गळतीची मेख…

Subscribe

भारतात निवडणुका आल्या आहेत हे सर्वसामान्य जनतेला कळण्याचे पहिले लक्षण म्हणजे पक्षांतरबाजीला येणारे उधाण हे आहे. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षांमध्ये राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या ज्या काही माकडउड्या सुरू होतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन होत असते. बेरोजगारांचा आणि गुन्हेगारांचा राजकीय क्षेत्रात सुरू झालेला मुक्तसंचार हा जसा एक चिंताजनक आजार आहे तशाच प्रकारे एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारणारे आणि येनकेन प्रकारे स्वतः कायमस्वरूपी सत्तेत राहणारे आयाराम आणि गयाराम यांनी खरे तर राजकीय पक्षांची हतबलता हे अधिक स्पष्ट पणे अधोरेखित केली आहे. आजमितीला तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे मग तो केंद्रातील सत्तेत असलेला भाजपा पक्ष असो विरोधी पक्षात असलेला काँग्रेससारखा या देशावर तब्बल साठ वर्षे राज्य गाजवलेला काँग्रेस असो, देशातील या दोन मोठ्या पक्षांकडे आयाराम गयारामबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नाही.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास राज्यात आगामी काळामध्ये महापालिका नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्यामुळे लोकशाहीतील बलवान पक्ष हे दुर्बल पक्षांना अधिक दुर्बल कसे करता येईल या करता अधिकाधिक सक्रिय झालेले या काळात दिसून येतात. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या केवळ दोन राष्ट्रीय पक्षांनाच दोष देण्यासारखी स्थिती नाही. तर महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षही ताकदीने उतरत असल्यामुळे प्रादेशिक पक्षांमध्येही याबाबत मोठ्याप्रमाणावर चढाओढ दिसून येते. गेल्या दहा वर्षांमध्ये या चढाओढीचा सर्वात मोठा फटका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

- Advertisement -

2009 साली मनसेचे तब्बल 13 आमदार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यामुळे तेव्हापासून शिवसेनेपासून दुरावला गेलेला मराठी मतदार विशेषत: तरुण मतदार हा राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे मनसेकडे आकर्षित झालेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र अशी कितीही पक्षांतर झाली तरीही शिवसेना आणि मनसे हे असे प्रादेशिक पक्ष आहेत की जे भाषिक अस्मितेच्या आणि धर्माच्या आधारावरती तळागाळात संघटनेचा जम घट्ट ठेवून आहेत. त्यामुळे आमदार नगरसेवक आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे जरी पक्षांतर करून अन्य पक्षात गेले तरी पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र त्या पक्षातच राहतात आणि त्याच जिद्दीने पुन्हा नव्याने पक्षाच्या कार्याला लागतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या संघटनेला फारसा धोका पक्षांतरापासून होत नाही.

आणि एखादा मोठा नेता गेला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची जी काही ठाकरे कुटुंबीयांची परंपरा आहे ती लक्षात घेता सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र संघटनेशी निष्ठावंत राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. अगदी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडून अन्य पक्षात घरोबा केला तेव्हा शिवसेनेच्या टीकाकारांनी शिवसेना आता संपली. शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही अशा वल्गना केल्या होत्या. मात्र त्यानंतरही शिवसेनेचे अस्तित्व कायम राहिले. 2019 साली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. आज त्याच सरकारमध्ये छगन भुजबळ यांना काम करावे लागत आहे यालाच नियतीचा खेळ म्हणतात.

- Advertisement -

त्यामुळे शिवसेना जरी या पक्षांतरापासून सावरली असली तरी राज ठाकरे यांची मनसे मात्र पक्षांतरांमुळे बेजार झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे सेना-भाजपातील तरुण वर्ग हा काही प्रमाणात मनसेकडे आकर्षित झाला आहेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे फर्डे वक्तृत्व, रोखठोक भाषाशैली, अरे ला कारे विचारण्याची पद्धत आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून राडा करण्याची संस्कृती यामुळे राज ठाकरे यांच्यावर मराठी तरुण वर्ग फिदा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. शिवसेनाप्रमुखांचे संस्कार असलेले राज ठाकरे गयारामबाबत फारसे गंभीर कधीच नसतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे निष्ठावंत शिवसैनिकांच्या संघटनेचे भक्कम पाठबळ होते. तसे संघटनेचे भक्कम पाठबळ गेल्या 13 वर्षांच्या काळामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे उभे करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मनसेतून जी गळती होत आहे ती निश्चितच चिंताजनक आणि पक्षाला विचार करायला लावणारी आहे.

राजकारण हे आता तरुणांसाठी एक करीयरची संधी ठरले आहे. त्यामुळे ज्या तरुणांना शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या संघटनेत स्थान मिळत नाही ते राजकारणाच्या बाराखडीसाठी मनसेमध्ये येतात. मात्र मनसेमध्ये बाराखडी शिवाय अन्य काहीच शिकता येत नाही. त्यामुळे किती वर्षे बाराखडी म्हणत बसणार मग त्याचा परिणाम म्हणून ज्या पक्षांमध्ये संधी उपलब्ध आहे त्या पक्षांमध्ये संधीसाधू उड्या मारतात. अशा संधीसाधूंना रोखण्याची कोणतीही व्यवस्था कोणत्याही राजकीय पक्षात आजमितीला अस्तित्वात नाही तर ती मनसेमध्ये कुठून येणार?

एक केंद्री आणि एककल्ली ही जशी राज ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे ती त्यांच्या पक्षासाठी धोक्याची घंटादेखील ठरत आहे. फरड्या वक्तृत्वाने प्रचार सभा जिंकता येतात, नगरसेवक आणि आमदार निवडून आणता येतात, मात्र त्यांना टिकवून ठेवता येत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांनी शिवसेना भाजप या पक्षांप्रमाणे संघटनात्मक बांधणीसाठी अधिक कष्ट घेण्याची गरज आहे. आणि ते जर कष्ट घेण्यामध्ये राज ठाकरे कुठे कमी पडत असतील तर त्यांनी गाजवलेल्या सभांच्या जोरावर ते एकतर हमखास निवडून येणार्‍या उमेदवाराला नक्कीच पाडू शकतात, मात्र स्वतःच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. गेली 13 वर्षे मनसे हेच काम कमी अधिक प्रमाणात प्रत्येक निवडणुकांमध्ये करत आहे. त्यामुळे कधी शिवसेनेचा उमेदवार पाडा, कधी भाजपचा पाडा, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाडा या सर्व पाडापाडीत मनसेचा स्वतःचा उमेदवार मात्र काही निवडून येत नाही.

यापुढेही हे असेच सुरू राहिले तर मनसे वाढणार तरी कशाच्या जोरावर? याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मनसेमध्ये नेत्यांची दुसरी फळी निर्माण केली पाहिजे आणि या दुसर्‍या फळीने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामधून नेतृत्वाच्या तिसर्‍या आणि चौथ्या फळ्यादेखील कशा निर्माण होतील हे पाहणे ही पक्षाची गरज आहे. अनेक शहरांमध्ये मनसेच्या आजदेखील मध्यवर्ती शाखा नाहीत, त्यामुळे मग मुख्य पदाधिकार्‍यांनी त्यांची स्वतःचीच खासगी कार्यालये मनसेचे कार्यालय म्हणून वापरली आहेत. त्यामुळे जेव्हा हे मुख्य पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधी जनतेतून अन्य पक्षात जातात तेव्हा मात्र तेथील स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची आणि अन्य पदाधिकार्‍यांची कुचंबणा होते. याकडेही मनसे प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे विशेषत: तरुण वर्ग आकर्षित होतो, कुठली कामे अडली की, लोक आपल्याकडे धाव घेतात, पण जेव्हा निवडणुका येतात, त्यावेळी मात्र त्यांना आपल्या पक्षाचे विस्मरण का होते, आपल्या पक्षाचे पदाधिकारी उज्ज्वल भविष्यासाठी अन्य पक्षात जातात, याचा पक्षप्रमुखांनी गांभीर्याने विचार करायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -