घरक्रीडाRanji Trophy : ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी स्पर्धा नाही!

Ranji Trophy : ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी स्पर्धा नाही!

Subscribe

बहुतांश राज्य क्रिकेट संघटनांनी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला पसंती दर्शवली.   

रणजी करंडक (Ranji Trophy) ही भारतातील सर्वात मोठी आणि मानाची स्थानिक क्रिकेट स्पर्धा मानली जाते. भारताचे युवा क्रिकेटपटू या स्पर्धेत चांगली कामगिरी करत प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने रणजी स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश राज्य क्रिकेट संघटनांनी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला पसंती दर्शवल्याने बीसीसीआयला रणजी करंडकाचा यंदाचा मोसम रद्द करणे भाग पडले. विजय हजारे स्पर्धेसह विनू मंकड करंडक ही १९ वर्षांखालील स्पर्धा आणि महिलांची राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा यांचेही बीसीसीआय आयोजन करणार आहे. याबाबतचे पत्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना पाठवले आहे.

मुश्ताक अली स्पर्धा संपन्न 

कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक विस्कटले. भारतातील स्पर्धाही याला अपवाद ठरल्या नाहीत. मात्र, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (आज) तामिळनाडू आणि बडोदा या संघांमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर बीसीसीआयने विजय हजारे करंडक स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. मुश्ताक अली स्पर्धेप्रमाणेच हजारे करंडकासाठी संघांना जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागेल. ही स्पर्धा पुढील महिन्यात होणार आहे.

- Advertisement -

बीसीसीआयचा निर्णय योग्यच – पठाण

रणजी करंडकाचा यंदाचा मोसम रद्द करण्याचा बीसीसीआयने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने व्यक्त केले. ‘रणजी करंडकाचे आयोजन न करता विजय हजारे करंडक आणि सिनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा घेणे हा बीसीसीआयचा निर्णय योग्यच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले जैव-सुरक्षित वातावरणाचे नियम, तसेच प्रवासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ३८ संघांमध्ये होणारी रणजी स्पर्धा आयोजित करणे बीसीसीआयला खूप अवघड गेले असते,’ असे पठाण म्हणाला.


हेही वाचा – IPL 2021 : ‘हे’ तीन खेळाडू लिलावात राहणार अनसोल्ड?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -