घरफिचर्ससारांशटेक्नो-बिरबल

टेक्नो-बिरबल

Subscribe

…तर गेली कित्येक युगं अकबर बिरबलाचा सल्ला घेत आला. पण आता नव्या युगात घरबसल्या सल्ला देणार्‍यांचं मार्केट डाउन झालं आहे हे अकबराच्या लक्षात आलं…आणि अकबराने बिरबलासाठी लोअर परळला-इन द हार्ट ऑफ द सिटी एक शाही ऑफिस घेऊन द्यायचं ठरवलं.

बिरबलची तशी नव्या ऑफिसात जायची अजिबात तयारी नव्हती. त्याला कसं आपलं घरात बसून किंवा फार फार तर दरबारात बोलावल्यावर दरबारातून सल्ला द्यायची सवय होती. हे असलं लोअर परळचं ऑफिस वगैरे भानगड त्याला आवडणारी नव्हती. पण अकबराने नव्या युगाची गरज गळी उतरवल्यामुळे शेवटी बिरबलापुढेही पर्याय उरला नाही. त्याने लोअर परळमधल्या ऑफिसात बसून ‘बिरबल कन्सल्टन्सी’ सुरू करायचं मान्य केलं.

- Advertisement -

…तर शेवटी बिरबलच तो…त्या काळातला चातुर्यशिरोमणी आणि आजच्या काळातल्या भाषेत बोलायचं तर विश्वचतुर. त्याने लोअर परळमधल्या ऑफिसांची चकाचक संस्कृती पाहिली आणि अकबराला काळानुरूप चकाचक सल्ले द्यायला सुरूवात केली.

एकदा काय झालं…अकबराला आपलं राजकीय अस्तित्व पिछाडीवर पडल्यासारखं वाटू लागलं. नाक्यानाक्यावर मोठमोठी बॅनर्स लावूनसुध्दा जनमानसात आपली प्रतिमा फिकी पडते आहे अशी त्याची धारणा होऊ लागली. रात्री झोप लागेनाशी झालं तेव्हा एका सुंदर सकाळी उठून अकबर लोअर परळला आला. तडक बिरबलच्या अ‍ॅन्टिचेंबरमध्ये घुसला.
बिरबलचं लक्ष अकबराच्या काळ्यानिळ्या डोळ्यांकडे गेलं. अकबराला बरेच दिवस झोप लागत नाहीय हे चतुर बिरबलच्या लक्षात यायला जराही वेळ लागला नाही…आणि अकबराला झोप न येण्याचं कारणही उमगायला त्याने वेळ घेतला नाही.
अकबराने काही सांगण्यापूर्वीच बिरबल म्हणाला, ‘बॉस, डॉक्टरांनी तुम्हाला काल रात्री दिलेलं प्रिस्क्रिप्शन फाडून टाका. झोपेच्या गोळ्या घेऊ नका.’

- Advertisement -

‘झोप येत नाही म्हणून मला डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या आहेत हे तुला कसं कळलं?’ आपला निद्रानाश बिरबलच्या कसा लक्षात आला ह्याचं आश्चर्य वाटून अकबराने बिरबलकडे कौतुकाने पाहिलं.
‘बॉस, तुमच्या खिशातलं प्रिस्क्रिप्शन मला तुमच्या झिरझिरीत खिशातून स्पष्ट दिसतंय…आणि झोप येत नसेल तर काय आयुर्वेदिक उपचार करावेत ही काल तुम्ही फेसबुकवर पोस्ट टाकलीत तीसुध्दा मी पाहिली आहे’, बिरबल म्हणाला.
‘मग बिरबल, तुच सांग, काय असेल मला ही झोप न लागण्याचं कारण?…आणि ह्या प्रश्नाला लागून एक उपप्रश्नही आहे…ह्या झोप न लागण्यावर काय उपाय करावा?’ अकबराने बिरबलला युगानुयुगे टाकावा तसा गुगली टाकला.

‘बॉस, कालच मी माझ्या सगळ्या असिस्टंट्सना चर्चगेट ते दहिसर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बदलापूर असं फिल्डवर पाठवलं…आणि सगळा डेटा कलेक्ट केला. त्यावर कालच आमची कॉन्फरन्स झाली. त्यात आम्हाला असा फीडबॅक मिळाला की आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी पब्लिसिटीच्या बाबतीत आपल्याला सॉल्लीड मागे टाकलं आहे…माझ्या एका माझ्यासारख्याच चतुर असिस्टंटने तर हासुध्दा फीडबॅक दिला की आपले बॉस सिटीमधून त्यांच्या कारमधून फिरतानाही त्यांना कळेल की आपण लोकांमध्ये दिसून येत नाहीय…मग मी अंदाजानेच ताडलं की असं काही घडलं असेल तर आपल्या बॉसच्या डोळ्याला डोळा कसा लागेल!…’ बिरबलने अकबरापुढे चतुर मांडणी केली.
‘…पण नाक्यानाक्यावर तर तुच सांगितलेल्या एजन्सीने आपलीच बॅनर्स, आपलीच होर्डिंग्ज लावली आहेत, ‘एकच खबर, सगळीकडे अकबर’ ही आपली टॅगलाइनसुध्दा चांगली झाली. लोकांपर्यंत पोहोचली…तरी आपण पिछाडीवर कसे?’ अकबर आपले डोळे चोळत चोळत म्हणाला.

बिरबलाने डोळे मिचकावत म्हटलं, ‘बॉस…होर्डिंग्ज, बॅनर्स हे सगळं ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट सिनेमाला कृष्णधवल सिनेमा म्हटलं जायचं त्या काळातली साधनं आहेत. आता राजकारण फक्त होर्डिंग्ज, बॅनर्समधून खेळलं जायचे दिवस कधीच गेले बॉस. आता तुम्हाला सरळच सांगून टाकतो…आता तुम्ही वॉररूम उघडायला हवी, आयटीसेल स्थापन करायला हवी, फेसबुक लाइव्ह यायला हवं. नुसतं लोअर परळला ऑफिस घेऊन कसं चालेल बॉस?’
अकबराने आपला मोबाइल खिशातून बाहेर काढला आणि गुगल पेच्या बाबतीत बिरबलच्या एका स्मार्ट असिस्टंटला माहिती विचारली.
आपला बॉस अकबर टेक्नॉलॉजीबाबत लेटेस्ट अपडेट्स घेतो आहे हे तिरप्या नजरेने बघून बिरबलला मनातून आनंद झाला. गुगल पेविषयी आपला बॉस कुणाला तरी विचारतो आहे म्हणजे बॉसची मोकळा हात ठेवायची तयारी आहे असा तर्क बिरबलने काढला.

बिरबल म्हणाला, ‘त्या मागच्या युगात तुम्ही न्यूजमेकर होता, आज तुमच्यात ती क्षमता राहिली नाही. आता तुमच्यावर एखादा सिनेमा निघतो तेवढ्यापुरते तुम्ही न्यूजमध्ये असता. पण तिथेही सगळा फोकस जोधावर असतो.’
‘मग सगळा फोकस आपल्यावर राहण्यासाठी आपण काय करण्याची आवश्यकता आहे?’ अकबराला बिरबलचा पॉइंट पटला होता.
बिरबल एकही सेकंद वाया न घालवता म्हणाला, ‘गरज असेल तिथे आणि गरज नसेल तिथेही आपली प्रतिक्रिया देत जा.’
‘म्हणजे?’ अकबराने खोल स्वरात प्रश्न केला.
बिरबल इतकंच म्हणाला, ‘बॉस, ट्विटर अकाउंट उघडा ट्विटर अकाउंट.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -