रातांबीन

Subscribe

पानंदीतून जाता येता त्या सोलांचा विशिष्ट वास नाकात भरून रहायचा. जाता येता कोणी ना कोणी त्या खळ्यात सुकत टाकलेली ती सोलं उचलून पटकन तोंडात टाकायचे. आणि आंबट म्हणून तोंड मिटून घ्यायचे. तेव्हा कोणतरी म्हणायचे त्या रातांबिनीचे रातांबेच तसले, निसते आंबट पण सोला काय चोकट होतत. एक दोन सारात टाकली की, सार कसा झोकात होता. सोलाच्या टिकाऊपणाबद्दल सांगताना ह्या जन्मदात्रीचा मोठा हात असतो. ह्या रातांबिनीची कीर्ती गावभर झालेली आहे. ओहोळाच्या कडेला फारतर वीस-पंचवीस फूट उंच असणारे हे झाड पण येता जाता नजर वळवून घेणारे.

दुपारी जेवल्यावर खळ्यात बसून पत्ते नाहीतर आबादुबी खेळत असलो की, नंदाकाकी वळईतून बाहेर यायची आणि खळ्यात येऊन आम्हा खेळणार्‍या मुलांना ओरडत ये पोरांनू, वायच गजरनी कमी करा, आमका झोपा दे. उटलाव की खालच्या रातांबीवरचो रातांबे काडुक जावचा हा. असं म्हणत पुन्हा वळईत निघून जायची. तोपर्यंत खळ्यात पत्त्यांचा डाव चांगला रंगलेला असायचा. तेवढ्यात तात्या उठायचे आणि डोक्याला टॉवेल गुंडाळून पाटल्यादारात्सून मोठ्या फाटी किंवा डालगी घेऊन खळ्यात यायचे आणि नंदा, लवकर चाय घेवा नी चला असं म्हणत सगळ्यांच्या आधी खालच्या पाणंदीतून चालता चालता गणपतीच्या कोंडीजवळ पोचायचे.

ह्या गणपतीच्या कोंडीजवळच ही रातांबी होती, लोक हिचा उल्लेख सहसा रातांबीन करायचे. शब्दाच्या शेवटी किंवा नामाच्या शेवटी ईन प्रत्यय लावला की, ते नाम स्त्रीलिंगी समजावे. झाडापेडाच्या बाबतीत असे ईन प्रत्यय लावणे हे थोडे चमत्कारिकच आहे. पण आगरातल्या बागेत असणार्‍या त्या झाडाचा उल्लेख रातांबीन न करता रातांबो असाच करायचे, तेव्हा ज्या झाडाला फळ लागून सृजनशीलता प्राप्त आली आहे त्याला निसर्गाने स्त्रीत्व बहाल केलं आणि म्हणून ह्या झाडाच्या बाबतीत ईन प्रत्यय लावला जातो असा एक समज माझ्या मनात तयार झाला.

- Advertisement -

सजीवसृष्टीच्या बाबतीत किती वेगळेपण आपण बघत असतो नाही ! , झाडाचे झाडपण देखील स्त्री आणि पुरुष या कल्पनेत आम्ही सहज बांधून ठेवतो. सृजनाचा अधिकार स्त्रीत्वात किती सहज बसवून आपण मोकळे होतो. ही रातांबीन चैत्रचाहूल लागताच लाल फळांनी डवरायला सुरुवात होते, ती वैशाख वणवा डोक्यावर घेत थांबते. ह्या लाल फळांना मधोमध फोडले की, आत पांढर्‍या रंगाची मऊ लुसलुशीत पाकळीसारखा गर तयार झालेला असतो, हा गर नुसता खाल्ला तरी तोंडाला मिट्ट आंबटपण काय असतो हे कळते.

ही रातांबीन तशी दरवर्षी अख्ख्या वाडीला पुरेल एवढी सोलं देते. इथे किलोचा हिशोब नाही, एकतर पायलीभर सोलं किंवा दुपायली सोलं असा सर्वत्र हिशोब असतो. अशी पायली दोन पायली सोलं ह्या रातांबीमुळे प्रत्येकाच्या घरात तयार झालेली असतात. पण पंधरा वर्षापूर्वी ही कटीखांद्यावर लालबुंद रातांब्याची फळ अंगावर घेऊन वावरणारी रातांबीन एकदम एका संध्याकाळी बदनाम झाली . त्याला कारण देखील तसंच झालं . सोनूआबा तसा झाडावर चढण्यात पारंगत, कुठलेही वळणदार झाडावर असो, माडावर चढायचे असो सोनूआबा सहज चढायचा, ही एवढी रातांबीन ती काय, त्यावर सोनू आबा सहज चढायचा.

- Advertisement -

त्यादिवशी दुपारी नेहमीप्रमाणे सगळीजण रातांबिनीच्या झाडाखाली जमली. सोनाआबा झाडावर चढला आणि समोरच्या फांदीवरचे रातांबे काढण्यासाठी काठी हातात घेवून फळांना ढोमसू लागला आणि ज्या फांदीवर सोनूआबा उभा होता, ती फांदी कडाडली, सोनुआबा दुसर्‍या फांदीचा आधार घेणार इतक्यात ती फांदी मोडली आणि फांदीसकट सोनुआबा खाली आला आणि घळणीत पडला. घळणीत दगडधोंडे, काटेकुटे भरपूर होतेक. तिथल्याच एका दगडाच्या खाली सोनूचा उजवा हात आला आणि महिनाभर सोनू हात प्लास्टरमध्ये घालून होता आणि …..त्या रातांबिनीचा भागवा काय ता …..नायतर माझ्यासारखो झाडार चढनारो गडी असो खाली पडात ? , पण त्यादिवसापासून ती रातांबीन जी बदमान झाली ती आजतागायत.

ह्या रातांबिनीला मात्र तिचे काही नाही, वर्षानुवर्षे ही रातांबीन अख्ख्या वाडीला वर्षभर पुरतील इतकी कोकमे ( सोले ) देवून त्यांची रूची वाढवण्याची किमया करते आहे. दुपारच्या त्या रणरणत्या उन्हात आमची वानरसेना त्या रातांबिनीच्या खाली जात असे. कोणाच्या हातात रोवळी, कुणाच्या हातात पायली किंवा दुपायली किंवा कोणाच्या हातात आसोली टोपली असायची. सर्वात मागे आमचे बाबा हातात खराटा घेऊन यायचे. तात्या रातांबिनीवर चढताना मनातल्या मनात नागेश्वरा, पावणाई हाता पाया सुखी ठेव गे पावली म्हणत एकेका फांदीवर जपून पाय ठेवत वर चढायचे. सुकलेली फांदी जरा कडकडली की, खालून आई, नंदाकाकी किंवा मुंबईची आजी तात्यानू सांभाळून हा …मरांदे ते रातांबे, तुमी जमत नसात तर खाली येवा, रातांबे आणू आमी ईकत , तरी तात्या वर चढत जातात. पायाने एकेक फांदी हलवत रहातात आणि खाली घळणीत रातांब्याचा ढीग जमा व्हायचा.

रातांब्याचा ढीग बघितला तर त्यात लालबुंद रसरशीत रातांबे असायचे, कुठले रातांबे नुकतीच लाली चढलेले असायचे, त्यात थोडा पोपटी रंग परिधान केलेले नुकतेच पिकायला लागलेले अधिक असायचे. काहीतर फिक्क हिरवे असायचे, तरीही या मायभगिनी ते सगळे कच्चे पिके रातांबे गोळा करायचे. कच्चे रातांबे मुठीयाल करायला उपयोगी म्हणून ठेवून द्यायचे. तात्या झाडावरचे सगळे रातांबे झोडून खाली उतरायचे आणि पोरांनू, सगळी फळा उकला हा, याक पण फळ खाली ठेव नुको, ते कच्चे रातांबे उकला, त्याचा मुठीयाल बनवूक गावात. ह्या वाक्याबरोबर कोकणात दुष्काळ पडला तेव्हा गुरंढोर मेली, कोकणात दूध दही मिळत नव्हतं, तेव्हा लोकांनी मिलो नावाच्या ज्वारीच्या भाकरीला मुठीयाल रगडून भाकरी खाल्ल्याची गजाल अर्थात ती गजाल नव्हती पण त्या काळातल्या कोकणातल्या दारिद्य्राची कहाणी सांगत.

आज कोकणातदेखील रातांब्यापासून सोले बनवण्याची ही मोठी प्रक्रिया करण्यापेक्षा बाजारातून विकत कोकमे (सोले) आणण्याकडे लोकांचा कल आहे. घराच्या समोरची किंवा पाटल्यादारी असणारी रातांबीन नवीन घराच्या बांधकामात कधीच मुळापासून उखडली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकदा ह्या रातांब्याना खळ्यात आणलं की , की खाली जमिनीवर ओतलं गेलं की, ह्या वरसा सोला चोकट होतली असा सूर घरातल्या प्रत्येक बिर्‍हाडातून यायचा. ज्यादिवशी रातांबे घरात येतील त्यादिवशी काकी आणि आई यांच्या हातून स्वयंपाकघर एकतर सुनांच्या ताब्यात नाहीतर मुंबईहून आलेल्या धाकट्या जावेकडे जायचं, ह्या दोघींचा मुक्काम खोपीत.

काकीच्या समोर कोळमी ( लाकडाचे पसरट भांडे ) ठेवलेली असायची. काकी आणि आई रातांबे फोडायला बसायच्या, दोन्ही हातांनी रातांब्याचे दोन भाग करून आतला पांढरा गर जो साधारण कोळंबी दिसते तसा दिसायचा तो कोळमीत ठेऊन दोन्ही भकलं टोपलीत टाकली जायची. दोन -तीन हातास सगळे रातांबे फोडले की, मग दोघींचे आत आंबून यायचे. त्या रातांब्यात असणार्‍या आम्लाने दोघींचे हात आकसून जायचे. आता रातांब्याच्या फळाला सोलात रुपांतरीत व्हायची पहिली पायरी पार केलेली असायची.

दुसर्‍यादिवशी मागच्या खळ्यावर हे रातांब्याचे तुकडे सुकायला ठेवल्यावर पाणंदीतून जाणारे येणारे ह्या बगा ईनामदारांची सोला तयार झाली सुदा. आमका कदी जमता काय म्हायत. असं म्हणत पुढे जायची, आता फक्त रातांबे सुकत घातले होते तरी लोकांना कामगत सुरू झाली असा भास व्हायचा. एकदा ह्या सोलांना दोन तीन उन्हं लागली की, मग त्यांना आगळाचा पहिला हात लागायचा की, मग हळूहळू सोलं आपला अस्सल रंग परिधान करायची. मग सोलं जांभळी व्हायची, अगदी जांभळाचा सडा पडलाय असा भास व्हावा. त्यात किरमिजी रंगांच्या छटा दिसायच्या. हळूहळू लालबुंद रंग लोप पावायचा आणि मग जांभळा, आमसुली रंग धारण करणारी सोले आपला चमत्कार दाखवायची.

त्या पानंदीतून जाता येता त्या सोलांचा विशिष्ट वास नाकात भरून रहायचा. जाता येता कोणी ना कोणी त्या खळ्यात सुकत टाकलेली ती सोलं उचलून पटकन तोंडात टाकायचे. आणि आंबट म्हणून तोंड मिटून घ्यायचे. तेव्हा कोणतरी म्हणायचे त्या रातांबिनीचे रातांबेच तसले, निसते आंबट पण सोला काय चोकट होतत. एक दोन सारात टाकली की, सार कसा झोकात होता. सोलाच्या टिकाऊपणाबद्दल सांगताना ह्या जन्मदात्रीचा मोठा हात असतो. ह्या रातांबिनीची कीर्ती गावभर झालेली आहे. ओहोळाच्या कडेला फारतर वीस-पंचवीस फूट उंच असणारे हे झाड पण येता जाता नजर वळवून घेणारे.

गणपतीच्या कोंडीवर गणपती विसर्जनाला जाताना ते झाडं फक्त पानांनी बहरलेलं असायचे. नंतरच्या काळात ती पानझड होऊन खाली घळणीत पतेरा व्हायचा. जानेवारी -फेब्रुवारी -मार्च महिन्यात हळूहळू त्या पानांमध्ये लालबुंद फळे दिसायला लागायची. हळूहळू झाडं फळांनी समृध्द व्हायचे, हा नैसर्गिक बदल कालातीत आहे. कोकणी माणसाच्या जेवणात आमसुल हवचं, त्या आमसुलाची चव त्याच्या जिभेवर रेंगाळते. वरणात देखील रूची यावी म्हणून दोन सोलं टाकली, तरी वरणाची चव वाढते. त्याच्या आंबटपणात दोन बोटे वाढ होते. आईने मुंबईत असताना नुसती डाळ केली तरी सोलं असतात. तो सोलं बघितली की, त्या सोलांची जन्मदात्री आठवते. मग हळूहळू त्यामागच्या आठवणी येत राहतातर. त्या रातांबीनीवर चढताना वारंवार देवाला आठवणारे तात्या, ते रातांबे पावसाच्या आधी तयार व्हावे म्हणून जीवाचे रान करणारी नंदाकाकी आणि आई. त्या सगळ्याच्या वाटेने जाणारी ती निरंतन खाद्यसंस्कृती …अगदी सगळं आठवत राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -