घरफिचर्ससरणावरच्या मरणाचं स्मरण !

सरणावरच्या मरणाचं स्मरण !

Subscribe

जगावरचं हे संकट त्या त्या देशाच्या सत्तेचं पाप होय अशाप्रकारे विरोधक त्याचा गैरफायदा घेताना दिसतात. असं चित्र सगळ्याच ठिकाणी आहे, असं नाही. पण जिथे ते पाहायला मिळतं त्यातल्या अनेक ठिकाणी परिसीमा पार केल्याचं दिसतं. अडचण असलेल्या राज्याला अधिक मदतीचा हात लागावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हरकत नाही. पण तसं दिसत नाही.

कोणाचाच भरवसा राहिलेला नाही. कोरोना संसर्गाची जग आणि जगातील स्थिती पाहिल्यावर जीवन कसं क्षणभंगुर झालंय याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हायला हरकत नाही. अशावेळी आपण कसं वागलं पाहिजे याचं तत्व ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. अशा संकटात आपण कोणाला हात देत असू तर त्याहून पुण्य नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असताना किमान सगळे रुसवे फुगवे दूर सारावेत आणि हाताला हात देत महामारीचा मुकाबला करावा. पण तसं होताना दिसत नाही. आज प्रत्येक जण स्वार्थी बनलाय. त्याची अडचण, मला काय त्याचं? असं स्वार्थी मन डोकावू लागलंय. आत्मिक स्वार्थ असंच डोकं वर काढत असतो. तो उफाळून येतो तेव्हा हातातून सारं गेलेलं असतं. देशभरातील आजची दारूण स्थिती पाहिल्यावर याची खात्री पटते. स्वर्थांधातून बाहेर पडायचं नाव घेत नाही. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड या राज्यांमधील संसर्गाने निर्माण केलेला प्रकोप पाहिल्यावर तरी प्रत्येकाने सजग व्हायला हवं. तिथे मारणार्‍यांची तादाद नाही, कोण कुठल्या सरणावर याची माहिती नाही आणि कोण कोणाचा नातेवाईक याची नोंद नाही. एकाच वेळी शंभर, दीडशे जळती प्रेतं पाहताना जिथे काळजाची घालमेल होते तिथे ज्यांचे नातेवाईक असतील त्यांचं काय होत असेल? हे दृश्य खरं तर जीवनाचं बीज निर्माण करणारं आहे. अशावेळी प्रत्येकाने समयसूचकता दाखवणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच माणुसकीने वागण्याची गरज आहे. तसं पाहिलं तर कोरोना संक्रमण कोणा एकाच्या वाट्याला आलेलं नाही. त्याने राज्य, राष्ट्र गृहीत धरलेलं नाही, ना जात, धर्म, पंथ पहिला. अशा संकटात प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. आजचं चित्र तसं नाही हे जाणीवपूर्वक नमूद करावं लागतं.

जगावरचं हे संकट त्या त्या देशाच्या सत्तेचं पाप होय अशाप्रकारे विरोधक त्याचा गैरफायदा घेताना दिसतात. असं चित्र सगळ्याच ठिकाणी आहे, असं नाही. पण जिथे ते पाहायला मिळतं त्यातल्या अनेक ठिकाणी परिसीमा पार केल्याचं दिसतं. अडचण असलेल्या राज्याला अधिक मदतीचा हात लागावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हरकत नाही. पण तसं दिसत नाही. आज जगात कोरोनाने सर्वाधिक भरडून निघालेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला तरी हे पुण्य आलेलं नाही हे इथे नमूद केल्याशिवाय राहवत नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार म्हणजे महाराष्ट्रावरील जणू आपत्तीच असावी, अशी वर्तणूक विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांकडून सातत्याने मिळते आहे. सरकार कुठे कमी पडत असेल तेव्हा कान ओढण्याच्या जबाबदारीत आपण सारं काही विसरून गेलोय की काय असं चित्र उभं करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कोरोना संकट हे मानव की निसर्ग निर्मित याची फोड करण्याची ही वेळ नाही. आज संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देण्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. त्याऐवजी एकमेकांवर चिखलफेक करण्याची अहमहमिका सुरू आहे. संकटात सापडलेल्या राज्याला मदत करण्याचं औदार्य दाखवणार्‍या महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा सगळे पळून गेलेले असतात. आज त्याहून वेगळी स्थिती नाही. परराज्येही अडचणीत असल्याने त्यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा नाही. पण इतरांहून संकट मोठं असेल तर किमान सहाय्याची अपेक्षा अगदीच गैर नाही. आपण जेव्हा इतरांकडे मदतीची अपेक्षा ठेवतो तेव्हा राज्यातील नेते याचं पालन किती करतात याची चर्चा होणारच. महाराष्ट्रात सरकारला सातत्याने जाब विचारणार्‍या भाजप नेत्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. आपले मतदारसंघ न सांभाळणारे भाजपचे नेते सारी जबाबदारी सरकारवर सोडतात तेव्हा त्यांच्या एकूणच मानसिकतेची अवस्था कळते. काम करणारीच व्यक्ती वा संस्थेकडून चूक होत असते. तेव्हा त्याचा बाऊ किती करावा याला काहीच मर्यादा भाजप नेत्यांकडे नसतात. आज महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रस्त असलेल्या शहरांमध्ये नाशिक, नागपूर, नवी मुंबई, पनवेल, पुणे या महानगरपालिकांचा समावेश आहे. या महानगरपालिकांचा कारभार भाजपकडे आहे म्हणून सरकारला त्या शहरांना दूर लोटता येत नाही. तसं केंद्रातल्या मोदी सरकारला महाराष्ट्राला दूर लोटता येणार नाही. केंद्राकडून अधिकाआधिक मदत मिळण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार देशात महाराष्ट्राचा आहे. सर्वाधिक कर देणार्‍या राज्यात महाराष्ट्र पाहिलं राज्य असल्याने मदत मिळवण्याचा नैतिक अधिकार या राज्याचा आहे. असं असताना केंद्राकडे मदत मागितली म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना दु:ख होण्याचे काहीच कारण नाही. किमान आपल्या पक्षाच्या महानगरपालिकांना मदत मिळावी म्हणून तरी या नेत्यांनी दिल्लीकडे तगादा लावायला हवा होता. केंद्राकडून मदत मागणे याला भीक मागणे या शब्दात कोण मोजत असेल तर अशा नेत्यांची आरतीच उतरवली पाहिजे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, हे ठावूक असूनही व्यापार्‍यांना चिथावणी देणं, मदतीशिवाय लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याची भाषा देशातल्या फडणवीस, दरेकर हे वगळून एकाही नेत्याने केली नाही. संकटकाळात प्राणवायू मिळण्यासाठी मिनतवार्‍या करायला लावणं, केंद्रीय मंत्र्यांचे कान भरणं, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत केंद्राला चुकीची माहिती देऊन पुरवठा करणार्‍यांना धमकावणं या सहज घडणार्‍या घटना नाहीत. यामागे महाराष्ट्राविरोधी कारस्थानाचा कुटिल हेतू दिसतो. तो पुढील काळात भाजपला महागात पडणार आहे. कारण आज महाराष्ट्राच्या संकटकाळात भाजपने विरोधाला विरोध न करता सकारात्मक भूमिका घेतली असती, केंद्रात बहुमतात असलेल्या भाजप सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून दिली असती तर महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली असती. २०१४ ज्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे १२२ आमदार निवडून आले, २०१९ च्या निवडणुकीत १०५ झाले, त्यामुळे पुढे काय होईल, याचा भाजप नेत्यांनी विचार करायला हवा.

केवळ राजकारण करणार्‍यांनी आपल्या राज्यात आणि इतरही राज्यांमधील सरणावरच्या मृत व्यक्तींप्रति संवेदना बाळगाव्यात. जळती सरणं डोळ्यासमोर आणावीत. ज्यांचं कोणी गेलंय त्यांच्या दुःखाचा विचार करावा. जगात कोणी कोणाचं नाही. होत्याचं नव्हतं होतं, ते कळतही नाही. तेव्हा याचं राजकारण करत जाणिवा मारू नयेत. महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे, हे माहीत असूनही विरोधी पक्षांकडून ज्या तर्‍हेचं राजकारण केलं जातं त्याची तुलनाच करता येणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना निवारण्याचं महाराष्ट्रातील काम एकूण परिस्थितीचं अवलोकन करता उजवं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची अवस्था अगदीच बिकट आहे. तिथे किती मृत्यू होतात त्याची मोजदाद नाही. याची दखल घेत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि खरे आकडे देण्याचं फर्मान काढावं लागलं. ही राज्य तर भाजपची सरकारं असलेली राज्ये आहेत. म्हणून कोणी भाजपला दोष देणं योग्य नाही. तसंच महाराष्ट्राबाबत कोणी उठाठेव करणं अपेक्षित नाही. पंतप्रधान कोणीही असो, या देशाचं पालकत्व त्यांच्याकडे असतं. संकटात असं राजकारण करणार्‍यांचे त्यांनी कान खेचले पाहिजेत. पण मोदींनी आपल्या लाडक्या फडणवीसांना समज दिली असं पाहायला मिळालं नाही. सरणावर जळणार्‍यांचे पंतप्रधान मोदींनी स्मरण करावे आणि संकटात हातात हात घेऊन वागण्याचा मंत्र त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना द्यावा, हीच अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -