिझम सुरू केले. मग काय नेपाळचे सौंदर्य बघण्यापेक्षा त्याचा झालेला र्‍हास बघण्यासाठी, तेथील लोकांना आलेले मरणाचे अनुभव ऐकण्यासाठी व कॅमेर्‍यात टिपण्यासाठी पर्यंटकांनी नेपाळमध्ये गर्दी केली. परिणामी भूकंपानंतर मंदावलेली नेपाळची आर्थिक स्थिती हळूहळू वेग घेऊ लागली. परकीय चलनामुळे नेपाळ लवकरच सावरले. असंच काहीसं अमेरिकेत कतरिना वादळानंतर झालं. या वादळात अमेरिकेचे 108 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. अमेरिकेच्या इतिहासातील कतरिना हे सर्वात मोठे विनाशकारी वादळ होते. त्यानंतरही याच डिझास्टर टूरिझमने जोर धरला. वादळात पुराच्या पाण्यात वाहून गेलेली, चिखलात रुतलेली घरे, इमारती, गाड्या बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. त्यातून स्थानिकांनी पैसे कमावले. जगात आजही कुठे त्सुनामीची लाट येते तेव्हा परिस्थिती निवळल्यानंतर असेच टुरिझम सुरू होतात.

आता सध्या तरी जगभरात कोरोना महामारीचं संकट आहे. पर्यटन क्षेत्राला त्याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जेम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने लढवलेली शक्कल नक्कीच कौतुकास्पद आहे. या टूरसाठी माणशी लाखाहून अधिक रुपये मोजावे लागणार असल्याने सामान्यांना या टूरशी तसे काही देणे घेणे नाही. सिरमच्या लशीची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. पण अमेरिकेच्या परवानगीनंतर अनेक श्रीमंत लोक या पॅकेजचा लाभ घेतीलच. यामुळे तूर्तास आपण मात्र व्हॅक्सिन टुरिझमचे नाही तर सिरमचे दरवाजे केव्हा उघडतात ते बघूया. तसेच जर यदाकदाचित अमेरिकेच्या आधीच भारतात लस निर्मिती झाली तर भारतातही व्हॅक्सिम टुरिझमसाठी परदेशी पाहुणे येऊ शकतात. ज्यामुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेलाही हातभार लागेल आणि कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी कोरोना लसीमुळेच नीट बसेल असे म्हणण्यास हरकत नाही.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -