घरफिचर्ससारांशस्त्रीवादाच्या नावानं...

स्त्रीवादाच्या नावानं…

Subscribe

मुळात स्त्रीवाद म्हणजे स्त्रीयांनी स्त्रियांच्या हक्कासाठी, मुक्तीसाठी लढलेला लढा हा विचार पण मला खूप एकांगी वाटतो!! कारण ह्या पितृसत्ताक समाजात स्त्री जर गुलाम आहे, दासी आहे तर पुरूष म्हणजे मालक, म्हणजे ‘माणूस’ कोणीच नाही!! एक दाबणार दुसरा दबणार दोघांना आपलं आपल्या चौकटी, माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाही की मान्यता नाही, कोणीच मुक्त नाही! ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्त्रीवाद समजून घ्यावा लागेल. आज आपल्यासमोर उभा केलेला स्त्रीवाद म्हणजे दोन धर्म, दोन पक्ष, दोन देश यांच्याप्रमाणे स्त्रियाविरुद्ध पुरुष ही लढाई!! पण हे आंदोलन स्त्रीविरुद्ध पुरुष असे नाही, किंबहुना ते तसे असूच शकत नाही.

मागच्या आठवड्यात लॉ कॉलेजमधल्या एका सिनियर सोबत बर्‍याच दिवसांनी कामानिमित्ताने बोलणे झाले. महत्वाच्या गोष्टी बोलून झाल्यानंतर जरा निवांत गप्पात कडे मोर्चा वळवला. कशी आहेस असा सहज प्रश्न विचारल्यावर, झाले का जेवण हा दुसरा महत्वाचा प्रश्न विचारला गेला. नाही गं, आता स्वयंपाक करणार मी असे मी म्हटल्या बरोबर तिने खूप मोठे आश्चर्य भाव असलेले इमोजी पाठवले आणि त्याचबरोबर लगेच पुढचा प्रश्न पण- ‘तू स्वयंपाक करणार ? तुला स्वयंपाक करता येतो? त्या वर मी पण मुद्दामच का गं असे का वाटले तुला विचारले तर तिचे उत्तर तयार – तसे नाही गं, पण तुझ्याकडे बघून असे वाटत नाही तुला येत असेल म्हणून. म्हणजे कसे तू एकतर फॉरेन रिटर्न आणि त्यातल्यात्यात फेमिनिस्ट वगैरे, म्हणून जरा आश्चर्य वाटले इतकेच. मी तिला त्यावर एकच प्रति प्रश्न केला केला का ग फॉरिन रिटर्न फेमिनिस्ट बायकांना पोट नसते का? त्यांना भूक नाही लागत का ?

त्यावर तिचे काहीच उत्तर आले नाही, पण माझ्या डोक्यात नेहमींप्रमाणे प्रश्नाचा कल्लोळ माजला. खरेतर माझ्यासोबत असे काहीच पहिल्यांदाच घडले नाही किंवा हे फक्त स्वयंपाका पुरतेच मर्यादित नाही. मला असे प्रामाणिकपणे वाटते की, असे प्रश्न आपल्या आजूबाजूला असणार्‍या अनेक लोकांना कायम पडत असतील कारण अजून पण आपल्याला स्त्रीवाद म्हणजे नेमके काय याचे उत्तर नीट माहीत नाही. हे संकल्पनाच आपल्याला नीट समजली नाही आणि मग त्यातूनच स्त्रीवाद हा कायम तिरस्कृत किंवा उपहासात्मक पणे चर्चिला जाणारा विषय बनून राहतो. हा विषयच इतका वलयांकित आहे की, स्त्रीवादी लिखाण करणारे अनेक लेखक, या क्षेत्रात काम करणारे अगदी स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लोक ही स्वतःला लवकर स्त्रीवादी म्हणवून घेत नाहीत.

- Advertisement -

जसे माझ्या नॉन लीगल फिल्डमधील मित्रमैत्रिणी मला कायम विचारत असतात अरे त्या मूव्हीमध्ये दाखवले तसे असते ना कोर्ट, विग घालून ऑर्डर ऑर्डर करत बसलेला असतो ना जज, जोरात अर्वाच्य भाषेत भांडणारे वकील आणि कटघर्‍यात उभे असलेले गुन्हेगार आणि मग एखादा केस विनिंग डायलॉग झालं संपलं जिंकली तुम्ही केस!

मग त्यांना समजून सांगावं लागतं, नाही रे बाबा यातलं काहीच कोर्टात घडत नाही. स्त्रीवाद स्त्रीवादी लोकांच्या बाबतीत देखील असे अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत! स्त्रीवाद म्हणजे पुरुषद्वेष किंवा पुरुषांवर सूड उगवणं असाच काहीसा बर्‍याच लोकांच्या मनात या संकल्पनेबद्दल गैरसमज आहे. मग त्यातूनच स्त्रीवादी बायका म्हणजे लग्न न करता किंवा लग्न करूनही दहा ठिकाणी लफडी करणार्‍या किंवा मनाला वाटेल त्याच्या सोबत झोपणार्‍या दारू सिगरेट गांजा फुंकणार्‍या कुटुंब मोडणार्‍या स्वातंत्र्याला स्वैराचार समजणार्‍या, बॉयकट करून कडक कॉटनची किंवा खादीची साडी किंवा ड्रेस घालून किंवा पुरुषी पेहराव करून लाऊड मेकअप करून छान छोक करणार्‍या म्हणजे एका अर्थाने वाया गेलेल्या बायका!!

- Advertisement -

या कॅटेगिरीमधल्या बायकांना स्वयंपाक-पाणी करता येत नाही. यांना पोर बाळ जन्माला घालून त्यांची जबाबदारी घ्यायची नसते, ह्यांना लग्नसंस्था चुकीची वाटते कारण यांचे एकाने मन भरत नाही, ह्या छोटे छोटे कपडे घालून पुरुषांच्या मांडीला मंडी लावून निर्लज्जपणे सिगारेटचा धूर सोडतात, बेशरमपणे रात्री अपरात्री दारू ढोसत बसतात. मुद्दाम डीप नेकचे ब्लॉउज-ड्रेस, टॉप घालणार्‍या, पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करणार्‍या, नंतर ‘माणसा’ कडून काही कमी जास्त घडलेच चुकून तर किंवा जरा ह्या मनाप्रमाणे नाही झाले तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई ची भाषा करणार्‍या, आंदोलन, मोर्चे, कँडल मार्च काढणार्‍या, आणि ह्या ना सपोर्ट करणार्‍या चारित्र्यहीन बायका! पुरुषांना कायम आपल्या अंगठ्या खाली दाबून ठेवणार्‍या, त्याला आपल्या ताटा खालचे मांजर समजणार्‍या, निर्लज्जपणे स्त्रीयांच्या लैंगिक आणि शारीरिक प्रश्न आणि सुखाबद्दल बोलणार्‍या, चारचौघात पाळीसारख्या खासगी विषयावर बोलणार्‍या, नवर्‍याला अरे कारे करत नावाने बोलवणार्‍या, त्याला घरातले काम सांगणार्‍या, झाडू पोचा वगैरे घरातले काम करायला लावणार्‍या संस्कृती बुडव्या स्त्रीवादी बायका

आणि अशी इतकी नकारात्मक प्रतिमा जर ह्या स्त्रीवादाबद्दल आणि स्त्रीवाद्यांबद्दल असेल भले भले लोकही स्वतःला स्त्रीवादी म्हणून घेत नाही ह्यात आश्चर्य कसले! मुळात भारतासारख्या देशात ह्या विचारसरणीची खरंच किती गरज आहे हेच न समजू शकल्यामुळे आपण त्याला दूषण लावत बसलो! त्यातल्या त्यात एखाद्या पॉवरफुल किंवा इंन्फ्लुएन्शियल राजकारणी सेलिब्रिटीची ह्या विषयातील अपूर्ण ज्ञानातून केले गेलेले विधान, ट्विट्स, अजाणतेपणी किंवा मुद्दामहून घेतल्या जाणार्‍या भूमिका ह्या सगळ्यामुळे स्त्रीवाद बदनाम झाला आहे!

त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे पुरुषद्वेष आणि स्त्रीवादी म्हणजे पुरुषद्वेष्टे असे समीकरण तयार होऊन ही चळवळ चेष्टेचा विषय बनली! मुळात भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीयांच्या सामाजिक दर्जाबद्दल कमालीचा विरोधाभास आढळतो. म्हणजे एका बाजूला तिचे कमालीचे धर्माधिष्ठित गौरवीकरण तर दुसर्‍या बाजूला प्रत्यक्षात मिळणारा दुय्यम दर्जा!! ह्याही पुढे जाऊन मी म्हणेन की, आई, बहीण, सून, सासू, आत्या, मामी, मावशी वगैरे या सगळ्या मायाजालात माणूस म्हणून अपेक्षित असलेल्या मान्यतेला मिळालेला नकार!!

मुळात स्त्रीवाद म्हणजे स्त्रीयांनी स्त्रियांच्या हक्कासाठी, मुक्तीसाठी लढलेला लढा हा विचार पण मला खूप एकांगी वाटतो!! कारण ह्या पितृसत्ताक समाजात स्त्री जर गुलाम आहे, दासी आहे आहे तर पुरूष म्हणजे मालक, म्हणजे ‘माणूस’ कोणीच नाही!! एक दाबणार दुसरा दबणार दोघांना आपलं आपल्या चौकटी, माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाही की मान्यता नाही, कोणीच मुक्त नाही!!

ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्त्रीवाद समजून घ्यावा लागेल. आज आपल्यासमोर उभा केलेला स्त्रीवाद म्हणजे दोन धर्म, दोन पक्ष, दोन देश यांच्याप्रमाणे स्त्रियाविरुद्ध पुरुष ही लढाई!! पण हे आंदोलन स्त्रीविरुद्ध पुरुष असे नाही, किंबहुना ते तसे असूच शकत नाही. कारण ह्यात आपल्याला एकमेकांविरुद्ध नाही तर एकमेकांच्यासोबत उभे राहायचे आहे! कारण ही संकल्पना समजून उमजून तिच्यासाठी भांडणार्‍यांना ही गोष्ट नक्की माहीत आहे की एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र असूच शकत नाही! अन्यायाचे उत्तर अन्याय असूच शकत नाही!! मुळात स्त्रीवर झालेल्या अन्यायासाठी, अत्याचारासाठी स्त्रीवाद फक्त पुरुषांना(लिंगाधारीत) दोष देत नाही, कारण दोष पुरुषांचा नाही तर पुरुषसत्ताक विचारपद्धतीचा आहे, जी स्त्री आणि पुरुष दोघांवरदेखील सारखीच बिंबवली आहे.

स्त्रीवादाचा पुरस्कार करणार्‍या बायकांबद्दल कायमच एक कांगावा केला जातो की, त्यांना पुरुषांप्रमाणे वागून सत्ता प्रस्थापित करायची आहे आणि म्हणूनच ते आपले स्त्रीत्व नाकारतात! पण मुळात ह्या सर्व स्त्रियांना पुरुष व्हायचेच नाही, ना पुरुषांची बरोबरी करायची आहे! स्त्री म्हणून नैसर्गिकदृष्ठ्या स्त्री पुरुषांची भिन्नभिन्न वैशिष्ठ्ये ह्या स्त्री किंवा हे स्त्रीवादी पुरुष नाकारत नाहीत. पण त्यांचा नकार आहे, त्यांचा लढा आहे ह्या वैशिष्ठ्याच्या आधारे स्त्री पुरुषांमध्ये भेद निर्माण करून केल्या जाणार्‍या दर्जा व संधीच्या असमान वाटपाला!!

मागे एका कार्यक्रमात ह्याच विषयावर चर्चा सुरू असताना एका स्त्रीने ह्याच आधारावर एक प्रश्न विचारला होता- स्त्री आणि पुरुष ह्याची जर नैसर्गिक संरचनाच निसर्ग नियमांप्रमाणे वेगळी आहे तर त्यात समानतेची भाषा करणार कशी? त्या निमित्ताने हा महत्वाचा मुद्दा मला इथे क्लिअर करावासा वाटतो- की मुळात स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जे शारीरिक भेद असतात त्यांना आपण लैंगिक भेद म्हणूयात, पण ह्या लिंगाच्या आधारे त्यांच्यात मुद्दाम जे भेद तयार केले जातात ते म्हणजे सांस्कृतिक किंवा सामाजिक भेद. माझे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी मी त्यांना एक प्रश्न विचारला- आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अशी किती कामे आहेत जिच्यासाठी शारीरिक ताकदीची आवश्यकता असते व म्हणून ती स्त्रियांच्या कुवती पलीकडची असतात? अगदी साधा ट्रक किंवा टॅक्सी चालवण्यापासून तर विमान चालवण्यापर्यंत – ह्या सर्व कामांना किती शारीरिक शक्तीची गरज आहे? किंवा अगदीच साधे उदाहरण म्हणजे शिक्षणात मुलगा आणि मुलगी ह्यांच्यासाठी असणारी संधीची असमानता! ह्या संधीमधील असमानतेचे आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेचा संबंध काय? म्हणजेच हा फरक शारीरिक नसून लिंगाधारीत आहे.

हॉस्टेलवर किंवा रूमवर राहत असताना सर्रास स्वयंपाक करणारे मूल/पुरुष त्यांची आई बहीण बायको आजूबाजूला असताना किंवा चारचौघात गेल्यावर स्वयंपाक घराकडे फिरकतसुद्धा नाही. ह्याच संदर्भात सिमोन म्हणते की रोज दोन वेळा जेवण करणे ही ज्याची प्राथमिक गरज आहे त्याला स्वतःचे अन्न स्वतः शिजवता येऊ नये हे केवढे मोठे परावलंबन आहे. स्वतःचा चहाचा कप वॉश बेसिनजवळ नेऊन ठेवणे किंवा कधी तरी धुणे म्हणजे आपल्या आई, बहीण, बायको, प्रेयसीला मदत करणे नव्हे ही भावना मला महत्वाची वाटते!

आज काल अनेक पुरुष (आवाज कमी असला तरी) स्वतःला स्त्रीवादी म्हणतात-माझ्या मते ह्याचे एकमेव कारण म्हणजे स्त्रीवादाने त्याचा माणूस म्हणून केलेला स्वीकार! मर्द को भी दर्द होता है, पुरुष पण रडू शकतो, हळवा असू शकतो, शास्त्रीय नृत्य करू शकतो, आनंद दुःख या भावना मोकळेपणे व्यक्त करू शकतो, ही सारी देण स्त्रीवादचीच आहे.

मुळात स्त्रीवादी विचारसरणी काही पाश्चात्य किंवा शहरी नाही. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे ’ ह्या तत्वासाठी आपल्या देशात पण अनेक लोकांनी प्रयत्न केले – अगदी राजा राममोहन रॉय यांच्यापासून ईश्वरचंद विद्यासागर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आनंदीबाई कर्वे, इंदिरा भागवत, दुर्गा भागवत, महर्षी कर्वे, अनेक अनेक नावे या अनुषंगाने घेता येतील

स्त्री पुरुष एलजीबीटीक्यूआयए+ इ. सर्वांना एकत्रितपणे गुण्यागोविंदाने आपल्या हक्काची जाण आणि कर्तव्याचे भान ठेवत सामंजस्याने समतेच्या तत्वच्या आधारे एका निरोगी(मानसिक व शारीरिक) समाजाच्या निर्मितीसाठीच्या प्रयत्नात एकमेकांना खंबीरपणे दिलेली साथ म्हणजेच माझ्यासाठी स्त्रीवाद, आणि हो मी स्त्रीवादी आहे.

-(सदर लेखात अनेक लेखातील संदर्भ वापरले आहेत.)
-अ‍ॅड. परिक्रमा खोत
-विधी विषयक सल्लागार
-जिल्हा व सत्र न्यायालय
-पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -