निष्पाप, निरागस…

मनोहर व्यवहारे हे आमच्या परिसरातले एक निष्पाप आणि निरागस नागरिक आहेत. जग अजूनही चार चांगल्या लोकांमुळे चालतं अशी एक आध्यात्मिक माहिती पसरलेली असते ती त्यांच्या लेखी नाहीच, पण झुंडशाही, गुंडगिरीमुळे जगाचा पुढे विनाश होईल असा एक तात्विक समज आहे, त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाही. अजूनपर्यंत तरी जगाच्या पाठीवर एखाद्याला त्याच्या पापी कृत्यांबद्दल दंडविधान संहितेत अटक करण्याची तरतूद आहे, पण समजा, निष्पाप, निरागस राहणं हा जर उद्याच्या जगात गुन्हा म्हणून संमत झाला तर सर्वप्रथम मनोहर व्यवहारेंना अटकपूर्व जामीन मिळू शकणार नाही! सांगायचा मुद्दा हा की मनोहर व्यवहारे हे इतके सराईत निष्पाप आहेत आणि निष्णात निरागस आहेत.

पापकर्म, कुकर्म, अधर्म ह्या शब्दांची ओळख त्यांना त्यांच्या शब्दकोशातून झालीच नाही असं नाही, पण आता रिटायरमेंटला आले तरी एखाद्या कुशल राजकारण्याने आपली व्होटबँक जशी वर्षानुवर्षे शाबूत ठेवावी तशी त्यांनी आपली निष्पाप आणि निरागस वृत्ती शाबूत ठेवली आहे. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ते तसे वेळ काढून जातात. पण आपली सोसायटी आता जराजर्जर झाली म्हणून ती आता पुनर्विकासासाठी एखाद्या ढेरपोट्या बिल्डरकडे द्यावी ह्या प्रगतीवादी प्रस्तावाच्या बाजूनेही ते कधी आपली मान हलवत नाहीत की इतक्यात पुनर्विकास कशाला असं म्हणणार्‍या सोसायटीतल्या पुराणमतवाद्यांच्या बाजूनेही ते कधी जात नाहीत. हेसुध्दा नको आणि तेसुध्दा नको असं म्हणत त्यांनी कधी मध्यममार्ग काढण्याचाही उपाय स्वीकारलेला नाही. मध्यममार्गसुध्दा आपल्या निष्पाप, निरागस वृत्तीला गालबोट लावू शकतो असं त्यांना कदाचित वाटत असावं असा आमच्या परिसरातल्या अनेकांचा त्यांच्याबद्दलचा ग्रह आहे.

…तर अशा ह्या मनोहर व्यवहारेंच्या घराच्या कडीला नेहमीच्या सुंदर सकाळी एक वर्तमानपत्र लटकतं. ते वर्तमानपत्र वाडवडिलांनी घालून दिलेल्या प्रथेप्रमाणे मनोहर व्यवहारे लटकू देत असावेत असा त्यांना ओळखणार्‍या त्यांच्या शेजार्‍यांचा कयास आहे. त्यांचे जवळचे शेजारी त्यांना ओळखतात, पण तेही मनोहर व्यवहारेंना आपण जवळून ओळखतो असं ठामपणे सांगू शकत नाहीत. असो, तर विषय मनोहर व्यवहारेंच्या दाराच्या कडीला लटकणार्‍या वर्तमानपत्राचा आहे. वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असतं असं राजरोस म्हटलं जातं. पण हल्ली राजरोस त्याचा पारा उडतो आहे असंही सर्रास दिसतं. अशा ह्या आरशाचं मोतिबिंदूचं ऑपरेशन करणं आवश्यक आहे असं काही मोजके विद्रोही लोक म्हणतात. पण ह्या मोजक्या चेहर्‍याचं प्रतिबिंबही हल्ली ह्या आरशात अंधुक आणि अस्पष्ट दिसू लागलंं आहे. मनोहर व्यवहारेंच्या घरी नेहमी वर्तमानपत्र येतं म्हणजे त्यांना ह्या मोजक्या चेहर्‍यांबद्दल काही माहिती असेल असं किमान गृहित धरायला काही हरकत नाही. किमान विद्रोह कशाशी खातात हेही त्यांना माहीत असेल ह्याचाही काही अंदाज बांधायला हरकत नाही. पण एखाद्या पुतळ्याच्या स्थितप्रज्ञतेलाही लाजवेल असा जन्मजात चेहरा त्यांना लाभल्यामुळे भल्याभल्या मनकवड्यांचे आणि मानसोपचारतज्ञांचे त्यांच्याबद्दलचे अंदाज चुकलेले आहेत.

आमच्या परिसरातला स्वत:ला उच्च समजणारा वर्ग मनोहर व्यवहारेंच्या नावामागे स्थितप्रज्ञ असं संभावित विशेषण जोडत असला तरी त्या उच्च समाजालाही शिष्ट संबोधणारा उच्च वर्ग मनोहर व्यवहारेंना मख्खं चेहर्‍याचा मनोहर म्हणतो. मनोहर व्यवहारेंना बहुतेक आपल्या ह्या नवनवीन नावांच्या बारशाची किंचित कल्पना असावी, म्हणूनच बहुधा मनोहर व्यवहारे परिसरातल्या कुणाची नजरानजर झाल्यास आपल्या चेहर्‍यावरच्या मख्खपणावर मख्खपणाचा अतिरिक्त लेप लेपून घेत असावेत. विजेचं बिल चौपट-पाच पट वाढीव आलं तरी मनोहर व्यवहारे त्याच मख्खपणे वीज केंद्रात जातात, त्याच मख्खपणे बिल भरण्याच्या रांगेत उभे राहतात आणि तेवढ्याच मख्खपणे कितीही वाढीव बिल भरून घरी येतात…आणि मख्खपणा अधोरेखित करतात.

उद्या समजा सरकारने अच्छे दिनच्याही पार पार पलिकडचं, सर्वांच्या सर्वांगावर चारही बाजुंनी उधळण करणारं अगदी गारेगार सुखाचं पॅकेज जाहीर केलं आणि ते कठोरपणे अंमलात आणलं तर एकवेळ दारिद्य्ररेषा हलेल, पण मनोहर व्यवहारेंच्या चेहर्‍यावरची रेषा तिथल्या तिथेच राहील. कधी कधी शेअर बाजार नको त्या कारणामुळे कोसळतो आणि वाटेल त्या कारणामुळे वधारतो. पण मनोहर व्यवहारेंवर त्याचा काही परिणाम होत नाही. ते स्वत: त्यामुळे हुरळत नाहीत की गळूनही जात नाहीत. शेअर बाजारातल्या लोकांशी त्यांचा कधी दुरूनही संबंध येत नाही आणि स्वत:चे पैसे दुप्पट करण्यासाठी ते कधी शेअर बाजारातल्या कुणाशी आपला संबंध येऊही देत नाहीत. त्यांच्या घरातल्या नळाचं पाणी कधी कधी दिवसभर गेलं, येताना ते कितीही गढूळ आलं आणि ते येताना मनोहर व्यवहारेंच्या घरातल्या टीव्हीवर देशातल्या कितीही मोठ्या विकासपुरूषाने पायाभूत सुविधांची कितीही मोठी घोषणा दिली तरी मनोहर व्यवहारे रागाने टीव्हीचं बटन बंद करत नाहीत.

ते नळातून गढूळ पाणी यायचं कधी बंद होतं ह्याची गपगुमान वाट पहात राहतात आणि गढूळ पाणी यायचं बंद झालं की मगच टीव्ही बंद करतात. राजकारणातल्या सगळ्या प्रकारच्या कलाकारांच्या अदा ते डोळे भरून पहात नसले तरी एकटक पहातात. ते रात्रीच्या कर्फ्युचा कानोसा घेतात, पण तो प्रेक्षणीय कर्फ्यु बघायला सोसायटीच्या खाली उतरत नाहीत. ट्रम्पचे समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसले तरी ते स्वत:च्या घरी त्यांच्याइतक्याच बिच्चार्‍या बायकोकडेही त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. ट्रम्पचे समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसले, ही बातमी वाचता वाचता वाचताच ते आपली उसवलेली पॅन्ट सुईत दोरा ओवून स्वत:च्या हाताने निमुट शिवतात. अमेरिकेतल्या त्या घटनेमुळे अराजक वगैरे येईल ह्याबद्दलही ते निर्विकार राहतात. फक्त डायबिटीसच्या गोळ्या घ्यायला जाताना रस्त्यावरचा दुभाजक काळजीपूर्वक ओलांडतात.

ते त्यांच्या आध्यात्मिक गुरूंना भेटायला रेल्वेने जाताना कधीच विनातिकिट जात नाहीत, पण घाईघाईत कधी तिकिट काढायचे विसरले तरी तिकिट तपासनीस त्यांना कधीच अडवत नाही. कारण मनोहर व्यवहारेंच्या मख्खं चेहर्‍यावर चापलुसीचा तरंग चुकूनही उमटत नाही. समाजातल्या सर्व स्तरावरच्या लोकांना मनोहर व्यवहारे सदासर्वकाळ बापुडवाणेच वाटत आले आणि ही त्यांची बापुडवाणी हेच त्यांच्या बापुडवाण्या जगण्याचं भांडवल ठरलं. त्यांच्या ह्याच भांडवलामुळे त्यांना कधीही कोणत्या निनावी धमक्यांचे फोन आले नाहीत. त्यांच्या काटेकोर हिशेबी स्वभावामुळे ते कधी बेहिशेबी मालमत्ता जमा करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना कधीच इन्कम टॅक्सची नोटीस आली नाही. शेपूची भाजी घेतानाही ते अचूक पैसे सुटे घेऊन जातात, त्यामुळे मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात त्यांचं नाव कुणी गोवण्याचा प्रश्न कधीच उद्भवला नाही.

फक्त परवा थोडं त्यांच्याबाबतीत विचित्र घडलं. ते डॉक्टरांकडे रूटिन चेकपसाठी गेले. डॉक्टरांनी त्यांचं ब्लडप्रेशर मोजलं. नेहमी नियंत्रणात असलेलं त्यांचं ब्लडप्रेशर बरंच वर गेल्याचं पाहून त्यांच्यापेक्षा आधी त्यांच्या डॉक्टरांना धक्का बसला.
डॉक्टरांनी म्हटलं, व्यवहारे, काय गडबड केलीत, ब्लडप्रेशर वाढलंय!

व्यवहारेंनी काही म्हणण्यापूर्वीच व्यवहारेंची बायको म्हणाली, तसं काही नाही, ते हल्ली लसीकरणाच्या बातम्या जास्त वाचतात.