घरमहाराष्ट्रमाझ्यावरील आरोप खोटे; मला आणि सरकारला नाहक बदनाम करण्याचा भाजपचा डाव -...

माझ्यावरील आरोप खोटे; मला आणि सरकारला नाहक बदनाम करण्याचा भाजपचा डाव – अनिल परब

Subscribe

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओप्रकरणी NIA च्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं पत्र समोर आलं आहे. अनिल परब यांनी मला मुंबई महानगर पालिकेच्या ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी गोळा करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले आहेत. सचिन वाझे यांनी केलेले आरोप मी फेटाळतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर असे खंडणीखोराचे संस्कार नाही आहेत. बाळासाहेबांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की हे सर्व खोटं आहे, असं अनिल परब म्हणाले.

हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेल आरोप आहेत. गेले दोन तीन दिवस भाजपचे पदाधिकारी आरडाओरडा करत होते, की याच्यामध्ये आम्ही तीसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना दोन तीन दिवसांपासून प्रकरण शिजवलेलं आहे, काही दिवसांपासून त्यांना याची कल्पना आहे किंवा त्यांनी हे प्रकरण सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केलं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, याची त्यांना कल्पना आधापासून होती. यामुळे ते गाजावाजा करत होते. याचा अर्थ केंद्रीय संस्थांना हाताशी घेऊन सचिन वाझेंकडून अनिल देशमुख, माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर आरोप केला आहे. हे जे आरोप त्यांनी केले आहेत त्याच्याशी माझा संबंध नाही, असं अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

वाझेचे आरोप आहेत की मी त्याला जून जुलैमध्ये भेटलो होतो. परंतु त्याने इतके दिवस माझी तक्रार केली नाही. परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिले त्यात देखील याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुंख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनाम करण्याची रणनीती ही विरोध पक्ष भाजपची आहे. अशाप्रकारची बदनामी करुन सरकारला बदनाम करण्याचं धोरण भाजपने आयोजित केलं आहे. त्याचा हा भाग आहे. माझी NIA, CBI, RAW किंवा माझी नार्को टेस्ट जरी केली तरी मी त्याला तयार आहे. माझी बदनामी करुन सरकारची बदनामी करण्याचा डाव आहे. म्हणून कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असं अनिल परब म्हणाले.

मनपाच्या कोणत्याही कंत्राटदाराला ओळखत नाही. हे जे आरोप आहेत ते खोटे आहेत. कुठल्याही चौकशीला समोरे जाण्याची तयारी आहे. माझी चौकशी करावी, सत्य बाहेर येईल, असं अनिल परब म्हणाले. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बदनाम करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जात आहे. एवढ्या दिवस कुठे काही होत नसताना आज पत्र लिहून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sachin Vaze Letter: सचिन वाझेंचा लेटर बॉम्ब; ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची नावं घेतली


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -