घरफिचर्ससारांशलिडर्स ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी

लिडर्स ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी

Subscribe

लोकांनी राजकीय पक्षाची बांधिलकी स्वीकारण्यापेक्षा पक्षांनी समाजाची बांधिलकी स्वीकारायला हवी. सत्तेचा उपयोग समाज, देश संचलनासाठी व्हायला हवा, शोषणासाठी नाही. शिक्षण आणि आरोग्य सर्वांसाठी खुले आणि मोफत असावे. बहुतेक परंपरागत धर्म आजच्या परिस्थितीसाठी कालबाह्य झालेले आहेत का? मग अशावेळी नवा काही पर्याय आहे का? की माणसानं धर्म झुगारून द्यायला हवा? कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाच्या मर्यादा जशा लक्षात आल्यात, तसंच देवांचे चेहरेसुद्धा उघडे पडलेत. खोटं श्रेय घेण्याची धडपडदेखील गाव असो की, दिल्ली, सारखीच असल्याचं सिद्ध झालं. या सार्‍या विकृतींपासून दूर असलेल्या नव्या नेतृत्वाची देशाला गरज निर्माण झालेली आहे.

एकविसावं शतक हे प्रचंड उलथापालथ घडवून आणणारं असेल यात शंका नाही. देशापुढे अनेक आव्हानं उभी आहेत. समाज गोंधळून गेला आहे. विविध प्रश्न आ वासून दारात उभे आहेत.

काही नेते उन्मादात आहेत. काही हतबल आहेत. काही कमालीचे निराश आहेत. स्वार्थाच्या बाहेर येण्याची अजूनही त्यांची तयारी दिसत नाही.

- Advertisement -

समाज बधीर झालाय. मेंदू सडून गेलेत. नागडेपणाला प्रतिष्ठा प्राप्त झालीय. आपल्या धर्माचे, जातीचे, पक्षाचे बलात्कारी लोकही समाजाला पूजनीय वाटायला लागलेत! द्वेष शिगेला पोचलाय. संस्कृती आणि निर्लज्जपणा ह्यात फरक राहिला नाही.
शिक्षणाचं वाटोळं झालंय. आरोग्यसेवा हा राजरोस लुटीचा परवाना झाला. उद्योग बर्बाद झालेत. समाज तुकडे तुकडे झालाय. शेतीवर नांगर फिरवण्याची तयारी सुरू आहे. माणूस म्हणून जगण्याचा माणसाचा अधिकारच नाकारला जातोय. संसद म्हणजे चंबळचं खोरं झालीय.

कविता मुक्या झाल्यात. प्रतिभा गहाण पडली. पत्रकारिता रखेल झाली. सारा समाजच विकला गेला. लाचार झाला. अशा भयानकाच्या दारात सारा देश उभा आहे !

- Advertisement -

वार झाले तरी झेलले पाहिजे
दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे
हे जगाला नव्हे, मी तुला सांगतो
एकदा तू खरे बोलले पाहिजे !

अशावेळी बोलणार्‍या जिभा छाटून टाकण्याची पद्धत राजमान्य झाली. तरीही बोलणार्‍या नवनव्या जिभा तेवढ्याच आक्रमकपणे पुढं येत आहेत, हेही उल्लेखनीय आहे.

अन्याय, अत्याचार जसजसे वाढत जातात, तसतसा समाजमनाच्या आतल्या आत एक लाव्हा प्रवाहित होत जातो. कदाचित त्याची धग आपल्याला जाणवत नाही. तरीही असंतोषाची वाफ साचत जाते. तिचे हादरे आपल्याला जाणवत नाहीत. पण आतल्याआत विद्रोहाचा संवाद सुरू असतो. क्रांतीची भाषा काळानुरूप नवे नवे रूप, नवे नवे शब्द घेवून जन्माला येत असते. नदीला थोपवून धरण्याची ताकद कोणत्याही पहाडात नसते. विचारांची नदी तर दूरची गोष्ट आहे !

काळाच्या ओघात गडप झालेल्या सरस्वती नदीबाबत आपण बरेचदा ऐकतो. ती अजुनही वाहते आहे, असेही बोलले जाते. कुणी त्याकडे नैसर्गिक घटना म्हणून पाहतात. कुणी त्याला धार्मिक श्रद्धेचा मुलामा चढवतात. त्यावर मते मतांतरे असू शकतात. पण संतांच्या शिकवणीचा अखंड प्रवाह मात्र जनमानसात प्रचंड प्रभावीपणे जिवंत असतो. वरवर आपल्याला दिसत नाही. पण आपले कायदे, शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था यापेक्षा त्याचा प्रभाव समाजावर नेहमीच जास्त असतो.

मग आज देशात जी अराजक सदृश्य परिस्थिती देशात दिसत आहे, ती का आली असेल ? समाज असा बधीर का झाला असेल? देशाला कुणीही वाली उरला नाही, असं समजायचं का? की शिशुपालाचे शंभर अपराध अजून पूर्ण व्हायचे आहेत?
पण समजा, शंभर अपराध पूर्ण झालेत आणि शिशुपालाचा खात्मा श्रीकृष्णाने केलाही, तरी, प्रश्न असा उरतो, की प्रत्येकवेळी कृष्णाचं येणं गरजेचं आहे का? गोकुळाची म्हणून काही जबाबदारी नाही का? गोपाळांनी अशी कृष्णाची वाट का म्हणून बघत बसायचं ?

आज आपल्याला या सार्‍या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. समाज म्हणून आपल्याला आपली जबाबदारी स्वीकारावीच लागेल. सरकार असो किंवा कोणताही घटक असो, कितीही चलाखी करत असला, तरी त्याची लबाडी उघड व्हायला वेळ लागत नाही. माहिती व तंत्रज्ञान यांचा प्रचंड प्रभाव असलेला हा काळ आहे. उद्या आणखी याची गती आणि मारा कितीतरी वेगानं वाढणार आहे. अशावेळी समाज, देश, एक व्यक्ती म्हणून परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो, हे महत्वाचं आहे.

तंत्रज्ञानामुळे आपल्याला प्रचंड वेगानं जगाची माहिती घरबसल्या मिळत राहते. सारखा धबधबा सुरू असतो. पण माहिती मिळाली म्हणून माणूस शहाणा होतोच असं नाही. अशावेळी विवेक, संवेदना, माणुसकी ह्या गोष्टी मात्र ज्याच्या त्यानं जपायचा असतात.

आव्हानं मोठी आहेत. ती पेलण्यासाठी उद्याच्या नेतृत्वाचे खांदे देखील तेवढेच समर्थ असावे लागतील. पण असं नव्या दमाचं नेतृत्व नैसर्गिकरित्या पुढं येईल का? की आपल्याला प्रयत्न करावे लागतील? सध्या देशात अराजक माजवणारे असोत की त्याला थोपवणारे असोत, त्यांना काळाची निर्मिती म्हणायची की मानवी प्रयत्नाचा परिणाम मानायचा? मग नव्या नेतृत्वाची वाट पाहायची की आपणही काही प्रयत्न करायचे? समजा आज मोहनदास करमचंद गांधी जन्माला आले असते, तर महात्मा गांधी झाले असते का? किंवा भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब असते की आणखी आज काय असते? शिवाजी महाराजांनी आज नेमकं काय केलं असतं?

काहीही असलं तरी, देशासमोर जे भयानक संकट उभं आहे, त्यात धर्म, जात आणि त्या अनुषंगानं येणार्‍या राजकीय निष्ठा, ह्यांची गुंतागुंत जास्त जबाबदार आहे. लोकांची स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती पार कोमात गेली आहे, हे नाकारता येणार नाही. एका अर्थानं धर्म हाच मोठा अडसर वाटत असला, तरी मुक्तीच्या वाटा खुल्या करण्यासाठी मदत करणारा प्रकाशदेखील धर्माच्या मदतीनंच आपल्याकडे येताना दिसतो.

नव्या नेतृत्वाला ह्या सार्‍या गोष्टींचा विचार करावा लागेल. विज्ञान हा भौतिक प्रगतीचा प्राण आहे. आधुनिक तंत्रज्ञान हा प्रगतीचा सर्वात मोठा आधार आहे. पण त्यानं माणूस खरंच सुखी होतो का? खरंच शहाणा होतो का? ज्ञान, विज्ञान, शिक्षण, साधन, संपत्ती यांची रेलचेल असताना द्वेषभावना एवढी का उसळ्या मारते? ही अशी जीवघेणी स्पर्धा कशासाठी? एक दिवस आपण मरणारच आहोत, हे आपल्याला कळत नाही का? तरीही आपलं पाशवी साम्राज्य उभं करण्याची लालसा कशासाठी? सार्‍या देशाला उद्ध्वस्त करायला निघालेली विकृती कशामुळे ?

खूप सारे प्रश्न आहेत. खूप सारा गोंधळ आहे. ह्या सार्‍या प्रश्नातून जगाला मुक्ती हवी आहे. या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर पडायला हवे. तसे प्रयत्न करायला हवे. त्यासाठी तसेच नेते पण हवेत. किंवा आपण स्वतः त्या दिशेनं विचार करावा लागेल. काही प्राथमिक गोष्टींचा अग्रक्रमानं विचार व्हायला हवा.

धर्म हा ज्याची त्याची खाजगी बाब असावी.
लोकांनी राजकीय पक्षाची बांधिलकी स्वीकारण्यापेक्षा पक्षांनी समाजाची बांधिलकी स्वीकारायला हवी.
सत्तेचा उपयोग समाज, देश संचलनासाठी व्हायला हवा, शोषणासाठी नाही.
शिक्षण आणि आरोग्य सर्वांसाठी खुले आणि मोफत असावे.
बहुतेक परंपरागत धर्म आजच्या परिस्थितीसाठी कालबाह्य झालेले आहेत का? मग अशावेळी नवा काही पर्याय आहे का? की माणसानं धर्म झुगारून द्यायला हवा?
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाच्या मर्यादा जशा लक्षात आल्यात, तसंच देवांचे चेहरेसुद्धा उघडे पडलेत. अशा संकटाच्या काळातही विविध देशांच्या सरकारांचा कांगावखोरपणादेखील समोर आला. एक दुसर्‍याला बदनाम करण्याची प्रवृत्तीही समोर आली. खोटं श्रेय घेण्याची धडपडदेखील गाव असो दिल्ली, सारखीच असल्याचं सिद्ध झालं.
या सार्‍या विकृतींपासून दूर असलेल्या नव्या नेतृत्वाची देशाला गरज निर्माण झालेली आहे. भौतिकाचा हव्यास सोडून समतेचा, शांतीचा ध्यास असलेलं नवं नेतृत्व आम्हाला हवं आहे.

मी व्यथांची वेधशाळा
मी नभिचा मेघ काळा
वाळवंटा ऐक माझे
मी उद्याचा पावसाळा !

अशी आश्वासक सुरूवात व्हायची असेल, तर नवी पिढी समोर आली पाहिजे. पाटी कोरी असली पाहिजे. आधीचे सारे रंग पुसले गेले पाहिजेत. या देशाचा सातबारा माणसाच्या नावावर होईल.. अशी काळजी घेणारी एकविसाव्या शतकाची नवी लिडरशिप समोर यावी, हीच काळाची गरज आहे.
बघू या..

-ज्ञानेश वाकुडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -