घरठाणेठाण्यात कोविड सेंटरमध्ये बेडसाठी लाखो रूपये मागितले, २ डॉक्टरसह ५ जणांवर गुन्हा...

ठाण्यात कोविड सेंटरमध्ये बेडसाठी लाखो रूपये मागितले, २ डॉक्टरसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

हॉस्पीटल मध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचे कंत्राट काढून घेण्याची मागणी मनसेने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून दीड लाख रुपये घेण्यात आले आहेत असा आरोप मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत महापौर नरेश म्हस्के यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तसेच संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडे याबाबतचे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने सादर करावेत असेही आवाहन महापौरांनी केले होते. आयुक्तांनीही चौकशी करून वेळ पडल्यास गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. परवेझ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हॉस्पीटल मध्ये कार्यरत असलेल्या ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड चे कंत्राट काढून घेण्याची मागणी मनसेने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार घेता यावेत यासाठी महापालिकेने तातडीने ठाणे ग्लोबल कोविड सेंटरची उभारणी केली व आजवर अनेक कोरोनाबाधित रुग्ण येथून उपचार घेवून बरे झाले आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थ‍िती लक्षात घेवून युध्दपातळीवर हे सेंटर उभारण्यात आले व येथे ऑक्स‍िजन बेड व सुसज्ज असे आय.सी.यू कक्ष तयार करण्यात आला. या सेंटरमध्ये ठाण्यातीलच नव्हे तर नजीकच्या परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेकडून आकारले जात नाहीत. परंतु दुर्देवाने बुधवारी या रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला होता. काल त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पुरावे देखील सादर केले. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशीरा डॉ.परवेझ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

ठाणेकरांचा जीव वाचवायचा असेल तर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथे कार्यरत असलेल्या ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड चे कंत्राट काढून घेण्याची मागणी मनसेचे महेश कदम यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अशा परिस्थ‍ितीत ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वच नागरिक हतबल आहेत. ठाणे ग्लोबल कोविड सेंटर हे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही तरी नागरिकांनी अशा अफवांना व भूलथापांना बळी पडू नये किंवा असा प्रकार होत असल्यास त्यांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -